Sunday, 21 June 2026

विराम माझ्या असण्याला !

 

                      विराम माझ्या असण्याला !  

     


विराम माझ्या असण्याला !  

        जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतराव्या सूत्रामध्ये संप्रज्ञात समाधीचा परिचय करून घेतला  होता.  जिज्ञासूंच्या अभ्यासासाठी सूत्र क्र. १७ चा दुवा इथे देत आहे.  

                  https://vrunda-deshpande-joshi.blogspot.com/2022/06/blog-post.html

आता त्यापुढील अठराव्या सूत्राकडे वळूयात. 

विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोन्य:  ||१८|| 

 ( पातंजल योगदर्शन, समाधी पाद, सूत्र  क्रमांक १८)

'विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोन्य:' हे अठरावे सूत्र आपल्याला सांगते 'विराम' म्हणजे 'चित्तवृत्तींचा  उपशम'.  चित्तवृत्तींचा उपशम या साक्षात्काराचा पुन्हा पुन्हा अनुभव घेणे म्हणजे असंप्रज्ञात समाधी होय. वरील सूत्रातील 'विरामप्रत्ययाभ्यासपूर्व:' हे पद असंप्रज्ञात समाधीचा हेतू सांगते तर 'संस्कारशेषोन्य:'  हे पद असंप्रज्ञात समाधीचे स्वरूप सांगते.  

        सवितर्क समाधीमध्ये चित्ताची आलंबने एकाहून एक सूक्ष्म असतात. सास्मित समाधी पर्यंत आलेल्या योग्याला पूर्वीची आलंबने टाकून त्याहून सूक्ष्म आलंबनाचे ग्रहण करण्याची सवय झालेली असते. या सवयीच्या बळावर त्याने 'मी आहे' या सूक्ष्म वृत्तीचा ही त्याग करावयाचा असतो. 'योगेन योगो ज्ञातव्यो योगो योगात्प्रवर्तते' या वचनाचा अर्थ हाच आहे. 'मी आहे' या सूक्ष्म अहंकार वृत्तीचा संथ प्रवाह पूर्वीच्या अभ्यासबलाच्या सहाय्याने क्षणाक्षणाला बंद करावयाचा प्रयत्न साधकाने केला म्हणजे तेवढ्या क्षणापुरता त्या वृत्तीचा निरोध हळूहळू साधू लागतो. ज्या क्षणात तो साधतो तेवढ्या क्षणापुरता सर्व वृत्तींचा उपशम झाला, हाच सर्व वृत्तींचा विराम होय. या विरामाचा क्षणाक्षणांनी वाढता प्रत्यय घेणे हाच सूत्रात सांगितलेला 'विरामप्रत्ययाभ्यास' होय.  

        असंप्रज्ञात समाधी साध्य होण्यापूर्वी हा 'विरामप्रत्ययाभ्यास' करावयाचा असतो. या अभ्यासातूनच निर्वृत्तिक असा 'असंप्रज्ञात समाधी' साध्य होतो. हा अभ्यास असंप्रज्ञात समाधीचे कारण होय. हा अभ्यास दृढमूल झाला म्हणजे 'मी आहे' ही सूक्ष्म वृत्ती अथवा हे सूक्ष्म स्फुरण हृदयाकाशात निर्माण होण्याचे थांबते. सर्व वृत्तींचा क्षय होऊन चित्त द्रष्ट्याच्या ठिकाणी संस्कारमात्र राहते. चित्तात वृत्ती उठतील तर त्या वृत्तींशी द्रष्ट्याचे सारुप्य होईल पण चित्तच निर्वृत्तिक झाल्यावर द्रष्टा स्वरूपाने अवस्थित होतो आणि सर्वथा निर्व्यापार झालेले चित्त द्रष्ट्याच्या ठिकाणी केवळ संस्कारमात्र उरते. हा असंप्रज्ञात  समाधी 'विराम-प्रत्ययाभ्यासपूर्व' आणि 'संस्कारशेष' असा असतो.

        'राजयोग' या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद सांगतात असंप्रज्ञात समाधीची अवस्था ही पूर्ण ज्ञानातीत अशी अवस्था आहे. तिच्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. एखाद्याला सर्व शक्ती प्राप्त होऊनही त्याचा अध:पात होणे शक्य आहे. जोपर्यंत आत्मा प्रकृतीच्या अतीत होऊन संप्रज्ञात समाधीच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत पतनाचे भय उरते. या उच्चतर समाधीच्या सततच्या अभ्यासाने  मनाची चंचल, जड प्रवृत्ती नष्ट होतेच पण त्याबरोबरच सत्प्रवृत्ती देखील नाहीशी होऊन जाते. ही समाधी निर्बीज रूप धारण करते.

        'पातंजल योग :  विज्ञाननिष्ठ निरूपणया ग्रंथात  डॉ. प. वि. वर्तक यांनी वरील सूत्राच्या अर्थामध्ये 'मनुष्याच्या अस्मितेचा विराम करावयास पाहिजे', असा अर्थ सूचवलेला आहे. जोपर्यंत अस्मिता आहे तोपर्यंत 'मी पण' आहे. द्वैताची स्थिती आहे. म्हणून संप्रज्ञात समाधी ही ज्ञानदायक स्थिती आहे परंतु 'मी पणमिटला, 'मी' पणाचे ज्ञान मिटले की असंप्रज्ञात समाधी सुरू होते.

        मात्र व्यवहारामध्ये माणूस अस्मिताशून्य वागू शकत नाही. सरावाने, अभ्यासाने मीपणा नाहीसा होणे व परत अवतरणे यामधील काळ ही 'विराम' अवस्था असते. त्याचे वर्णन करता येत नाही तर त्याचा अनुभव घेणे, प्रत्यय घेणे एवढेच आपल्या हातात आहे. ही असंप्रज्ञात समाधी 'संस्कारशेष' असते हे सांगताना ते म्हणतात हे संस्कार जीवाचे असतात, शरीराचे असतात आणि त्यामुळे माणसाचे दैनंदिन जीवन हे या संस्कारांच्या आधारे सुरू राहते. तर स्वामी आनंद ऋषी सांगतात, "  'आहे'पणाचे  ज्ञान मिटले की असंप्रज्ञात समाधीचा प्रांत सुरू होतो. जीवाच्या हातून गोष्टी सहजतेने घडतात आता मन आणि बुद्धी यांची जीवनामध्ये अडचण वाटत नाही." थोडक्यात 'अस्मिता' हा मनाचा भाव आहे आणि तो भाव असंप्रज्ञात समाधीमध्ये पूर्णपणे विराम पावतो.

            आजच्या योग दिनाच्या निमित्ताने पतंजली ऋषींचे हे सूत्र आणि त्यावरील विविध भाष्ये वाचली तेव्हा कै. नरहर कुरुंदकर यांच्या कधीतरी वाचलेल्या, "एखादी गोष्ट  येत नाही म्हणून सोडणे म्हणजे न्यूनत्व व करता येऊनही सोडणे म्हणजे ऋषीत्व" या वाक्याचा गर्भितार्थ स्पष्ट झाला.   

 

संदर्भ ग्रंथ

 

१. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन - योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर

२. राजयोग - स्वामी विवेकानंद 

३. 'पातंजल योग :  विज्ञाननिष्ठ निरूपण'  - डॉ. प. वि. वर्तक

 

 


No comments:

Post a Comment

विराम माझ्या असण्याला !

                        विराम माझ्या असण्याला !          विराम माझ्या असण्याला !             जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतरा...