Sunday, 11 July 2021

ये हृदयीचे ते हृदयी !

 

ये हृदयीचे ते हृदयी !

आषाढ मास सुरु झाला. सृष्टीचं नंदनवन फुललं. मनाला भक्ती-भावाचं चंदन लागलं. या प्रसन्न, सुगंधी परिसरातून महाकवी कालिदासांना वंदन. सृष्टीला कवेत घेत, भारतीय संस्कृतीतला चिरंतन प्रेमाचा वारसा जगापर्यंत पोचवणा-या, कालातीत साहित्यकृतींचं मनोभावे स्मरण! वृत्ती-प्रवृत्तींना प्रफुल्लित करणा-या या सुंदर वातावरणात वळूयात महर्षी पतंजलींच्या चौथ्या सूत्राकडे -
     

‘वृत्तिसारूप्यमितरत्र’ (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.४)

सूत्रार्थ -   निरोधाव्यतिरिक्त इतर अवस्थांमध्ये तो द्रष्टा चित्तातील वृत्तीशी सरूपता पावल्यासारखा असतो. द्रष्टा चित्तवृत्तीशी एकरूप झाल्यासारखा / तद्रूप झाल्यासारखा भासतो.

सूत्र क्र. ३ आणि ४ मधून महर्षी चित्ताचे लक्षण सांगतात. ज्याचा निरोध झाला असता द्रष्टा आपल्या स्वरूपाने अवस्थित असतो आणि ज्यात वृत्ती उत्पन्न झाल्या  असता द्रष्टा त्या त्या वृत्तीशी जणू  सरूपता पावतो ते चित्त. वास्तविक पाहता दोन्ही अवस्थांमध्ये द्रष्टा किंवा आत्मा निर्विकार असतो. मात्र चित्ताच्या विकारांमुळे तो वृत्तींशी तद्रूप झाल्यासारखा भासतो. वृत्तीशी तद्रूप झाला की त्याला स्वरूपाचे नाही तर वृत्तीचेच भान राहते. आपण वृत्तीबरोबर वाहत जातो. साक्षित्व सोडून इतर सर्व अवस्थांमध्ये आपलं मनाशी तादात्म्य असतं. विचारांच्या आधारे आपण वृत्तीशी एकरूप होतो. मुळात चित्त हे नेहमीच आपल्या शुद्ध स्वरुपाकडे जाण्याचा प्रयत्न करते. पण इंद्रिये त्याला बाहेर खेचत असतात. चित्ताचा संयम करून त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीला आळा घालणे, आत्म्याच्या दिशेने त्याला अंतर्मुख करणे, हीच योगाची पहिली पायरी आहे. चित्त फक्त माणसांमध्येच बुद्धीच्या रूपाने विकसित होते. त्यामुळेच वानराचा नर आणि नराचा नारायण ही उन्नत्ती शक्य होते.

दैनंदिन जीवनामध्ये वृत्तींचा विचार करताना, वृत्त, वृत्ती आणि वृत्ताकार हे तीन शब्द परस्परांच्या फार जवळचे वाटतात. कोणतंही वृत्त (बातमी) कळालं, मग ते मानसिक, वैचारिक, शाब्दिक, किंवा कृतीच्या पातळीवरचे असो. वृत्त कळताच वृत्ती निर्माण होतात आणि वृत्ताकार फिरत राहतात. पुन: पुन: तेच ते, तेच ते. घटना घडून गेली तरी स्मृतिरंजनाच्या माध्यमातून आपण ती घटना पुन: पुन: घडवत राहतो. जागेपणीच्या या छंदामुळे स्वप्नातही ती आपसूक घडते.

एखाद्यामध्ये रागाची वृत्ती पुन: पुन: निर्माण झाली की आपण म्हणतो, माणूस रागीट आहे. प्रेमाची वृत्ती पुन: पुन: निर्माण झाली की म्हणतो, माणूस प्रेमळ आहे. कोणी सतत आकडूपणाने वागला की आपण म्हणतो माणूस खडूस आहे. आपण माणसाला / स्वतःला वृत्ती समजतो. मात्र वृत्ती व आपण वेगळे असतो. आपण वृत्ती नव्हे तर  वृत्तीचे चालक असतो. स्वत:लाच वृत्ती समजल्याने, चलित समजल्याने वृत्तींच्या भडीमाराने, गदारोळाने आपण विचलित होतो. अंत:रंगाला रणभूमी करण्यास आम्हीच कारणीभूत असतो. मग आमच्यातला गर्भगळीत अर्जुन बाहेर कृष्णाचा शोध घेत राहतो. वृत्तीचे चालकपण थांबवून आपण द्रष्ट्याची भूमिका घेतली, की ज्ञान प्राप्त होऊ लागते. द्रष्टा स्थित व्हायला लागतो.

द्रष्टा स्थित व्हायला लागला म्हणजे स्वत:ची ओळख पटायला लागते. समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे सामर्थ्यही येते. अन्यथा इतरांसारखं करण्याच्या प्रयत्नात आयुष्य दडपणाखाली येते, प्रवाहपतित होण्याचीही शक्यता असते. द्रष्टा स्थित व्हायला लागला की आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. फूल फुललंय हे त्याची गंधवार्ताच वा-यावर पसरवते. त्यासाठी प्रत्येक वर्तमान क्षण समरसून जगता आला पाहिजे. खळखळून हसावं, हमसून हमसून रडावं, कडकडून भांडावं. जीवनाची मजा आहे त्यात. उगा काय कुढत बसायचं? संवेदनशीलतेने जगणं महत्त्वाचं. वरवरचं जगणं, आभासी जगणं टाळता आलं पाहिजे. ‘मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया’ अशी अवस्था काय कामाची? 

नैसर्गिकतेनं जगताना काटा टोचल्याचं दु:ख नसतं. पण फूल बोचायला लागलं की साशंकता वाढते. आपल्या मनामध्ये नकारात्मकता, द्वेष, सूड यासारख्या भावना निर्माण व्हायला लागतात. तिथल्या तिथे न संपता त्या कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. विचार करावा आणि मनाची इम्युनिटी पॉवर वाढवावी. विचार एक शक्ती आहे. तिचा सुयोग्य वापर करता यावा. विचारांच्याच पातळीवर प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देण्यास लागलो तर कृती अधिक निश्चयी आणि सकस होतील. रिअॅक्शनच्या ऐवजी रिसपॉन्स देण्याची स्वत:ला सवय लावली की आपल्यातला वर्तमान क्षणात जगणारा रिसपॉन्सिबल माणूस घडायला लागतो. भूतकाळातल्या क्षणांची बातमी होते आणि भविष्यकाळातले क्षण वेधमय असतात. बातमीत गुंतू नये आणि वेधात अडकू नये.

ऑनलाइन प्रणालीद्वारे आभासी जगात वावरत असताना एक पालुपद आपण अनेकवेळा ऐकतो - यू आर नॉट कनेक्टेड. त्याबरोबर जाणीव होते अडथळा निर्माण झाल्याची. बहिरंगाकडून अंतरंगाकडच्या प्रवासात ‘स्टे कनेक्टेड विथ युवरसेल्फ’ हे खूप महत्त्वाचे आहे. तो श्रीरंग रंग खेळतोना तसा. रंग खेळताना तो नखशिखान्त भिजतो. मात्र रंगातून बाहेर आल्यावर एक शिंतोडाही त्याच्या अंगावर दिसत नाही. तसं युक्त होऊन मुक्त व्हावं. जीवनाचा सुंदर अनुभव घ्यावा.

बहुतांश वेळा आमचे विचार पूर्वानुभवावरच नव्हे तर पूर्वग्रहावर आधारित असतात. नव्या अनुभवाला मोकळ्या मनाने आम्ही सामोरे जाऊ शकत नाही. खुल्या मनाने (ओपन माईंड) जगता आले पाहिजे. खुल्या मनाने एकरूप झालो तर घटनांची वस्तुनिष्ठ, अचूक, नेमकी माहिती आपण घेऊ शकतो. त्याआधारे तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करू शकतो. या एकरूपतेशिवाय साहित्यातून, संगीतातून, नृत्यातून समाधीचा आनंद कसा मिळणार? कला, संशोधन, विज्ञान सारं शेवटी आनंदाकडेच वळतं.  एकरूपतेतूनच सौंदर्याचा प्रत्यय येतो. सत्याचा स्वीकार, शिवत्वाची/ मांगल्याची कामना करत झाला की सौंदर्य फुलतं. विचारांच्या शक्तीने असं सौंदर्य समाजमनामध्ये निर्माण झाले की, ‘ये हृदयीचे ते ह्रदयी’ व्हायला वेळ लागत नाही. विश्वमनाची मशागत झाली की सृजनाचा,समृद्धतेचा, सत्य-शिव-सुंदराचा प्रत्यय येणारच. संत ज्ञानदेवांचं पसायदान प्रत्यक्षात उतरणारच. त्यासाठी प्रत्येकाने एकच करायला हवं - स्टे कनेक्टेड. स्टे सेफ.

वृंदा आशय

 















7 comments:

  1. वाह..खूप सुंदर मार्गदर्शन मिळाले..

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माडणी

    ReplyDelete
  3. खूप सुंदर,'साक्षी भाव' सांगितला.

    ReplyDelete
  4. आशय व अभिव्यक्तीचं अभिन्नत्त्व असलेला सुंदर ब्लॉग ...

    ReplyDelete
  5. सदरील लेख विचारप्रवर्तक आणि अंतर्मुख करणारा आहे. तद्वतच त्याचा आशय थेट आजच्या जगण्याला भिडणारा आहे. माणसाचे अंतरंग प्रज्वलित करणारा आहे. साक्षीभाव, तादात्म्यशीलता, मनोभावे जगणे,react and respond यातील मुलभूत फरक, stay connected, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणे ही विचारसरणी आजमितीस आवश्यक आहे.
    लेख खूप आवडला. धन्यवाद.

    ReplyDelete

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...