Showing posts with label पतंजलि. Show all posts
Showing posts with label पतंजलि. Show all posts

Sunday, 12 September 2021

जागर संकल्पांचा !

 





जागर संकल्पांचा !


    पहाटे अंगणात जाणं हा आता माझा परिपाठ झाला आहे. सृष्टीची अपार शांती हृदयात भरून घेतल्याशिवाय तुमच्याशी बोलताच येत नाही मला. दारी फुललेला चांदीपाट, बहरलेला प्राजक्त मला धुंद करतो आहे. आकाशीचे नक्षत्र आणि फुलातलं साधर्म्य, ‘नक्षत्र माझ्या दारी आल्याचं’ सुख देत आहेत. दारी ‘मोती पोवळ्यांच्या राशी’ असं म्हणणाऱ्या बहिणाबाई आतमध्ये साद घालत आहेत. ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती’ असं म्हणणारे, कवी  कुसुमाग्रज पुन्हा जागे होत आहेत. कविराज आपल्या शब्दांनी, कल्पनांनी, प्रेमाच्या, पराक्रमाच्या उदात्त भावनांनी आमच्यातला वाचक घडवला. नाशिकला तुमच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं, तेव्हा अपार तृप्तीचा अनुभव घेतला. कविवर्य तुम्हाला वंदन !  तुमच्याच प्रेरणेतून सांगते, ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती, अक्षरांचा संग त्याला लाभणार आहे’. प्रिय वाचकांनो किती विषयांवर भरभरून बोलावं वाटतं मला तुमच्याशी. कृष्णसखी होऊन अभंगांबद्दल बोलत राहावं वाटतं. ज्या कवितांवर मी आयुष्यभर प्रेम केलंय, त्या कवितांचे विवेचन घेऊन तुमच्याकडे यावं वाटतं. येईल, निश्चितच लवकर येईल !

‘जनी जनार्दन’ म्हणणारे संत मला दिसतात. काय ‘जनी जनार्दन’ एका विशिष्ट काळातच होता का? नाही. तो कालातीत आहे. तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. ‘जन हे वोळतु जेथे’ म्हणणारे शरच्चंद्र मुक्तिबोध मला भावतात. सामान्य जनांनी आपलं सामर्थ्य पणाला लावलं, म्हणून स्वतंत्र झालेली भूमाता मला दिसते. म्हणूनच आज, जेव्हा बुद्धिदाता गणेश आणि माय, माता महालक्ष्मी अधिष्ठित झालेले आहेत तेव्हा त्यांना आशीर्वाद मागते, देवी सरस्वतीची उपासना अखंडपणे करण्याची अनुमती मला द्या. मायमाऊली हृदयी वसते, डोळे मिटता सर्वत्र दिसते! हे देवा, हे संपूर्ण जीवन प्रार्थना होऊन जाऊ दे !

 

आज आपण महर्षी पतंजलींच्या तेराव्या आणि चौदाव्या सूत्राचा एकत्रित विचार करणार आहोत. पाहता पाहता १२ सूत्र झाली. बारा हा अंक तपाचा निदर्शक. तुमच्यामुळे हे तपाचरण शक्य झालं. तुमच्या साथीनं घडलं. म्हणून त्याचा आनंद मी तुमच्याजवळ व्यक्त केला पाहिजे. काय घडलं नाही या तपाचरणात? नियम पालनापासून सुरुवात केली आणि थेट श्रीकृष्ण दर्शनाच्या सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचलो. योगसूत्रांची ही ताकदच निराळी. स्वतःकडे पाहायला लागलं की परब्रह्म आपसूक भेटते. परब्रह्माच्या दर्शनानं आपणही नि:शब्द झालात. आपला प्रवास प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतो. उत्सवी शब्दांनी, अभिनंदनीय शब्दांनी सुरू झालेला हा तुमचा प्रवास मोठ्या वेगात आणि जोशात चालू होता. पण त्या श्रीकृष्णाचे दर्शन घडताच आपणही थबकलात. इतकी प्रामाणिक प्रतिक्रिया ! सर्व सहप्रवाशांची मी कृतज्ञ आहे !

तत्र स्थितौ यत्नोSभ्यास: ||१३||

(सूत्रार्थ - निरोधात चित्ताची स्थिरता साधण्यासाठी केला जाणारा जो यत्न तो अभ्यास होय.)

१३ व्या सूत्राच्या विवेचनात योगाचार्य कोल्हटकर म्हणतात, “पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय हे निरोधाचे स्वरूप होय. एकाग्रतेच्या अभ्यासाने अंत:करणात हे सामर्थ्य विकसित होते. अंत:स्फूर्त सामर्थ्याने क्षणमात्र घडलेल्या निरोधाचा सुद्धा चित्तावर संस्कार घडत असतो. हा संस्कारानुभव अंत:स्फूर्त सामर्थ्याला उपकारक ठरतो. निरोधाचा क्षणाक्षणाने वाढता अभ्यास निरोधकाल वाढवतो. सुरुवातीला खंडित होत जाणारा हा निरोधकाल वाढत्या अभ्यासाने अखंडित होत जातो.”  

‘अभ्यास’ या संकल्पनेबद्दल आपण मागच्या सूत्रात विस्तृत संवाद साधला. त्यामुळे आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत १४ व्या सूत्राकडे. ‘अभ्यास कसा करावा’, याकडे.

 

स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि: || १४ ||

(सूत्रार्थ – पण तो अभ्यास दीर्घकाल, खंड न पडता, आणि आदरपूर्वक केला म्हणजे तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो.)

हे १४ वे सूत्र मला खूप आवडते. त्यामुळे मी ते अनेक ठिकाणी उद्धृत करत असते. का माहीत नाही, पण कदाचित माझ्या स्वतःमध्ये या गोष्टींचा अभाव असल्यामुळे ते मला अधिक भावत असेल. बऱ्याच वेळेला काय होतं जे आपल्याकडे नसतं त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. आणि मग त्या गोष्टीबद्दल आपण भरभरून बोलायला लागतो. असो. इथे अभ्यास म्हणजे यत्न, प्रयत्न आणि हा प्रयत्न ज्यातून प्रत्यक्ष व्यक्त होतो ते कर्म लक्षात घेऊन पुढील विवेचन केलेले आहे.  

आपले १४ वे योगसूत्र सांगते, दीर्घकाल आणि निरंतर केलेला अभ्यास सार्थकी लागतो. हे थोडसं आपण विस्तारानं पाहू. यात दीर्घकाळ म्हणजे किती दीर्घकाळ? साधारणपणाने आपण पाहतो, प्रत्येक कामाचा एक विशिष्ट असा वेळ ठरलेला असतो. तितक्यावेळ ते काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं दैनंदिन जीवनात तो, दीर्घकाळ ही संकल्पना साधण्याचा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ एक घास बत्तीस वेळा चावून खावा, साधारणपणे ४५ मिनिटे व्यायाम करावा, दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आवश्यक तो वेळ देत आपण प्रत्येक काम पूर्ण केले पाहिजे. दीर्घकाळ याचा अर्थ उगाच थांबत थांबत, कंटाळा करत, आपल्या दैनंदिन भाषेत ‘टाईमपास करत’ असा काहीही होत नाही. उलट ज्या गोष्टीला जो काळ आवश्यक आहे, त्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने आपण काम केले पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो.

 हे काम निरंतर करावे असे महर्षी सांगतात. निरंतर म्हणजे काय, तर सातत्याने. उदाहरणार्थ आमचे विद्यार्थी मित्र परीक्षा जवळ आली की दीर्घकाळ अभ्यास करतात. दीर्घकाळ म्हणजे त्यांच्यासाठी परीक्षेच्या पेपरच्या आदल्या दिवशीची रात्र. निरंतर या संकल्पनेमध्ये हा धोका टाळणे कुठेतरी महर्षींना अपेक्षित असावे. ‘निरंतर’ या संकल्पनेचा अर्थ विशिष्ट अभ्यासाच्या संदर्भाने लक्षात घेताना तो अभ्यास वर्षभर करायचा, असं सांगता येईल. ज्या अभ्यासक्रमाला, ज्या कोर्सला आपण प्रवेश घेतलेला आहे, त्या कोर्सचा अभ्यास त्याच्या निहित कालात, सातत्याने करणे, दररोजचा काही ठराविक वेळ त्यासाठी बाजूला काढणे आणि दररोज तो अभ्यास करणे असा ‘निरंतर’ याचा अर्थ होतो. योगाभ्यास निरंतर करायचा म्हणजे काय, तर दररोज पाऊण तास आपण योगाभ्यास केलाच पाहिजे. दुर्दैवानं सध्या आपली योगाभ्यास ही संकल्पना ‘योग म्हणजे आसन प्राणायाम’ इतकीच मर्यादित आहे. जेव्हा आपण योगाची आठ अंग समजून घेऊ शकू, त्या वेळेला ‘योग म्हणजे जीवन आहे’ आणि जीवनभर हा अभ्यास निरंतर करत राहायचा असतो, म्हणजे काय, हे आपल्याला लक्षात येईल.

निर् + अंतर असा या शब्दाचा विग्रह होतो. निर् हा उपसर्ग अंतर या शब्दाला लागलेला दिसून येतो. निरंतर जिथे अंतराचा अभाव आहे, म्हणजेच एकदा जे काही ठरवलं ते सातत्याने आपण केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो भाग बनला पाहिजे. त्याने काय होईल तर आपल्याला ती ‘सवय’ लागेल. वयासह, वयासोबत जी वाढते ती सवय. आपली सवय आपला स्वभाव घडवत असते. ज्या सवयी आपण स्वतःला लावत असतो त्या सवयीबद्दल आपण किती जागरूक राहणं आवश्यक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. समजतं.

 सवयीने आपण अनेक गोष्टी आपसूक करत असतो. काही वेळेला तिथे सजगता नसली तरीसुद्धा सवयीने त्या घडून जातात. मग आपल्या स्वभावावर, स्वतःच्या घडण्यावर, स्वतःच्या अस्तित्वावर जी इतकी परिणामकारक ठरते, त्या सवयीच्या बाबतीत आपण किती जागरूक राहिले पाहिजे ! डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, “तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतील.” हे साहजिकच आहे. सवय स्वभाव घडवते, स्वभाव कर्तृत्व घडवतो. स्वाभाविक रित्या हे कर्तृत्व हेच आपलं भविष्य घडवणार आहे. आपल्या कृतीच्या मुळाशी आपण केलेला विचार असतो. तो विचार आपल्या कृतीला प्रभावित करत असतो. म्हणून आपण सातत्यानं, निरंतर  सकारात्मक विचार का केला पाहिजे याचंही कोडं, आपल्याला इथे उलगडतं.

निरंतर याचा अर्थ आपल्याला कळाला. आता सत्कारपूर्वक किंवा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारचा उल्लेख महर्षी का करतात? आदर, सत्कार हे शब्द आपल्याला तसे औपचारिक वाटतात. काही विशिष्ट औपचारिक प्रसंगांच्या वेळेलाच आदर - सत्कार करायचा असतो, अशी आपली स्वाभाविक धारणा असते. मात्र आपण आपल्या जीवनाची जी भूमिका निश्चित करत आहोत, ज्या सवयीतून, दृष्टिकोनातून आपण स्वतःला घडवत आहोत, स्वभाव घडवत आहोत, त्यातून कर्तृत्व साकारत, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर दैनंदिन जीवनाचा आपल्याला आदर वाटला पाहिजे.

दैनंदिन जीवनाकडे आपण ज्या श्रद्धेने, ज्या निष्ठेने पाहू शकू ती श्रद्धा आणि निष्ठा आपल्यातली ही सत्कारपूर्वकता जोपासणारी आहे. आणि मग त्या भूमिकेतून जेव्हा आपण स्वीकारलेल्या कामाकडे, करत असलेल्या कर्तव्याकडे पाहू शकतो, तेव्हाच ते कर्तव्य परिपूर्ण होऊ शकतं. आपण त्याकडे त्राग्याने, वैतागाने, हे माझ्याच वाट्याला का?, मला करायचं नाही पण मला करावं लागतं, अशा भावनेतून जर पाहायला लागलो तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, आपल्या वर्तमानावर, आपल्या सभोवतालावर, आपल्या संपर्कातील व्यक्तींवर झाल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचा वर्तमान हा असा कटकटीचा, तापदायी असतो, त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कारण वर्तमान क्षण, पुढच्या क्षणाला इतिहास झालेला असतो. जिथे इतिहास प्रेरक असतो, तिथे  भविष्य उत्तम, उज्ज्वल घडू शकतं. प्रेरणा माणसाला नेहमी अधिक सकारात्मकतेकडे आणि ऊर्ध्वगामी नेत असते. हा प्रगतीकडचा प्रवास आपल्याला करायचा असेल, तर तो दीर्घकाळ, निरंतर आणि सत्कारपूर्वकतेने, आदराने, आस्थेने केला की या सगळ्याचं एक दृढ अधिष्ठान तयार होतं.

जिथे अधिष्ठान दृढ असतं, त्या दृढ अधिष्ठानाला काळाचं, परंपरेचं, पिढ्यापिढ्यांच संचित लाभत असते. हे संचित, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य हे आपल्या वर्तमान क्रिया प्रतिक्रियांवर प्रभाव टाकत असतं. त्यामुळे असा दृढतेने केलेला अभ्यास निश्चितच फलदायी होतो, याबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

अशी दृढभूमी, दृढ अधिष्ठान घडवण्यामध्ये केवळ आपलाच सहभाग असता तर ती कदाचित लवकरही झाली असती. मात्र या प्रक्रियेवर आपला सभोवताल प्रभाव टाकत असतो. आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, ज्या ठिकाणी वावरतो अशा सर्व ठिकाणची माणसं या ना त्या प्रकाराने आपल्याशी संबंधित असतात. तिथले नियम, तिथल्या योजना, तिथल्या धारणा या सगळ्याच गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच कुठलाही अडथळा आला तरी त्याचं संधीत रूपांतर करत आपण दृढ राहणं गरजेचं असतं. अशा संघर्षातून निर्माण झालेली दृढभूमी अढळपद प्राप्त करते. त्यासाठी पॉन्डिचेरीच्या माताजींनी दिलेला संदेश अनुसरावा लागतो -

Do not aim at success. Our aim is perfection. - The Mother .

वृंदा आशय

Sunday, 1 August 2021

ज्ञानदीप तेवत राहो

 

ज्ञानदीप तेवत राहो

 

वडीलधा-यांनी आशीर्वाद दिले, सहका-यांचे प्रोत्साहन मिळाले, योग तज्ज्ञांनी कौतुकाची थाप दिली, मग मनोवृत्ती प्रफुल्लित होणार नाहीत का? मन आनंदी झालं की मनाची कवाडं उघडतात. बंद दरवाजे उघडले की मोकळं वारं खेळायला लागतं, स्वच्छ प्रकाश पसरायला लागतो. स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसायला लागतं. खूप काही कळायला, समजायला लागतं. माणूस ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. तेव्हा या प्रफुल्लित मनोवृत्तीने वळूयात महर्षी पतंजलींच्या सातव्या सूत्राकडे जे ज्ञानप्राप्तीची प्रमाणे विषद करते-

प्रत्यक्षानुमानागमा: प्रमाणानि || (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ७)

(सूत्रार्थ - प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम ही तीन प्रमाणे होत.)

सहाव्या सूत्रामध्ये महर्षींनी प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती या पाच प्रमुख मनोवृत्ती असल्याचे निर्देशित केले आहे. सातव्या सूत्रामध्ये ‘प्रमाण’ या पहिल्या वृत्तीबद्दल ते स्पष्टीकरण देतात. या वृत्तीचे तीन प्रकार. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये याचा सूत्रार्थ सांगताना स्वामी विवेकानंद नोंदवतात – प्रत्यक्षानुभव, अनुमान व आप्तवचन (अधिकारी व्यक्तींचे शब्द) ही प्रमाणे होत.

         स्वामीजी सांगतात प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे जे काही आपण पाहतो किंवा अनुभवतो ते. इंद्रियांना भ्रमात पाडणारी कोणतीही गोष्ट न घडल्यास मला जे दिसेल वा अनुभवास येईल ते प्रमाण मानलं पाहिजे. मी हे जग पाहतो, अनुभवतो हाच जगाच्या अस्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे. याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. प्रति + अक्ष = प्रत्यक्ष. आपल्या डोळ्यांसमोर जे घडतं ते प्रत्यक्ष. डोळ्यांबरोबरच कान, नाक, जीभ व त्वचा ही सर्व ज्ञानेन्द्रिये प्रत्यक्ष प्रमाण देतात. ऐकल्याबरोबर मन ध्वनीच्या उगमापाशी सरूपता साधतं, गंध आल्याबरोबर त्याच्या उगमाशी, चव लागल्याबरोबर त्याच्या मूळ कारणाशी तर स्पर्शाबरोबर मोहरलेले मन त्या अनुभवाशी सरूप होतं. हे असं मूळापाशी जाणं घडत असतं म्हणून ती प्रमाण वृत्ती. पाचही ज्ञानेंद्रियांकडून येणार ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण या सदरात मोडतं, असं योगशास्त्राचे अभ्यासक डॉ. प.वि.वर्तक यांनी आपल्या, ‘पातंजल योगदर्शन : विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथामध्ये नोंदवलेलं आहे.

         अचूक स्वरुपात ज्ञानग्रहण करण्यासाठी आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. लहान मुलांची ही क्षमता अगदी तीव्र आणि तीक्ष्ण असते. त्यामुळे अनुभव त्यांच्या थेट आत उतरतो. अनुभवाचा अर्थ लावणारे मन, बुद्धी सक्षम पाहिजेत. माणसाने हलक्या कानाचे, दुर्बल मनाचे नसावे. त्यातच आजच्या काळात पाहणे म्हणजे फक्त समोर घडणारेच नाही. यंत्रांच्या माध्यमातून पाहणे अधिक घडते. दुर्बीण दूरपर्यंतचे दाखवू शकते तर टीव्ही, मोबाईल सगळं जग समोर आणून ठेवतात. संगणक, मोबाईल हाताळताना आमची तारांबळ उडते. सगळे पर्याय  तिथेच असतात पण पाहता येत नाहीत. करून पाहण्याची तयारी नाही. आपण होऊन माहिती, ज्ञान घेण्याची उत्सुकता नसते. संयम आणि चिकाटी नसते. ते वाढवले पाहिजेत.

    मात्र दरवेळी प्रत्यक्ष प्रमाणाचा आग्रह धरता येत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाला काही मर्यादा पडतात. ज्ञान तर त्याच्या व्यापक आणि मूळ स्वरुपात होणे आवश्यक आहे. त्यामुळे आणखी काही प्रमाणे ठरवलेली आहेत. अनुमान हे दुसरे प्रमाण होय. मनाचे या अर्थी मान हा शब्द तयार होतो. मनाचे ज्ञान म्हणजे मान होय. उदाहरणार्थ मी असे मानतो. शेवटी आपल्या मानण्या, न मानण्यावर, सामूहिक मान्यता देण्यावर आपण ‘प्रमाण’ काय ते ठरवत असतो. मनाच्या मागोमाग येते ते ‘अनुमान’ होय. तर्क होय. एखाद्या चिन्हावरून त्यानं सुचवलेल्या वस्तूचं ज्ञान होतं. उदा. धूर पाहून तिथे अग्नी आहे असे ज्ञान झालं, याला म्हणतात अनुमान प्रमाण. रेडिओवर गायक गातो. आपण आवाजावरून ओळखतो, कोण गात आहे ते. फुलं समोर  दिसत नसले तरी दुरूनच सुगंध येतो. फुलं दिसत नाहीत पण आपण अचूक ओळखतो कोणती फुलं आहेत मोगरा, गुलाब, निशिगंध की रातराणी, सहज सांगतो. मागच्या अनुभवावरून ते ओळखतो. अनुमाना मुळे स्थलकालाची मर्यादा ओलांडली जाते. पूर्वी काय घडले होते आणि पुढे काय घडणार याचा अंदाज बांधता येतो. आपल्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे हे अनुमान बरोबर किंवा चूक  ठरते.

         
आगम हे तिसरे प्रमाण आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते आगम प्रमाण म्हणजे आप्तवाक्य. आप्तवाक्य म्हणजे ज्यांना सत्याचा मूर्त साक्षात्कार झालेला आहे अशा योग्यांची प्रत्यक्ष अनुभूती. जो विशुद्ध सत्वाचा योगी असतो, जो पवित्र, निर्मोही, नि:स्वार्थी, नि:संग आणि अतिंद्रीय ज्ञानी असतो त्याला भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व उघड्या पुस्तकासारखे वाचता येतं. त्याचे शब्द प्रमाण असतात. कारण ज्ञानाचा त्याला स्वतःच्या अंतर्यामी साक्षात्कार झालेला असतो. तो सर्वज्ञ असतो. असेच पुरुष शास्त्रांचे प्रणेते असतात आणि म्हणूनच शास्त्र ही प्रमाण होत.

         डॉ. प. वि. वर्तक ‘आगम’ प्रमाणाचा वेगळा अर्थ लावतात. त्यांच्या मते काही वेळा अनुमान करणे जमत नाही कारण आपले ज्ञान त्या तोडीचे नसते. मग ‘आगम’ हेच प्रमाण असते. आगम म्हणजे आपल्यापर्यंत आलेले ज्ञान. हे ज्ञान आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत येते किंवा वर्तमानकालीन ज्ञानी माणसांकडून आपल्यापर्यंत येते. माणसाच्या मर्यादित आयुष्यात सर्व ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने मिळवणे केवळ अशक्य असते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण आगम प्रमाण व्यक्त करते. इतरांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण ज्ञान कमावणे म्हणजे आगम. हे इतर म्हणजे जगातील यच्चयावत लोक. कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंतचे सारेच यात सामावले जातात.

    आगमाची अशी व्यापकता वाढली की ज्ञानाचे पावित्र्य जाणीवपूर्वक  टिकवावे लागते. ज्ञान हे सत्यज्ञान असले पाहिजे. ते पूर्वज्ञानाला विरोधी नसावे. शास्त्राच्या कसोटीवर कोणालाही पारखून घेता यावे. ज्ञान आणि ज्ञानोपासकाचे चारित्र्य या दोघांचेही तेज परस्परावलंबी असते. लोक आणि श्लोक हे दोन शब्द एकमेकांच्या फार जवळ जातात. लोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारली पाहिजे. माहितीचा पसारा न देता ज्ञानाचे मांगल्य पुढे नेता आलं पाहिजे.

    आज मला मोठा आनंद आहे. या सूत्राचे विवेचन करत असताना वर निर्देशित केलेल्या सर्व गुणांनी युक्त अशा दोन महापुरुषांचे संदर्भ आजच्या दिवसाला आहेत. या ज्ञानी, कर्तृत्ववान आणि कल्याणकारी अशा  महापुरुषांची एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी आहे.

    .....पण खेद याचाच आहे, सामान्य माणसापर्यंत पोहचलेलं ज्ञान त्याला सांगतंय, कोणत्याही एकाच महापुरुषाचा पुरस्कार कर. पर्यायाने वास्तव इतिहासाचा तिरस्कार कर. आपल्या भूमिकेने वर्तमानात हाहाकार निर्माण करणा-या माणसाने, समाजाने आत्मपरीक्षण करून आपले काय चुकतंय याचे ज्ञान करून घेणे, ही काळाची गरज आहे.

वृंदा आशय   

Sunday, 18 July 2021

केल्याने देशाटन

 

केल्याने देशाटन

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन |

योSपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोSस्मि ||

योगशास्त्राने मनाचा, व्याकरण शास्त्राने वाणीचा आणि वैद्यकशास्त्राने शरीराचा मळ नष्ट करणाऱ्या, महामुनी पतंजलींपुढे मी नतमस्तक आहे. इसवीसनपूर्व २०० हा महामुनी पतंजलींचा कालखंड मानला जातो. ‘योगसूत्र’, अष्टाध्यायीवरील ग्रंथ ‘महाभाष्य’ आणि ‘आयुर्वेदावरील भाष्य’ हे त्यांचे साधनारूपी लेखन-चिंतन म्हणजे भारतीय संस्कृतीला मिळालेली मोलाची देणगी आहे.

भारतीय दर्शनाच्या सहा दर्शनांमधील एक हे मुख्य स्थान योगसूत्रांना मिळालेले आहे. पतंजली मुनींचं हे जीवनचिंतन इसवीसनपूर्व काळापासून एकविसाव्या शतकापर्यंत प्रवाहीत होत आलेले आहे आणि पुढेही अखंड प्रवाहीत होत राहणार आहे. त्यांची ही योगसूत्रे आम्हाला आजही महत्त्वाची वाटतात, आजही त्यांच्या विवेचनाकडे आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे वाटते, याचा प्रत्यय तुम्हीच तर मला दिलात. जगभरात देशोदेशी विखुरलेले माझे भारतीय बांधव, माझे मराठी सुहृद ज्या पद्धतीने या ब्लॉगला वाचत आहेत, प्रतिसाद देत आहेत, तुमच्या या वाचनातून, प्रतिसादातून त्याचं प्रत्यंतर माझ्या मनापर्यंत गेलं. भारताव्यतिरिक्त ११ देशांमधून आपण याचे वाचन करत आहात. कालातीत असणाऱ्या आणि शाश्वत ठरलेल्या मार्गदर्शक महामुनी पतंजलींना, म्हणूनच माझ्या - तुमच्याकडून, आपल्या सर्वांकडून साष्टांग दंडवत !

वळूयात पाचव्या योगसूत्राकडे –

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ||५||  

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.५)

वृत्तींचे प्रकार आणि स्वरूप या सूत्राद्वारे मांडले गेले आहेत. महामुनी सांगतात, वृत्ती असंख्य असल्या तरी पाच प्रकारात त्याचे वर्गीकरण करता येते. त्या पाच प्रकारांचे वर्गीकरण देखील ‘क्लिष्ट’ व ‘अक्लिष्ट’ म्हणजेच ‘क्लेशकारक’ आणि ‘अक्लेशकारक’ अशा दोन वर्गांमध्ये केलेले आहे.

क्लेश - दुःख हा शब्द उच्चारताच मला वाटायला लागलं, खरोखर दुःख हेच तर शाश्वत आहे. इथे दिवसभरातून किती वेळा मन मोडत असेल, मन खट्टू होत असेल, नाराज होत असेल त्याची गणतीच नाही. किती काय काय असतं मनामध्ये! मान मोडून काम केले तरी मनासारखं काही होईल तर, शपथ! आणि मग असं नाही झालं तर दुःख वाटणारचना. क्लेश वाटणारच. आमच्या साधुसंतांनी साहित्यिकांनी हेच तर सांगून ठेवलं आहे – ‘सुख पाहतां जवापाडें | दुःख पर्वताएवढें’ हे संत तुकारामांचे सांगणे असू द्या किंवा

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’

या सारखं ग.दि.माडगूळकरांचं अजरामर गीत असू द्या. ते आम्हाला आमच्या शाश्वत चिरंतन अशा दुःखाचीच जाणीव करून देतं ना.

इथे तर पतंजली मुनी सांगतात क्लेशकारक आहे ते सोडलं पाहिजे. आपण सोडतो पण काय सोडतो, ज्याचा त्रास शरीराला होतो ते सोडतो, आणि ज्याचा त्रास मनाला होतो ते मात्र धरतो. अर्थात शारीरिक कष्ट आम्ही सोडतो आणि मानसिक कष्ट वाढवतो. नकारात्मक गोष्टींमध्ये, दुःखामध्ये त्याच त्या आवर्तामध्ये आम्ही फिरत राहतो. मग आम्हाला आयुष्यच क्लेशकारक वाटायला लागतं.  जीवन जगण्याची कला अवगत करता आली पाहिजे. मला तर वाटतं ही कला माणसाजवळ उपजत असतेच. आपल्या सवयींनी, कामांनी पर्यायाने स्वभावामुळे आपण तिला हरवून बसतो.            

माणूस वयानं मोठा होत जातो तसतशी त्याची संवेदनशीलता कमी व्हायला  लागते. बालपण संपुष्टात यायला लागतं. तुम्ही म्हणताल वयासोबत प्रगल्भ व्हायचे नाही का? बालीशच राहायचं का? प्रगल्भ होणं म्हणजे असंवेदनशील होणं नव्हे. उलट कोणत्याही संवेदनशीलतेला अधिक जबाबदारीनं दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रगल्भता. बालीशपण निराळं आणि स्वत:मधलं बालपण जोपासणं निराळं.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा केशवसुतांनी व्यक्त केलेला बाणा आणि दिलेला संदेश सर्वपरिचित आहे. अहेतूकपणे, निरागसतेने प्रश्न विचारत हे बालमन आपल्या सभोवतीच्या जगाची ओळख करून घेत असतं. उत्स्फूर्तपणे व्यक्त होत स्वत:च्या प्रतिक्रिया नोंदवत जातं. मोठं व्हायला लागतो तसे प्रश्न हरवायला लागतात. मला वाटतं, प्रश्न हरवतात कारण आयुष्यासंबंधी, माणसांसंबंधी, नात्यांबाबत आपले अनेक ग्रह तयार होतात, आपण गृहीत धरायला लागतो. न जाणताच अनेक गोष्टींची उत्तरे मिळाल्यासारखे वागायला लागतो. आपण विचारलेल्या प्रश्नांमागेही विशिष्ट हेतू कार्यरत झालेले असतात. मग अहेतूकता, निरागसपण कसं राहणार? प्रश्न पडले पाहिजेत जिज्ञासेनं, त्यांचा पाठपुरावा करता आला पाहिजे सहजतेनं. आपलं बालपण जपता आलं पाहिजे ते उत्स्फूर्तता आणि उत्कटता सांभाळून ठेवत. उत्कटता आपल्याला आयुष्यभर साथ देते, जीवन रसरशीतपणे जगायला शिकवते.

क्लेश आणि क्लेशकारक अवस्था - व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, मानवी समाज – जग, या पातळ्यांनुसार बदलत जाते. कुटुंबाच्या भल्यासाठी व्यक्तिहिताचा दुराग्रह आम्हाला सोडता आला पाहिजे, त्याला ‘स्वार्थत्याग’ म्हणतात. समाजाच्या भल्यासाठी कुटुंबाला कष्ट पडले तरी, ते आम्हाला सोसता आले पाहिजेत त्याला ‘चिकाटी’ म्हणतात. देशाच्या भल्यासाठी विशिष्ट समाजाच्या भलेपणाचा अट्टहास आम्ही सोडला पाहिजे त्याला ‘सामंजस्य’ म्हणतात. मानवी समाजाच्या, जगाच्या कल्याणासाठी देशांना पुढाकार घेता आला पाहिजे, त्याला देशाचा स्वभाव – ‘राष्ट्रधर्म’ म्हणतात.

भारतीय संस्कृतीने, देशाला नव्हे जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे ‘भारताचा अध्यात्मिक स्वभाव’ होय. भारताला मानवी कल्याणाची असलेली आत्मिक ओढ त्यातूनच निपजली आहे. भारत सांगतो माणसानं ‘धर्मानं’ वागावं म्हणजे क्लेशकारक काही घडत नाही. ही सृष्टी, हे ब्रह्मांड ज्या तत्त्वानं, ज्या नियमानं चालतं ती मूलभूत तत्त्वं म्हणजे धर्म. या नियमांशी नातं सांगत जीवनाची घडी बसवली की ते आपोआप धर्माधिष्ठित जीवन होते.

आपल्या संस्कृतीने प्रत्येक नात्याला, प्रत्येक भूमिकेला विशिष्ट धर्म दिलेला आहे. तो धर्म आम्ही यथास्थितपणं सांभाळला की क्लेशकारकतेला आमच्या जीवनात प्रवेश करण्याची अनुमती नाही. मात्र जेव्हा आम्ही आमचा धर्म सोडतो, तेव्हा आमची नाती शबल आणि दु:खदायी व्हायला लागतात. समाजातील अनेकविध घटना पाहता लक्षात येतं, आमची नाती कलुषित होत आहेत, शरमेनं मान खाली घालत आहेत. असं घडतं तेव्हा, आई-वडिलांचं आणि मुलांचं, भावा-बहिणीचं, पती-पत्नीचं, नणंद-भावजयीचं, सासू-सूनेचं नातं संशयाचे प्रश्न आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करायला लागतं. कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया आहे. जे जे क्लेशकारक आहे ते सगळं सोडून हा पाया भक्कम करावाच लागेल.

समर्थ भारत फक्त इतिहासामध्ये नसतो. केवळ तो गौरव आठवून फुकाचा अभिमान आम्ही बाळगायचा नसतो. हा भारत अखंड आणि सामर्थ्यशाली राहील यासाठी जाणीवपूर्वक आम्ही आमचे योगदान, वर्तमानाच्या गरजांनुसार, कालभान राखून, प्रसंगानुरूप द्यायचं असतं. ते देता आलं पाहिजे. त्यातूनच घडत असतं, तावून सुलाखून निघालेलं प्रत्येकाचं भारतीयत्व !

विश्वभर संचार करणाऱ्या या भारतीयत्वाच्या चेतनेचा मला अभिमान आहे. दिक्कालावर मात करत आपल्या कर्तृत्वाच्या प्रतिभेने जगभर संचार करा, पण भारतीयत्वाच्या सत्त्वाचा विसर पडू देऊ नका. जीवनमूल्यं हरवली की समूळ नाश व्हायला लागतो. तेव्हा संस्कृतीचं सार घेऊन आपण पाय रोवून उभे राहा. संत तुकारामांच्या आत्मविश्वासानं सांगा,

“आम्ही भारतवासी | आलो याचि कारणासी |

 बोलिले जे ऋषी | साच भावे वर्ताया ||"

जगभरातल्या स्वार्थी सत्तांना ठणकावून सांगा, अन्यायकारी वृत्तींना दम देऊन सांगा, शोषक प्रवृत्तींना धारेवर धरून सांगा; संत ज्ञानदेवांचे पसायदान ‘विश्वगीत’ करणारे आम्हीच आहोत. शांती प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्य व्यक्त करता आलं पाहिजे. मानवी कल्याणाचे अग्रदूत म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळता आली पाहिजे.

वृंदा आशय 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विराम माझ्या असण्याला !

                        विराम माझ्या असण्याला !          विराम माझ्या असण्याला !             जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतरा...