Showing posts with label पातंजल योगदर्शन. Show all posts
Showing posts with label पातंजल योगदर्शन. Show all posts

Monday, 11 October 2021

गुणातीत

                


                                                                           

  गुणातीत

पहाटेचे पाच वाजलेले. रस्त्यावरचे लाईट गेलेले. एक दोन घरांचे दिवे सुरू होते. रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात त्यांचा प्रकाश चमकत होता. बाकी सारे चराचर स्थिर आणि नि:स्तब्ध ! आकाशामध्ये असलेली चांदणी सुद्धा लुकलुकत नव्हती. अंधार दाटलेला. अशावेळी श्री. रवींद्रनाथ टागोर यांची कविता आठवली.

विपत्तिमध्ये तू माझे रक्षण कर

ही माझी प्रार्थना नाही.

विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये

इतकीच माझी इच्छा!......

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन

मी तुझा चेहरा ओळखावा ;

दु:खाच्या रात्री सगळे जग

जेव्हा माझी फसवणूक करेल

तेव्हा तुझ्याविषयी

माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये

इतकीच माझी इच्छा!

काळ्याकुट्ट अंधारातही माझा तुझ्यावरचा विश्वास यत्किंचितही कमी होऊ नये. सगळ्यांनी माझी साथ सोडली तरी तुझ्यावरची माझी श्रद्धा अढळ राहावी, परमेश्वराला केलेली ही प्रार्थना माणसाला संतुलित सामर्थ्य प्रदान करते.

कदाचित संतुलित सामर्थ्याची हीच अपेक्षा व्यक्त करते, महर्षी पतंजलींचे १६ वे योगसूत्र.

तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ||१६||

(सूत्र क्र. १६, समाधिपाद, पातंजल योगदर्शन)

 योगग्रंथांच्या आधारेच आजचे हे सूत्र समजावून घेऊयात. ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये ‘योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर’ सूत्रार्थ स्पष्ट करताना लिहितात, “चित्ताहून पुरुष वेगळा आहे, असा विवेक उत्पन्न होणे ही पुरुषख्याती होय. अशा प्रकारची पुरुषख्याती झाल्यामुळे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांविषयी जे वैतृष्ण्य उत्पन्न होते ते परवैराग्य होय.”

बाराव्या सूत्रांत, अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने चित्तवृत्ती निरोध होतो असे सांगितले. तेरा आणि चौदा या दोन सूत्रात अभ्यासाचे स्वरूप सांगितले. पंधराव्या सूत्रात वशिकार-संज्ञक वैराग्याचे स्वरूप सांगितले. आता असंप्रज्ञात समाधीद्वारा पुरुषख्याती म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यावर जे फलरूप वैराग्य उत्पन्न होते, त्याचे स्वरूप या सोळाव्या सूत्रात सांगितले आहे.

स्वामी आनंदऋषी, ‘पातंजल योगदर्शन – एक अभ्यास’ या ग्रंथात सोळाव्या सूत्राचे स्पष्टीकरण देताना लिहितात,  

“अंतिम वैराग्य म्हणजे ‘पुरुषा’च्या ज्ञानामुळे विकसणारे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांबाबतचे वैराग्य, म्हणजेच गुणवैतृष्ण्य होय. सत्त्व, रज व तम हे तीनही गुण जीवात्म्याला भोगाकडे नेतात. याला भोगार्थता म्हणतात. तम-रज शांत झाले म्हणजे व सत्त्वगुण विकसित झाला, म्हणजे तो सत्त्वगुण जीवात्म्याला, साधकाला कैवल्याच्या दिशेने नेतो. याला अपवर्गार्थता म्हणतात. जीवात्म्याची किंवा चित्ताची भोगार्थता संपून अपवर्गार्थतेची सुरुवात होणे, म्हणजे चित्तवृत्तीनिरोधाची सुरुवात. ही अपवर्गार्थता जेव्हा संपुष्टात येते, तेव्हा त्या अवस्थेला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. 

योगाचार्य कोल्हटकर सांगतात, योग्याचे चित्त असंप्रज्ञात समाधीत वृत्तिशून्य आणि संस्कारशेष अशा भावास प्राप्त झालेले असते. समाधीत ‘तदा द्रष्टु: स्वरूपेSवस्थानम्’ असते. यामुळे आत्मसाक्षात्कार हा येथेच होतो. तरीपण यावेळी चित्त निर्वृत्तिक असल्याने आत्मसाक्षात्काराचा वृत्ती रूपाने परामर्श या अवस्थेत शक्यच नसतो. या असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे प्रारब्धवशात व्युत्थान झाले म्हणजे या अवस्थेचा वृत्तीरूप परामर्श चित्तावर आरूढ होतो. गाढ झोपेत, झोपेतील अनुभवाची वृत्तीरूपाने जाणीव नसते. परंतु उठल्यावर ‘सुखमहमस्वाप्सम’ म्हणजे, मी सुखाने झोपलो असा निद्राकालीन अनुभवाचा स्मृतिरूप परामर्श चित्तात वृत्तीरूपाने उदित होतो. असाच प्रकार असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे उत्थान झाले म्हणजे घडून येतो. म्हणजे असंप्रज्ञात समाधीत जो आत्मसाक्षात्कार घडत असतो, त्याचा परामर्श व्युत्थानदशेत वृत्तिरूपाने होऊ लागतो. मी असंग आहे, सत्य-ज्ञानानंदरूप आहे इत्यादी वृत्तींनी हा परामर्श व्यक्त केला जातो.

‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’, या ग्रंथात डॉ.प.वि.वर्तक लिहितात,‘पुरुष’ म्हणजे परमात्मा. पुरुष या शब्दाची फोड ‘पुरे शेते इति’ - शरीरात झोपलेला तो पुरुष अशी सर्व तज्ञ करतात. पण परमात्मा शरीरात झोपत नाही. तो जागाच असतो. आपण झोपलो तरी आपलं पचन, श्वसन, रक्ताभिसरण, चालू असतं. पंचप्राणांच्या क्रिया चालू असतात. आपली वाढ होत असते. शरीरशास्त्राच्या दृष्टीने परमात्मा झोपत नाही, हे नक्की.

त्यांनी स्वत: पुरुष या शब्दाची फोड, ‘पुरं उषति इती’, अशी केलेली आहे. जो कोणी शरीराचा व्यवहार चालवतो, तो पुरुष. ‘उष्’ या धातूचा अर्थ जीवन कंठणे, जाळणे, पीडणे असा आहे. आपलं शरीर खरोखरच जळत असतं. ऑक्सिजनशी सतत संयोग सुरू असल्यामुळे शरीरात उष्णता असते. आपल्याला या शरीरातच भोग भोगावे लागतात व पीडा सहन कराव्या लागतात. या पीडा देणारा आत्मा शरीरातच वसलेला असतो. आपले सर्व जीवन व्यवहार चालवणारी, शरीरातच वसलेली शक्ती म्हणजे ‘पुरुष’ म्हणजेच आत्मा होय. योग्याला हा आत्मा समजतो. एकदा या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे निर्गुण - निराकार अवस्था कळते. निर्गुण-निराकार अवस्थेतील गोडी कळते आणि मग साहजिकच गुणांबद्दलची ओढ किंवा आदर किंवा आवड कमी होते किंवा नाहीशी होते.

वशीकार-संज्ञक वैराग्य प्राप्त झालेल्या माणसांना व सामान्य माणसांना गुणांबद्दल आदर असतो. गुण हवेहवेसे वाटतात. चांगले गुण मिळविण्याची खटपट प्रत्येकजण करीत असतो. मी दिसायला चांगला असावा, माझी बुद्धी चांगली असावी, मन चांगलं असावं, शरीर चांगलं असावं, मला पत्नी, पुत्र, कन्या चांगल्या मिळाव्या, मित्र चांगले मिळावे, शत्रू चांगले मिळावे, ऐश्वर्य चांगले मिळावे, दृष्टांत चांगला मिळावा, साक्षात्कार चांगला व्हावा, चांगला स्वर्ग मिळावा किंवा अन्य चांगला परलोक मिळावा, अशी प्रत्येकाची तहान असते. पण ही गुणांची तृष्णा सुद्धा नाहीशी होते त्यावेळी परमवैराग्य येते.

आपल्याला हे तत्त्वज्ञान एकदम पटणार नाही कारण आपल्या कल्पना संकुचित असतात. दृष्टीही संकुचित असते. जड सृष्टीच्या, व्यवहाराच्या संकुचित भूमिकेतून सर्व चांगले गुण हवेत, असे वाटते. गुण वंदनीय, स्वीकारार्ह वाटतात. पण एकदाका आत्म्याचा साक्षात्कार झाला की विशाल दृष्टीकोन प्राप्त होतो आणि चांगले चांगले म्हणले जाणारे चांगले असतेच असे नाही व वाईट ठरलेले वाईट असतेच असे नाही, हे कळते. चांगले-वाईट हे भेद मानवी दृष्टिकोनातून झालेले आहेत. आत्म्याला चांगले-वाईट हा भेदच नाही कारण दोन्ही यातूनच उत्पन्न झाले आहे. तो निर्गुण आहे. निर्गुण ही कल्पनाच आपणाला पेलत नाही. गुण नसणे म्हणजे काय, काहीतरी गुण असणारच, असे सामान्य माणसाला वाटते पण निर्गुण ही अवस्था खरोखरच असते. त्या अवस्थेत सर्व गुण एकत्र असतात. हे मनाला पटणारे पण बुद्धीला गोंधळात टाकणारे विवेचन स्पष्ट करताना डॉ. वर्तक उदाहरण देतात, थंडी व उष्णता हे दोन भिन्न गुण आहेत असं आपण मानतो. 

पण खरी तशी स्थिती नाही. 100डिग्री सेंटीग्रेड म्हणजे परम उष्णता असे आपण मानू. उणे 100  डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे कमाल थंडी असे आपण मानू. या दोन्ही स्थिती + 100 अंश सेल्सिअस आणि - 100 अंश सेल्सिअस = शून्य अंश सेल्सिअस इतके तापमान होईल. हीच शून्यावस्था, हीच निर्गुण अवस्था. याच शून्य अवस्थेच्या एका बाजूस उष्णता तर दुसर्‍या बाजूस थंडी असते. म्हणजे शून्यातूनच दोन्ही गुण निर्माण होतात. 100 फूट उंच व 100 फूट खोल हे दोन भिन्न गुण आहे, असं आपण मानतो. 

पण दोन्ही एकत्र केले तर उंचवटा नाहीसा होईल व खड्डाही नाहीसा होईल. म्हणजेच समानता येईल. या समानतेला निर्गुण शून्यावस्था म्हणतात. यातूनच एका बाजूला ढीग व दुसऱ्या बाजूला खड्डा निर्माण होतो. हीच कल्पना सूक्ष्म करून सर्व गुणदोषांना लावली म्हणजे, निर्गुणाची कल्पना येईल. शीत–उष्ण, उंच-सखल, प्रकाश-अंधार, धन-ऋण, सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन इत्यादी सर्व द्वंद्व एकत्र केली म्हणजे, जे होईल ते निर्गुण होय. निर्गुणातूनच ही द्वंद्वे बाहेर पडलेली आहेत. या निर्गुण आत्म्याचा एकदा साक्षात्कार झाला की खरे ज्ञान होते. हे सत्य ज्ञान झाले की कुठल्याच गुणाबद्दल ओढ राहत नाही. मला हा गुण प्राप्त व्हावा अशी तृष्णा राहात नाही. अशा गुणाचा माणूस किंवा प्राणी मला जास्त आवडतो, अशी वृत्ती राहत नाही. सर्व गुण सारखेच असा समभाव निर्माण होतो. या स्थितीलाच गुणवैतृष्ण्य किंवा गुणांबद्दलची विरक्ती, असं म्हणलं आहे.

 दैनंदिन, व्यावहारिक जीवनात निर्माण होऊ शकणारा एक धोकाही डॉ. वर्तक स्पष्ट करतात, गुणांबद्दलची विरक्ती याचा अर्थ कुठल्याच गुणाबद्दल विशेष प्रेम राहत नाही पण याचा अर्थ सद्गुणांबद्दल द्वेष व दुर्गुणांबद्दल प्रेम, असा नव्हे. तरीही दुर्दैवाने तसा अर्थ केला जातो. ही विरक्ती आली की स्वच्छतेबद्दल विशेष आवड राहत नाही. पण मुद्दाम स्वच्छ जागा सोडून उकिरड्यात राहायचं असं नाही. खरी परम विरक्ती ज्याला प्राप्त होईल तो असेल त्या जागी आनंदात राहील. मग तो राजवाडा असो की उकिरडा असो. त्याला मिळेल ते अन्न तो आनंदाने खाईल; मग श्रीखंड असो की अंबोण असो. परम विरक्त ज्ञानी एखाद्या संतावर प्रेम करेल, तेवढेच दुष्टावरही प्रेम करेल. 

पण संतांकडे दुर्लक्ष करून दुष्टाला जवळ करणार नाही. दुष्टाकडून सुद्धा परब्रह्माचे कार्य होत असते हे त्याला कळते एवढेच. खरा परम विरक्त मनुष्य स्वर्ग लोकाचीही अभिलाषा धरत नाही. मला स्वर्ग मिळावा किंवा ब्रह्मलोक मिळावा अशी इच्छा सुद्धा त्याच्या मनात निर्माण होत नाही. ही श्रेष्ठतम विरक्ती होय. अशी विरक्ती मिळवण्याचा सतत प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वामी आनंद ऋषी सांगतात-जेव्हा त्रिगुणांची भोगापवर्गार्थता संपते तेव्हा योग्याला त्रिगुणांविषयी एक अलिप्तता वाटते. अंतर्यामीच्या दृष्ट्या पुरुषाच्या अनुभूतीमुळे ही अलिप्तता किंवा गुणवैराग्य प्राप्त होते. ही असंप्रज्ञात समाधीची सुरुवातीची सबीज अवस्था असते. आता कैवल्य अवस्थेला नेणारी निर्बीज समाधी किंवा धर्ममेध समाधी फारशी दूर नसते. अंतिम निर्बीज असंप्रज्ञात समाधी-अवस्था त्रिगुणातीत असते. 

सामान्य भाषेत सांगायचं तर म्हणता येईल की या गुणांविषयीच्या विरक्तीत अवगुणांविषयीची विरक्तीही सामावलेली आहे.  त्रिगुण जातात ते त्यांच्या दोन्ही बाजूंसकट जातात. त्यामुळे खऱ्या विरक्त माणसाची नेहमी सहजावस्था असते. तो सहजतेने जगतो, यदृच्छेने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टींचा तो स्वीकार करतो.

सूत्राच्या विवेचनाने एक समाधान मनात पसरले आणि मन आपोआप बा. भ. बोरकरांचे गीत गुणगुणू लागले –

 

झिणिझिणि वाजे बीन

सख्या रे, अनुदिन चीज नवीन .....

अलख निरंजन वाजविणारा

सहजपणांत प्रवीण !

 वृंदा आशय

 

 

 

 

Sunday, 8 August 2021

प्रकाश ज्ञानाचा ; निरास अज्ञानाचा !

 

प्रकाश ज्ञानाचा ; निरास अज्ञानाचा!

नमस्कार !  मागच्या वेळेला ‘ज्ञानदीप तेवत राहो’ मध्ये ‘लोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारावी’, अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्या अपेक्षेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. तेव्हा हा मांगल्याचा, ज्ञानाचा प्रकाश पसरवत अज्ञानाचा निरास करूयात. वळूयात महर्षी पतंजलींच्या आठव्या सूत्राकडे –

विपर्ययो मिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठम् || ८ ||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.८)

 

‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर या आठव्या सूत्राचा अर्थ सांगताना विशद करतात, “एका वस्तूचे जे वास्तविक स्वरूप आहे, त्यावर त्या वस्तूचे ज्ञान होत नसून अतद्रूप म्हणजे दुसऱ्याच वस्तुस्वरूपावर जेव्हा ती पहिली वस्तू भासते तेव्हा होत असलेले जे मिथ्या ज्ञान तो विपर्यय होय.” (उदा. समोर पडलेली दोरी साप भासणे)

याचा सूत्रार्थ सांगताना स्वामी विवेकानंद ‘राजयोग’ मध्ये स्पष्टीकरण देतात, “एका गोष्टीला चुकीने वा भ्रांतीने दुसरीच समजणे हा आपल्या चित्तात उठणार्‍या वृत्तींचा दुसरा वर्ग आहे. उदाहरणार्थ शिंपल्याला चांदीचा तुकडा समजणे.”

तर सूत्रार्थ सांगताना ओशो ‘ओशो पातंजल योग – भाग १’ यामध्ये लिहितात, “असम्यक, मिथ्या ज्ञान म्हणजे वस्तूच्या यथार्थ स्वरूपाशी न जुळणारी फसवी धारणा.”

या सूत्राचे विवेचन करताना ‘पातंजल योग – विज्ञाननिष्ठ निरुपण’ या ग्रंथात डॉ. प. वि. वर्तक लिहितात,  “त्याच्या  रूपात स्थित नसलेले मिथ्या ज्ञान म्हणजे विपर्यय.”
हे सगळे सूत्रार्थ वाचले की लक्षात येते, ‘विपर्यय’ शब्द थोडासा अवघड वाटला तरी ‘मिथ्या ज्ञान’ हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. ‘ब्रह्म सत्य जगन् मिथ्या’ हे आम्ही कधीनाकधी, कुठेनाकुठे वाचलेले असते, कानावर पडलेले असते. हे आठवल्याबरोबर आम्ही लगेच निष्कर्षावर येतो, ‘हं, माहिती आहे हे. पण ते काही आपल्या कामाचे नाही. तत्त्वज्ञानाची बोजड ओझी उचलणा-यांनी त्याच्याकडे बघावे. काय ते एक ब्रह्मच सत्य आहे, आणि जग मात्र खोटे, असं काहीतरी सांगते ते. आपल्याला आपले समोर दिसते ते खरं मानावं आणि गप्प बसावं झालं.” अशी साधारण आपली प्रतिक्रिया असते. 

आणि आपल्याही नकळत आपण विपर्यय, विपर्यास करण्यास सुरुवात केलेली असते. कारण आमचा पूर्वग्रह तिथे आपसूक कार्यरत होतो. मिथ्या शब्दाचा अर्थ फक्त ‘खोटे’ एवढाच होतो, आणि तोच अर्थ आहे, हे आम्ही १०० % खरं मानलेले असते. खरे मानलेले असते ते ऐकीव किंवा वरवरच्या माहितीवर. तपासून पाहण्याचे, शब्दाच्या मुळाशी जाण्याचे कष्ट कोणी घ्यायचे? ते अभ्यासकांनी घ्यावेत अशी आमची स्पष्ट धारणा असते. अभ्यासक कष्ट घेतातही. मात्र आपण त्यांच्यापर्यंत तरी पोहोचणे गरजेचे आहेच ना!  

डॉ. प. वि. वर्तक सांगतात मिथ म्हणजे ‘खोटा’ हा व्यवहारातला अर्थ. मिथ याचा खरा अर्थ ‘जुळून तयार झालेले’ असा आहे. कारण त्यात ‘मिथ म्हणजे जुळणे’ हा धातू आहे. दोन गोष्टी जुळून जे तयार होते ते मिथ असते. ते जुळून तयार झालेले असल्याने भास असतो, सत्य नसते. म्हणून मिथ म्हणजे खोटे हा अर्थ नंतर प्राप्त झाला आहे. येथे विपर्यय मिथ्या म्हणजे जुळून तयार कसा होतो, ते पाहू. विपर्यय हा अतद्रूपप्रतिष्ठम् आहे. ‘त्याच्या रूपात स्थित न झालेले’, असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्याच्या म्हणजे कोणाच्या रूपात ? समोर जे प्रमाण असेल त्याच्या रूपात.

आधीच्या सातव्या सूत्रात मनाच्या नेहमीच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. समोरच्या प्रत्यक्ष वस्तूशी समरूप होणे ही पहिली वृत्ती होय. त्या वस्तू वरून अनुमान काढणे ही दुसरी वृत्ती होय. त्या वस्तूसंबंधी आगम ज्ञानाची उजळणी करणे ही तिसरी वृत्ती आहे. पण या तिन्ही वृत्ती सोडून मन चौथ्या वृत्ती मागे जाते. ही चौथी वृत्ती म्हणजे समोरच्या गोष्टीचा विपर्यास करणे. प्रत्यक्ष, अनुमान व आगम या तीनही वृत्ती एकत्रितपणे ‘प्रमाण’ या नावानं संबोधल्या असल्याने, विपर्यास ही दुसरी वृत्ती ठरते.

आता विपर्यय किंवा मिथ्या ज्ञान या गोष्टी आपल्याला कळाल्या. मात्र हे  तद्रूपप्रतिष्ठम् आणि अतद्रूपप्रतिष्ठम् ही काय भानगड आहे? हे लक्षात येण्यासाठी, योगाचार्य कोल्हटकर आपल्या मदतीला येतात. साप आणि दोरीचे उदाहरण ते  विस्ताराने समजावून सांगतात. आता ‘हा साप आहे’, हे ज्ञान ‘तद्रूपप्रतिष्ठ’ किंवा ‘अतद्रूपप्रतिष्ठ’ आहे, म्हणजे काय?

 हा साप आहे, हे ज्ञान जर खराखुरा साप पाहून झाले तर ते सापाच्या खऱ्या स्वरूपावर आधारलेले म्हणजे ‘तद्रूपप्रतिष्ठ’ (त्याच्या मूळ रूपावर स्थित होणारे) होय. पण जर ते ज्ञान सापावर न होता साप नसलेली जी दोरी तिच्यावर भासमान होईल तर ते ‘अतद्रूपप्रतिष्ठ’ झाले. तात्पर्य एका वस्तूचा भास जेव्हा दुसऱ्या वस्तूवर होतो आणि दुसऱ्या वस्तूचे स्वरूप यथार्थपणे जाणल्यावर जो भास मिथ्या ठरतो त्याला विपर्यय म्हणावयाचे. दोरीच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर हा साप आहे ह्या ज्ञानाचा निरास होतो किंवा त्या संदर्भात ते चुकीचे ज्ञान आहे, अज्ञान आहे हे कळते आणि त्याचा निरास होतो. सापाचा भास होऊन चालणारी धावाधाव थांबते.  

एखाद्या वस्तूविषयी येणारा संशय हा अतद्रूपप्रतिष्ठ असल्याने आणि त्याची निवृत्ती होत असल्याने तोही विपर्यय होय.  या मिथ्याज्ञानविपर्यायला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पाच अवस्था आहेत. कळकळीने सांगितलं जातं तेव्हा विपर्यास घडत नाही. ‘कळकळ’ म्हणजे ज्याला कळतं, कळणं खोलवर जातं आणि हे दुसऱ्याला कळलं पाहिजे, याची ओढ लागते त्यातून ‘कळकळ’ जन्माला येते. कळकळीनं सांगावं, पोहोचवावं. जे खरं आहे तेच पोहोचू शकतो, हे वास्तव आहे, सत्य आहे.

    दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र येऊन जे दिसते ते मिथ होय. समोरच्या वस्तूशी एकरूप होणे, तद्रूप होणे ही नेहमीची क्रिया आहे. तशी तद्रूपता आली नाही तर विपर्यय होतो. समोरच्या वस्तूशी जर आपले मन तद्रूप झाले नाही तर त्या वस्तूचे खरे ज्ञान होत नाही. अशा वेळी मिथ्या ज्ञान निर्माण होते. मिथ्या ज्ञान कसे निर्माण होते? म्हणजे जुळण्याची क्रिया इथे आहे, समोर वस्तू आहे, आपलं मन आहे, तरी तद्रूप करता आलेले नाही. अशावेळी पूर्वग्रहामुळे आपल्या मनातील कल्पना त्या वस्तूच्या ग्रहण क्रियेमध्ये मिसळतात. या मिसळीमुळे मिथ्या ज्ञान तयार होते. उदाहरणार्थ दोरी समोर असताना तो  साप दिसणे.

विपर्यय होण्याचे कारण, काहीतरी पूर्वग्रह असतो. या पूर्वग्रहामुळे एक विशिष्ट समजूत आपण करून घेतो. व त्या दृष्टिकोनातून आपण बघतो. यामुळे सत्य बाजूला सारले जाऊन, विपर्यास पदरी येतो. विपर्ययात आपल्या डोळ्यांसमोर जे असते, त्याचे सत्यरूप आपणाला कळत नाही. जे खरे रूप आहे, त्याचे ज्ञान बाजूला सारले जाऊन मिथ ज्ञान पुढे आणले जाते. हीच मनाची विपर्यय करण्याची वृत्ती आहे.

व्यवहारात मनुष्य नेहमीच प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करीत असतो. अहो, माणसाचे काय विचारता, ‘वाजे पाऊल आपुले; वाटे मागुनी कोण आले’ अशी त्याची संभ्रमित अवस्था. जे खरं आहे ते तसं न बघता आपल्या कल्पनांची पुटं चढवून, तो बघतो. साहजिकच सत्य ज्ञान होत नाही. सत्य म्हणजेच ब्रह्म किंवा आत्मा असल्यामुळे आपण ब्रह्म किंवा आत्मा यांचे ज्ञान करून घेऊ शकत नाही. विपर्यायाची वृत्ती नाहीशी केली, तरच आत्मज्ञान होऊ शकते. देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण जन्मावा आणि साऱ्या अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात, अज्ञानाचा निरास व्हावा, तसे हे आठवे सूत्र मला विपर्यास नाहीसे करून सत्याच्या दिशेने नेणारे वाटते. आजच्या दीप अमावास्येला विपर्यासाचा अंधार संपून सत्याचा प्रकाश पसरावा एवढीच प्रार्थना !

वृंदा आशय

Sunday, 18 July 2021

केल्याने देशाटन

 

केल्याने देशाटन

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन |

योSपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोSस्मि ||

योगशास्त्राने मनाचा, व्याकरण शास्त्राने वाणीचा आणि वैद्यकशास्त्राने शरीराचा मळ नष्ट करणाऱ्या, महामुनी पतंजलींपुढे मी नतमस्तक आहे. इसवीसनपूर्व २०० हा महामुनी पतंजलींचा कालखंड मानला जातो. ‘योगसूत्र’, अष्टाध्यायीवरील ग्रंथ ‘महाभाष्य’ आणि ‘आयुर्वेदावरील भाष्य’ हे त्यांचे साधनारूपी लेखन-चिंतन म्हणजे भारतीय संस्कृतीला मिळालेली मोलाची देणगी आहे.

भारतीय दर्शनाच्या सहा दर्शनांमधील एक हे मुख्य स्थान योगसूत्रांना मिळालेले आहे. पतंजली मुनींचं हे जीवनचिंतन इसवीसनपूर्व काळापासून एकविसाव्या शतकापर्यंत प्रवाहीत होत आलेले आहे आणि पुढेही अखंड प्रवाहीत होत राहणार आहे. त्यांची ही योगसूत्रे आम्हाला आजही महत्त्वाची वाटतात, आजही त्यांच्या विवेचनाकडे आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे वाटते, याचा प्रत्यय तुम्हीच तर मला दिलात. जगभरात देशोदेशी विखुरलेले माझे भारतीय बांधव, माझे मराठी सुहृद ज्या पद्धतीने या ब्लॉगला वाचत आहेत, प्रतिसाद देत आहेत, तुमच्या या वाचनातून, प्रतिसादातून त्याचं प्रत्यंतर माझ्या मनापर्यंत गेलं. भारताव्यतिरिक्त ११ देशांमधून आपण याचे वाचन करत आहात. कालातीत असणाऱ्या आणि शाश्वत ठरलेल्या मार्गदर्शक महामुनी पतंजलींना, म्हणूनच माझ्या - तुमच्याकडून, आपल्या सर्वांकडून साष्टांग दंडवत !

वळूयात पाचव्या योगसूत्राकडे –

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ||५||  

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.५)

वृत्तींचे प्रकार आणि स्वरूप या सूत्राद्वारे मांडले गेले आहेत. महामुनी सांगतात, वृत्ती असंख्य असल्या तरी पाच प्रकारात त्याचे वर्गीकरण करता येते. त्या पाच प्रकारांचे वर्गीकरण देखील ‘क्लिष्ट’ व ‘अक्लिष्ट’ म्हणजेच ‘क्लेशकारक’ आणि ‘अक्लेशकारक’ अशा दोन वर्गांमध्ये केलेले आहे.

क्लेश - दुःख हा शब्द उच्चारताच मला वाटायला लागलं, खरोखर दुःख हेच तर शाश्वत आहे. इथे दिवसभरातून किती वेळा मन मोडत असेल, मन खट्टू होत असेल, नाराज होत असेल त्याची गणतीच नाही. किती काय काय असतं मनामध्ये! मान मोडून काम केले तरी मनासारखं काही होईल तर, शपथ! आणि मग असं नाही झालं तर दुःख वाटणारचना. क्लेश वाटणारच. आमच्या साधुसंतांनी साहित्यिकांनी हेच तर सांगून ठेवलं आहे – ‘सुख पाहतां जवापाडें | दुःख पर्वताएवढें’ हे संत तुकारामांचे सांगणे असू द्या किंवा

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’

या सारखं ग.दि.माडगूळकरांचं अजरामर गीत असू द्या. ते आम्हाला आमच्या शाश्वत चिरंतन अशा दुःखाचीच जाणीव करून देतं ना.

इथे तर पतंजली मुनी सांगतात क्लेशकारक आहे ते सोडलं पाहिजे. आपण सोडतो पण काय सोडतो, ज्याचा त्रास शरीराला होतो ते सोडतो, आणि ज्याचा त्रास मनाला होतो ते मात्र धरतो. अर्थात शारीरिक कष्ट आम्ही सोडतो आणि मानसिक कष्ट वाढवतो. नकारात्मक गोष्टींमध्ये, दुःखामध्ये त्याच त्या आवर्तामध्ये आम्ही फिरत राहतो. मग आम्हाला आयुष्यच क्लेशकारक वाटायला लागतं.  जीवन जगण्याची कला अवगत करता आली पाहिजे. मला तर वाटतं ही कला माणसाजवळ उपजत असतेच. आपल्या सवयींनी, कामांनी पर्यायाने स्वभावामुळे आपण तिला हरवून बसतो.            

माणूस वयानं मोठा होत जातो तसतशी त्याची संवेदनशीलता कमी व्हायला  लागते. बालपण संपुष्टात यायला लागतं. तुम्ही म्हणताल वयासोबत प्रगल्भ व्हायचे नाही का? बालीशच राहायचं का? प्रगल्भ होणं म्हणजे असंवेदनशील होणं नव्हे. उलट कोणत्याही संवेदनशीलतेला अधिक जबाबदारीनं दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रगल्भता. बालीशपण निराळं आणि स्वत:मधलं बालपण जोपासणं निराळं.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा केशवसुतांनी व्यक्त केलेला बाणा आणि दिलेला संदेश सर्वपरिचित आहे. अहेतूकपणे, निरागसतेने प्रश्न विचारत हे बालमन आपल्या सभोवतीच्या जगाची ओळख करून घेत असतं. उत्स्फूर्तपणे व्यक्त होत स्वत:च्या प्रतिक्रिया नोंदवत जातं. मोठं व्हायला लागतो तसे प्रश्न हरवायला लागतात. मला वाटतं, प्रश्न हरवतात कारण आयुष्यासंबंधी, माणसांसंबंधी, नात्यांबाबत आपले अनेक ग्रह तयार होतात, आपण गृहीत धरायला लागतो. न जाणताच अनेक गोष्टींची उत्तरे मिळाल्यासारखे वागायला लागतो. आपण विचारलेल्या प्रश्नांमागेही विशिष्ट हेतू कार्यरत झालेले असतात. मग अहेतूकता, निरागसपण कसं राहणार? प्रश्न पडले पाहिजेत जिज्ञासेनं, त्यांचा पाठपुरावा करता आला पाहिजे सहजतेनं. आपलं बालपण जपता आलं पाहिजे ते उत्स्फूर्तता आणि उत्कटता सांभाळून ठेवत. उत्कटता आपल्याला आयुष्यभर साथ देते, जीवन रसरशीतपणे जगायला शिकवते.

क्लेश आणि क्लेशकारक अवस्था - व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, मानवी समाज – जग, या पातळ्यांनुसार बदलत जाते. कुटुंबाच्या भल्यासाठी व्यक्तिहिताचा दुराग्रह आम्हाला सोडता आला पाहिजे, त्याला ‘स्वार्थत्याग’ म्हणतात. समाजाच्या भल्यासाठी कुटुंबाला कष्ट पडले तरी, ते आम्हाला सोसता आले पाहिजेत त्याला ‘चिकाटी’ म्हणतात. देशाच्या भल्यासाठी विशिष्ट समाजाच्या भलेपणाचा अट्टहास आम्ही सोडला पाहिजे त्याला ‘सामंजस्य’ म्हणतात. मानवी समाजाच्या, जगाच्या कल्याणासाठी देशांना पुढाकार घेता आला पाहिजे, त्याला देशाचा स्वभाव – ‘राष्ट्रधर्म’ म्हणतात.

भारतीय संस्कृतीने, देशाला नव्हे जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे ‘भारताचा अध्यात्मिक स्वभाव’ होय. भारताला मानवी कल्याणाची असलेली आत्मिक ओढ त्यातूनच निपजली आहे. भारत सांगतो माणसानं ‘धर्मानं’ वागावं म्हणजे क्लेशकारक काही घडत नाही. ही सृष्टी, हे ब्रह्मांड ज्या तत्त्वानं, ज्या नियमानं चालतं ती मूलभूत तत्त्वं म्हणजे धर्म. या नियमांशी नातं सांगत जीवनाची घडी बसवली की ते आपोआप धर्माधिष्ठित जीवन होते.

आपल्या संस्कृतीने प्रत्येक नात्याला, प्रत्येक भूमिकेला विशिष्ट धर्म दिलेला आहे. तो धर्म आम्ही यथास्थितपणं सांभाळला की क्लेशकारकतेला आमच्या जीवनात प्रवेश करण्याची अनुमती नाही. मात्र जेव्हा आम्ही आमचा धर्म सोडतो, तेव्हा आमची नाती शबल आणि दु:खदायी व्हायला लागतात. समाजातील अनेकविध घटना पाहता लक्षात येतं, आमची नाती कलुषित होत आहेत, शरमेनं मान खाली घालत आहेत. असं घडतं तेव्हा, आई-वडिलांचं आणि मुलांचं, भावा-बहिणीचं, पती-पत्नीचं, नणंद-भावजयीचं, सासू-सूनेचं नातं संशयाचे प्रश्न आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करायला लागतं. कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया आहे. जे जे क्लेशकारक आहे ते सगळं सोडून हा पाया भक्कम करावाच लागेल.

समर्थ भारत फक्त इतिहासामध्ये नसतो. केवळ तो गौरव आठवून फुकाचा अभिमान आम्ही बाळगायचा नसतो. हा भारत अखंड आणि सामर्थ्यशाली राहील यासाठी जाणीवपूर्वक आम्ही आमचे योगदान, वर्तमानाच्या गरजांनुसार, कालभान राखून, प्रसंगानुरूप द्यायचं असतं. ते देता आलं पाहिजे. त्यातूनच घडत असतं, तावून सुलाखून निघालेलं प्रत्येकाचं भारतीयत्व !

विश्वभर संचार करणाऱ्या या भारतीयत्वाच्या चेतनेचा मला अभिमान आहे. दिक्कालावर मात करत आपल्या कर्तृत्वाच्या प्रतिभेने जगभर संचार करा, पण भारतीयत्वाच्या सत्त्वाचा विसर पडू देऊ नका. जीवनमूल्यं हरवली की समूळ नाश व्हायला लागतो. तेव्हा संस्कृतीचं सार घेऊन आपण पाय रोवून उभे राहा. संत तुकारामांच्या आत्मविश्वासानं सांगा,

“आम्ही भारतवासी | आलो याचि कारणासी |

 बोलिले जे ऋषी | साच भावे वर्ताया ||"

जगभरातल्या स्वार्थी सत्तांना ठणकावून सांगा, अन्यायकारी वृत्तींना दम देऊन सांगा, शोषक प्रवृत्तींना धारेवर धरून सांगा; संत ज्ञानदेवांचे पसायदान ‘विश्वगीत’ करणारे आम्हीच आहोत. शांती प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्य व्यक्त करता आलं पाहिजे. मानवी कल्याणाचे अग्रदूत म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळता आली पाहिजे.

वृंदा आशय 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sunday, 11 July 2021

ये हृदयीचे ते हृदयी !

 

ये हृदयीचे ते हृदयी !

आषाढ मास सुरु झाला. सृष्टीचं नंदनवन फुललं. मनाला भक्ती-भावाचं चंदन लागलं. या प्रसन्न, सुगंधी परिसरातून महाकवी कालिदासांना वंदन. सृष्टीला कवेत घेत, भारतीय संस्कृतीतला चिरंतन प्रेमाचा वारसा जगापर्यंत पोचवणा-या, कालातीत साहित्यकृतींचं मनोभावे स्मरण! वृत्ती-प्रवृत्तींना प्रफुल्लित करणा-या या सुंदर वातावरणात वळूयात महर्षी पतंजलींच्या चौथ्या सूत्राकडे -
     

‘वृत्तिसारूप्यमितरत्र’ (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.४)

सूत्रार्थ -   निरोधाव्यतिरिक्त इतर अवस्थांमध्ये तो द्रष्टा चित्तातील वृत्तीशी सरूपता पावल्यासारखा असतो. द्रष्टा चित्तवृत्तीशी एकरूप झाल्यासारखा / तद्रूप झाल्यासारखा भासतो.

सूत्र क्र. ३ आणि ४ मधून महर्षी चित्ताचे लक्षण सांगतात. ज्याचा निरोध झाला असता द्रष्टा आपल्या स्वरूपाने अवस्थित असतो आणि ज्यात वृत्ती उत्पन्न झाल्या  असता द्रष्टा त्या त्या वृत्तीशी जणू  सरूपता पावतो ते चित्त. वास्तविक पाहता दोन्ही अवस्थांमध्ये द्रष्टा किंवा आत्मा निर्विकार असतो. मात्र चित्ताच्या विकारांमुळे तो वृत्तींशी तद्रूप झाल्यासारखा भासतो. वृत्तीशी तद्रूप झाला की त्याला स्वरूपाचे नाही तर वृत्तीचेच भान राहते. आपण वृत्तीबरोबर वाहत जातो. साक्षित्व सोडून इतर सर्व अवस्थांमध्ये आपलं मनाशी तादात्म्य असतं. विचारांच्या आधारे आपण वृत्तीशी एकरूप होतो. मुळात चित्त हे नेहमीच आपल्या शुद्ध स्वरुपाकडे जाण्याचा प्रयत्न करते. पण इंद्रिये त्याला बाहेर खेचत असतात. चित्ताचा संयम करून त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीला आळा घालणे, आत्म्याच्या दिशेने त्याला अंतर्मुख करणे, हीच योगाची पहिली पायरी आहे. चित्त फक्त माणसांमध्येच बुद्धीच्या रूपाने विकसित होते. त्यामुळेच वानराचा नर आणि नराचा नारायण ही उन्नत्ती शक्य होते.

दैनंदिन जीवनामध्ये वृत्तींचा विचार करताना, वृत्त, वृत्ती आणि वृत्ताकार हे तीन शब्द परस्परांच्या फार जवळचे वाटतात. कोणतंही वृत्त (बातमी) कळालं, मग ते मानसिक, वैचारिक, शाब्दिक, किंवा कृतीच्या पातळीवरचे असो. वृत्त कळताच वृत्ती निर्माण होतात आणि वृत्ताकार फिरत राहतात. पुन: पुन: तेच ते, तेच ते. घटना घडून गेली तरी स्मृतिरंजनाच्या माध्यमातून आपण ती घटना पुन: पुन: घडवत राहतो. जागेपणीच्या या छंदामुळे स्वप्नातही ती आपसूक घडते.

एखाद्यामध्ये रागाची वृत्ती पुन: पुन: निर्माण झाली की आपण म्हणतो, माणूस रागीट आहे. प्रेमाची वृत्ती पुन: पुन: निर्माण झाली की म्हणतो, माणूस प्रेमळ आहे. कोणी सतत आकडूपणाने वागला की आपण म्हणतो माणूस खडूस आहे. आपण माणसाला / स्वतःला वृत्ती समजतो. मात्र वृत्ती व आपण वेगळे असतो. आपण वृत्ती नव्हे तर  वृत्तीचे चालक असतो. स्वत:लाच वृत्ती समजल्याने, चलित समजल्याने वृत्तींच्या भडीमाराने, गदारोळाने आपण विचलित होतो. अंत:रंगाला रणभूमी करण्यास आम्हीच कारणीभूत असतो. मग आमच्यातला गर्भगळीत अर्जुन बाहेर कृष्णाचा शोध घेत राहतो. वृत्तीचे चालकपण थांबवून आपण द्रष्ट्याची भूमिका घेतली, की ज्ञान प्राप्त होऊ लागते. द्रष्टा स्थित व्हायला लागतो.

द्रष्टा स्थित व्हायला लागला म्हणजे स्वत:ची ओळख पटायला लागते. समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे सामर्थ्यही येते. अन्यथा इतरांसारखं करण्याच्या प्रयत्नात आयुष्य दडपणाखाली येते, प्रवाहपतित होण्याचीही शक्यता असते. द्रष्टा स्थित व्हायला लागला की आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. फूल फुललंय हे त्याची गंधवार्ताच वा-यावर पसरवते. त्यासाठी प्रत्येक वर्तमान क्षण समरसून जगता आला पाहिजे. खळखळून हसावं, हमसून हमसून रडावं, कडकडून भांडावं. जीवनाची मजा आहे त्यात. उगा काय कुढत बसायचं? संवेदनशीलतेने जगणं महत्त्वाचं. वरवरचं जगणं, आभासी जगणं टाळता आलं पाहिजे. ‘मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया’ अशी अवस्था काय कामाची? 

नैसर्गिकतेनं जगताना काटा टोचल्याचं दु:ख नसतं. पण फूल बोचायला लागलं की साशंकता वाढते. आपल्या मनामध्ये नकारात्मकता, द्वेष, सूड यासारख्या भावना निर्माण व्हायला लागतात. तिथल्या तिथे न संपता त्या कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. विचार करावा आणि मनाची इम्युनिटी पॉवर वाढवावी. विचार एक शक्ती आहे. तिचा सुयोग्य वापर करता यावा. विचारांच्याच पातळीवर प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देण्यास लागलो तर कृती अधिक निश्चयी आणि सकस होतील. रिअॅक्शनच्या ऐवजी रिसपॉन्स देण्याची स्वत:ला सवय लावली की आपल्यातला वर्तमान क्षणात जगणारा रिसपॉन्सिबल माणूस घडायला लागतो. भूतकाळातल्या क्षणांची बातमी होते आणि भविष्यकाळातले क्षण वेधमय असतात. बातमीत गुंतू नये आणि वेधात अडकू नये.

ऑनलाइन प्रणालीद्वारे आभासी जगात वावरत असताना एक पालुपद आपण अनेकवेळा ऐकतो - यू आर नॉट कनेक्टेड. त्याबरोबर जाणीव होते अडथळा निर्माण झाल्याची. बहिरंगाकडून अंतरंगाकडच्या प्रवासात ‘स्टे कनेक्टेड विथ युवरसेल्फ’ हे खूप महत्त्वाचे आहे. तो श्रीरंग रंग खेळतोना तसा. रंग खेळताना तो नखशिखान्त भिजतो. मात्र रंगातून बाहेर आल्यावर एक शिंतोडाही त्याच्या अंगावर दिसत नाही. तसं युक्त होऊन मुक्त व्हावं. जीवनाचा सुंदर अनुभव घ्यावा.

बहुतांश वेळा आमचे विचार पूर्वानुभवावरच नव्हे तर पूर्वग्रहावर आधारित असतात. नव्या अनुभवाला मोकळ्या मनाने आम्ही सामोरे जाऊ शकत नाही. खुल्या मनाने (ओपन माईंड) जगता आले पाहिजे. खुल्या मनाने एकरूप झालो तर घटनांची वस्तुनिष्ठ, अचूक, नेमकी माहिती आपण घेऊ शकतो. त्याआधारे तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करू शकतो. या एकरूपतेशिवाय साहित्यातून, संगीतातून, नृत्यातून समाधीचा आनंद कसा मिळणार? कला, संशोधन, विज्ञान सारं शेवटी आनंदाकडेच वळतं.  एकरूपतेतूनच सौंदर्याचा प्रत्यय येतो. सत्याचा स्वीकार, शिवत्वाची/ मांगल्याची कामना करत झाला की सौंदर्य फुलतं. विचारांच्या शक्तीने असं सौंदर्य समाजमनामध्ये निर्माण झाले की, ‘ये हृदयीचे ते ह्रदयी’ व्हायला वेळ लागत नाही. विश्वमनाची मशागत झाली की सृजनाचा,समृद्धतेचा, सत्य-शिव-सुंदराचा प्रत्यय येणारच. संत ज्ञानदेवांचं पसायदान प्रत्यक्षात उतरणारच. त्यासाठी प्रत्येकाने एकच करायला हवं - स्टे कनेक्टेड. स्टे सेफ.

वृंदा आशय

 















Sunday, 4 July 2021

प्रकाशते अंतर; देवकृपा निरंतर ….. !

प्रकाशते अंतर; देवकृपा निरंतर ….. !

वाणीची देवता देवी सरस्वतीला नमन ! या वाणीची प्रेमाने, कौतुकाने, मार्गदर्शनाने जोपासना करणा-या, तिच्या संवर्धनाला वाव देणा-या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला, माझ्या शाळा - महाविद्यालयाला मानाचं वंदन! मला घडवणा-या सर्व गुरुजनांची आणि आजही जीवंत ठेवणा-या माझ्या विद्यार्थ्यांची मी कृतज्ञ आहे. शब्दांवर प्रेम करणाऱ्या आणि वाणीचाही स्वीकार करणाऱ्या वाचक, श्रोत्यांना अभिवादन! तन-मन पुलकित करणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया घडवतात सहज-चिंतन! चला वळूयात, महर्षी पतंजलींच्या तिसऱ्या सूत्राकडे –

तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थानम् ! (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.३.)

[अर्थ - तेव्हा द्रष्टा आपल्या (शुद्ध) स्वरूपात स्थित होतो.]

तेव्हा म्हणजे केव्हा? द्रष्टा म्हणजे कोण? स्वरूप म्हणजे काय? अनेक प्रश्न. सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारं योगशास्त्र, मोठं स्वच्छ, स्पष्ट आणि पारदर्शक आहे. १९५ सूत्रांचा हा प्रवास, अवघ्या चराचराला - लौकिक आणि पारलौकिकाला कवेत घेणारा, व्यापक आणि सखोल असा आहे. या प्रवासात कोणीही गडबडून जाऊ नये, चक्रावून जाऊ नये यासाठी सुरुवातीलाच दिशा स्पष्ट केलेली आहे. हा प्रवास कुठून सुरू करायचा आणि आपण कुठे पोहोचणार, याची स्पष्ट कल्पना महर्षी प्रारंभीच देतात. पहिल्या सूत्रात अनुशासनाचा मार्ग सांगितला. दुसऱ्या सूत्रात चित्तवृत्तींच्या निरोधापासून सुरुवात करायला सांगितली. आणि तिसऱ्या सूत्रात या प्रवासाच्या शेवटी आपण कुठे पोहोचणार, ते मुक्कामाचं ठिकाण सांगितलं.

हा प्रवास कोणासाठी किती काळाचा असेल? कोणाला सोयीचा वाटेल, कोणाला गैरसोयीचा वाटेल? कोणासाठी सहज आनंदाचा ठरेल तर कोणाला खडतर भासेल, हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून. एकदा प्रवासाला लागलं की मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणारच, हे मात्र निर्विवाद सत्य. माणसाचं खरं स्वरूप असतं मनाच्या पलीकडे. चित्तवृत्तींचा निरोध करून मनाला अ-मन करता आलं की, या प्रवेशाचं दार उघडतं. चित्ताच्या पाच प्रकारच्या अवस्था सांगितल्या जातात. ‘मूढ’ अवस्थेत दाट अंधारल्यासारखीच स्थिती होते. ‘क्षिप्त’ अवस्थेत मन विखुरलेले असते. ‘विक्षिप्त’ अवस्थेत मन स्वतःच्या केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करते. ‘एकाग्र’ अवस्थेत मनात अंतर्मुख होण्याचे सामर्थ्य येते. ‘निरुद्ध’ अवस्थेत चित्तवृत्तींचा निरोध होतो. ही अवस्था समाधीच्या दिशेने घेऊन जाते.

वृत्ती म्हणजे मनावर उठणारे तरंग. हे तरंग जसे उठतात तसेच विरू दिले की मन शांत होतं. एखाद्या शांत डोहाचा तळ स्पष्टपणे दिसावा, तसं ‘स्व-रूप’ कळायला लागतं. मानवी मन मात्र या तरंगांमध्ये तरंगत राहतं. मनसोक्त डुंबतं. खोलवर डुंबणार्‍याला, बाहेर काढायला वेळ लागेलच ना.

त्यासाठी सुरुवात करावी लागते, Learn to say no या मॅनेजमेंटच्या तत्त्वाने. सेल्फ मॅनेजमेंट केल्याशिवाय स्वरूपात स्थिर कसं होणार? स्वत:च्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी, ‘काय हवं - काय नको’ ते ठरवावं लागतं. जे हवं ते जाणीवपूर्वक वाढवावं लागतं, जे नको ते काढावं आणि फेकावे लागतं. मौज अशी की अ-मनाच्या दिशेने जायचं आहे, मात्र काय हवं-काय नको, ते मन सांगायला लागतं. लुडबूड करत मोठ्या हिकमतीने या डोहात आपल्याला ‘आनंदाने बुड’ असं सांगतं. मग बुद्धीला आपली छडी काढावी लागते. सुरु होतो संघर्ष श्रेयस आणि प्रेयसाचा.

पाच- पाच खिडक्या उघडून पळणारं मन सहज थोडीच हाती येणार? ते दंगा करत राहातं. आरडाओरडा करतं. नजर पडली की मन म्हणतं, ‘दिसलं दिसलं’. बुद्धीची छडी सांगते, ‘मी दाखवेल ते पाहा’. कानावर काही पडलं, की मन म्हणतं, ‘कानावर आलं, ऐकू आलं’. बुद्धी कान धरुन सांगते, ‘ऐकायला शिक’. कानावर पडणं निराळं, ऐकणं वेगळं. चाखणं निराळं, चव घेणं वेगळं. हात लागणं निराळं, स्पर्श करणं वेगळं. वास येणं निराळं, गंधित होणं वेगळं. दिसणं निराळं, पाहाणं वेगळं. पाहण्यातून घडते दृष्टी आणि दृष्टीतून विकसित होतो दृष्टिकोण. दृष्टिकोण स्वत:ला घडवायला, स्थिरावयाला, स्वत:चे व्यवस्थापन करायला कारणीभूत ठरतो.

विकसित दृष्टी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तत्त्वांचा परिचय करून घ्यायला मदत करते. जसजसं स्थिर होत जातो, तसतसं कळायला लागतं या तत्त्वांनी तर अवघी सृष्टी घडली आहे. आत आणि बाहेर तेच. जे व्यष्टीत ते समष्टीत आणि तेच सृष्टीत. मग भेद कशाचा? भांडण कशाचं? संघर्ष कशासाठी?

‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी अवस्था होऊन देही उभा असलेला पांडुरंग दिसला की कळतं, ज्याच्या शोधात मी भरकटतोय, तो तर प्रत्येक क्षणी सोबतच होता. मार्ग दाखवत होता, काटे वेचत होता. वेळ पडली की उचलून कडेवरही घेत होता. फक्त स्वतःलाच नव्हती त्याची जाणीव. ..... ‘अंतर प्रकाशते’ आणि निरंतर वाहणाऱ्या देवकृपेपुढे नतमस्तक होते. ‘तो’ मोठ्या मनाचा. गळाभेट घेतो. आपण एकरूप होतो. पारलौकिकाचा हा आनंद मिळायला कदाचित वेळ लागेल.

‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’ या वृत्तीतून अलौकिकाचा वेध लागतो. मात्र ‘प्रतिमेहूनही प्रत्यक्ष निकट’ हे देखील जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा हे लौकिक जग सुंदर करायला, कोणी थांबवलंय का आपल्याला? ‘तो’ जर सोबतच असतो तर उचलावीत पावलं, बिनधास्तपणं, आत्मविश्वासानं, संपूर्ण जबाबदारीनं. स्वरूपाला विश्वरूप व्हायला वेळ लागणार नाही. बिंब-प्रतिबिंब अशा या खेळात निखळ आनंद आहे. तो निर्मळ मार्गानंच प्रत्ययाला येतो. चला, निर्मळ होऊ या, सामूहिक शक्तीने जग सुंदर करूया!

वृंदा आशय


विराम माझ्या असण्याला !

                        विराम माझ्या असण्याला !          विराम माझ्या असण्याला !             जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतरा...