प्रकाशते अंतर; देवकृपा निरंतर ….. !
वाणीची देवता देवी सरस्वतीला नमन ! या वाणीची प्रेमाने, कौतुकाने, मार्गदर्शनाने जोपासना करणा-या,
तिच्या संवर्धनाला वाव देणा-या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला, माझ्या शाळा -
महाविद्यालयाला मानाचं वंदन! मला घडवणा-या सर्व गुरुजनांची आणि आजही जीवंत
ठेवणा-या माझ्या विद्यार्थ्यांची मी कृतज्ञ आहे. शब्दांवर प्रेम करणाऱ्या आणि
वाणीचाही स्वीकार करणाऱ्या वाचक, श्रोत्यांना अभिवादन! तन-मन पुलकित करणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया
घडवतात सहज-चिंतन! चला वळूयात, महर्षी पतंजलींच्या तिसऱ्या सूत्राकडे –
तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थानम् !
(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.३.)
[अर्थ - तेव्हा द्रष्टा आपल्या (शुद्ध)
स्वरूपात स्थित होतो.]
तेव्हा म्हणजे केव्हा? द्रष्टा
म्हणजे कोण? स्वरूप म्हणजे काय? अनेक प्रश्न. सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारं
योगशास्त्र, मोठं स्वच्छ, स्पष्ट आणि पारदर्शक आहे. १९५ सूत्रांचा हा प्रवास,
अवघ्या चराचराला - लौकिक आणि पारलौकिकाला कवेत घेणारा, व्यापक आणि सखोल असा आहे.
या प्रवासात कोणीही गडबडून जाऊ नये, चक्रावून जाऊ नये यासाठी सुरुवातीलाच दिशा
स्पष्ट केलेली आहे. हा प्रवास कुठून सुरू करायचा आणि आपण कुठे पोहोचणार, याची
स्पष्ट कल्पना महर्षी प्रारंभीच देतात. पहिल्या सूत्रात अनुशासनाचा मार्ग सांगितला.
दुसऱ्या सूत्रात चित्तवृत्तींच्या निरोधापासून सुरुवात करायला सांगितली. आणि
तिसऱ्या सूत्रात या प्रवासाच्या शेवटी आपण कुठे पोहोचणार, ते मुक्कामाचं ठिकाण
सांगितलं.
हा प्रवास कोणासाठी किती काळाचा
असेल? कोणाला सोयीचा वाटेल, कोणाला गैरसोयीचा वाटेल? कोणासाठी सहज आनंदाचा ठरेल तर
कोणाला खडतर भासेल, हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून. एकदा प्रवासाला लागलं की
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणारच, हे मात्र निर्विवाद सत्य. माणसाचं खरं स्वरूप असतं
मनाच्या पलीकडे. चित्तवृत्तींचा निरोध करून मनाला अ-मन करता आलं की, या प्रवेशाचं
दार उघडतं. चित्ताच्या पाच प्रकारच्या अवस्था सांगितल्या जातात. ‘मूढ’ अवस्थेत दाट
अंधारल्यासारखीच स्थिती होते. ‘क्षिप्त’ अवस्थेत मन विखुरलेले असते. ‘विक्षिप्त’
अवस्थेत मन स्वतःच्या केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करते. ‘एकाग्र’ अवस्थेत मनात
अंतर्मुख होण्याचे सामर्थ्य येते. ‘निरुद्ध’ अवस्थेत चित्तवृत्तींचा निरोध होतो. ही
अवस्था समाधीच्या दिशेने घेऊन जाते.
वृत्ती म्हणजे मनावर उठणारे तरंग.
हे तरंग जसे उठतात तसेच विरू दिले की मन शांत होतं. एखाद्या शांत डोहाचा तळ
स्पष्टपणे दिसावा, तसं ‘स्व-रूप’ कळायला लागतं. मानवी मन मात्र या तरंगांमध्ये
तरंगत राहतं. मनसोक्त डुंबतं. खोलवर डुंबणार्याला, बाहेर काढायला वेळ लागेलच ना.
त्यासाठी सुरुवात करावी लागते, Learn to say no या मॅनेजमेंटच्या तत्त्वाने. सेल्फ मॅनेजमेंट केल्याशिवाय
स्वरूपात स्थिर कसं होणार? स्वत:च्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी, ‘काय हवं - काय
नको’ ते ठरवावं लागतं. जे हवं ते जाणीवपूर्वक वाढवावं लागतं, जे नको ते काढावं आणि
फेकावे लागतं. मौज अशी की अ-मनाच्या दिशेने जायचं आहे, मात्र काय हवं-काय नको, ते
मन सांगायला लागतं. लुडबूड करत मोठ्या हिकमतीने या डोहात आपल्याला ‘आनंदाने बुड’ असं
सांगतं. मग बुद्धीला आपली छडी काढावी लागते. सुरु होतो संघर्ष श्रेयस आणि प्रेयसाचा.
पाच- पाच खिडक्या उघडून पळणारं मन
सहज थोडीच हाती येणार? ते दंगा करत राहातं. आरडाओरडा करतं. नजर पडली की मन म्हणतं,
‘दिसलं दिसलं’. बुद्धीची छडी सांगते, ‘मी दाखवेल ते पाहा’. कानावर काही पडलं, की
मन म्हणतं, ‘कानावर आलं, ऐकू आलं’. बुद्धी कान धरुन सांगते, ‘ऐकायला शिक’. कानावर
पडणं निराळं, ऐकणं वेगळं. चाखणं निराळं, चव घेणं वेगळं. हात लागणं निराळं, स्पर्श
करणं वेगळं. वास येणं निराळं, गंधित होणं वेगळं. दिसणं निराळं, पाहाणं वेगळं. पाहण्यातून
घडते दृष्टी आणि दृष्टीतून विकसित होतो दृष्टिकोण. दृष्टिकोण स्वत:ला घडवायला, स्थिरावयाला,
स्वत:चे व्यवस्थापन करायला कारणीभूत ठरतो.
विकसित दृष्टी शब्द, स्पर्श, रूप,
रस, गंध या तत्त्वांचा परिचय करून घ्यायला मदत करते. जसजसं स्थिर होत जातो, तसतसं
कळायला लागतं या तत्त्वांनी तर अवघी सृष्टी घडली आहे. आत आणि बाहेर तेच. जे
व्यष्टीत ते समष्टीत आणि तेच सृष्टीत. मग भेद कशाचा? भांडण कशाचं? संघर्ष कशासाठी?
‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी
अवस्था होऊन देही उभा असलेला पांडुरंग दिसला की कळतं, ज्याच्या शोधात मी भरकटतोय,
तो तर प्रत्येक क्षणी सोबतच होता. मार्ग दाखवत होता, काटे वेचत होता. वेळ पडली की
उचलून कडेवरही घेत होता. फक्त स्वतःलाच नव्हती त्याची जाणीव. ..... ‘अंतर प्रकाशते’
आणि निरंतर वाहणाऱ्या देवकृपेपुढे नतमस्तक होते. ‘तो’ मोठ्या मनाचा. गळाभेट घेतो.
आपण एकरूप होतो. पारलौकिकाचा हा आनंद मिळायला कदाचित वेळ लागेल.
‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’ या
वृत्तीतून अलौकिकाचा वेध लागतो. मात्र ‘प्रतिमेहूनही प्रत्यक्ष निकट’ हे देखील
जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा हे लौकिक जग सुंदर करायला, कोणी थांबवलंय
का आपल्याला? ‘तो’ जर सोबतच असतो तर उचलावीत पावलं, बिनधास्तपणं, आत्मविश्वासानं,
संपूर्ण जबाबदारीनं. स्वरूपाला विश्वरूप व्हायला वेळ लागणार नाही. बिंब-प्रतिबिंब अशा
या खेळात निखळ आनंद आहे. तो निर्मळ मार्गानंच प्रत्ययाला येतो. चला, निर्मळ होऊ
या, सामूहिक शक्तीने जग सुंदर करूया!
वृंदा आशय
अतिशय छान विवेचन, वाचनस्वरही श्रवणीय
ReplyDeleteखुप छान सांगितलय छान विवेचन
ReplyDeleteचित्तवृत्ती निरोध, चित्ताच्या पाच अवस्था, अमन/निर्गम आणि अनासक्त होणे, नीरक्षीरविवेक,मन आणि बुध्दी यातील द्वंद्व, नवा दृष्टिकोन इत्यादी मुद्दे चिंतनशील आहेत.... लेख भावला .... शुभेछा
ReplyDeleteअतिशय सुंदर व सोप्या शब्दात सूत्राचे विवेचन केले आहे.
ReplyDeleteराधिका केमकर
Deleteखूप सुंदर.. वाचून आनंद होत आहे..खूप खूप शुभेच्छां..
DeleteKhup Chan Mam
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteअगदी सहजरीत्या सोप्या शब्दांत व्यक्त केले. खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteखूप सुंदर ...
ReplyDeleteVery nice .
ReplyDeleteखूप छान सहज व सूंदर शब्दाकंण मनाला भावल
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice and good information.
Deleteखुप अप्रतिम लेखन
ReplyDeleteखूप छान सांगितलय.
ReplyDeleteबहुत खूब ।
ReplyDeleteत्रिवेणी संगम! चिंतन,लेखन,अभिवाचनाचा.
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteखुप सुंदर लेखन.
ReplyDeleteकिती अप्रतिम शब्दांकन,
ReplyDeleteअगदी वास्तव डोळ्यासमोर उभे राहिले..😍
अत्यंत सुंदर लेखन व विवेचन
ReplyDeleteकित्ती अप्रतिम विश्लेषण !!!
ReplyDeleteखूप संज्ञा सहज स्पष्ट केल्या आहेत. अप्रतिम...
खुपच सोपे करून छान लिहिले आहे.....
ReplyDelete