•| ॐ |•
प्रवास पूर्णत्वाचा !
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते ॥
अर्थ : हा मंत्र वैश्विक पूर्णतेचे (ईश्वराचे) वर्णन
करतो. 'ते (परम सत्य)
पूर्ण आहे आणि हे (दृश्य जग) देखील पूर्ण आहे. पूर्ण सत्यातूनच या पूर्ण सृष्टीचा
उगम होतो. त्या पूर्णत्वातून पूर्णत्व काढून घेतले तरीही, मूळ पूर्णत्वच शिल्लक
राहते.'
काल 'समग्रता' आणि 'चक्रीयता' या भारतीय संस्कृतीच्या विशेषांबद्दल लिहिल्यापासून वरील
श्लोक मनामध्ये सतत घुमतो आहे. मी तो पहिल्यांदा ऐकला होता १९९६
साली. त्या वेळेला मी बारावीच्या वर्गात शिकत होते. त्याच वर्षी 'योग विद्या धाम' या संस्थेच्या माध्यमातून
माझ्या योगशिक्षणाला प्रारंभ झालेला होता. आधी माझ्या वडिलांनी हे योग शिक्षण
घेण्यास सुरुवात केली. त्यांनी योग विषयक आणलेल्या पुस्तकांमध्ये हा श्लोक होता.
त्याचे वाचन करून या श्लोकाचा अर्थ त्यांनी आम्हाला सांगितला. अर्थ ऐकल्याबरोबर मी
आणि माझी बहीण वर्षा खो खो हसत सुटलो.
"पूर्णातून पूर्ण काढल्यावर पूर्णच शिल्लक राहते" ही कल्पनाच आम्हाला मोठी गमतीदार वाटली. असे काही होते तर गणित विषयाची आवश्यकताच काय? पूर्णातून पूर्ण काढायचे कशासाठी, असे अनेक प्रश्न आम्ही वडिलांना विचारले होते. नेहमीच्या गणितातील बेरीज - वजाबाकी मोठ्या मुश्किलीने करणाऱ्या आम्ही. पूर्णांक - अपूर्णांक हे शब्द उच्चारल्यानंतर आज देखील गणिताची सारी चिन्हे सभोवती फिरायला लागतात आणि मेंदूची चक्रीय गती (चक्कर येणे) वाढण्यास सुरुवात होते ; ही माझी गणित विषयातील स्थिती. मात्र वरील श्लोक ऐकल्यानंतर 'पाचातून तीन गेल्यावर दोन राहतात' हे 'पूर्णातून पूर्ण काढल्यावर पूर्णच राहते' त्यापेक्षा खचितच सोपे वाटले होते. वडिलांनी त्यांच्या परीने श्लोक समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्हीही माना डोलावल्या. मात्र पाचातून पाच काढले तर शून्यच राहायला हवे. पाच कसे राहतील? हा प्रश्न काही पिच्छा सोडत नव्हता.
मला
वाटतं या श्लोकाचा भावार्थ समजण्यासाठी मला दोन दशके लागली. मुळामध्ये हा प्रश्न
गणितातील नाही, (खरं म्हणजे हे
विधान ठामपणाने करताना माझंच मन माझ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं करत आहे, 'खरंच?') तर तत्त्वज्ञानातील आहे.
(मात्र अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून आपण जी शाखाभिन्नता मान्य केलेली आहे तिच्या
आधारे हे विधान मी करत आहे.)
या
संपूर्ण श्लोकाचा भावार्थ लक्षात घेतला तर तो असा -
हे (परमतत्त्व / परमात्मा) पूर्ण आहे.
ही (सृष्टी) पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निर्माण झाल्याने ते पूर्णत्वाचाच अनुभव
देते. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते.
हा भावार्थ
समजून घेण्याच्या दृष्टीने आपण आपल्या समजूतीच्या पायरीपासून पुढे जाऊयात. आपल्या
गणितीय सूत्रानुसार पूर्णातून पूर्ण काढल्यावर शून्य शिल्लक राहायला हवे. (उदा. ५
- ५ = ० ) 'शून्य' या गणितीय संज्ञेचा विचार
करताना आपल्याला लक्षात येते 'शून्य' ही भारताची जगाला सर्वात मोठी देणगी आहे. ती कोणत्याही
अंकाच्या पुढे लावली की त्या मूळ अंकाची किंमत वाढत जाते. (उदा. १०, १००, १००० इ.)
आपण आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये 'शून्य' या प्रतिमेचा अनेक वेळा उल्लेख करतो. उदाहरणार्थ ' तो शून्यात नजर लावून बसला' , ' त्याचे योगदान शून्य' , 'त्याने शून्यातून विश्व निर्माण केले' या तिन्ही ठिकाणी 'शून्य' हा शब्द आपण 'पूर्ण अभाव' या अर्थी वापरतो.
तत्त्वज्ञानामध्ये 'शून्य', 'महाशून्य' या संज्ञा आपल्याला दिसून
येतात. मी स्वतः कै. दुर्गाबाई भागवत यांचे साहित्य वाचत असताना या 'शून्य', 'महाशून्य' चे संदर्भ वाचलेले आहेत.
तथापि या संकल्पनेवर माझा अद्याप अभ्यास झालेला नाही. त्यामुळे केवळ संदर्भ म्हणून
इथे त्याचा उल्लेख करत आहे. येथील शून्य हे 'अनंतता' दर्शवणारे आहे.
आपल्या सामान्य तौलनिक बुद्धीने विचार केला असता स्वाभाविकच प्रश्न पडतो
एकीकडे शून्य म्हणजे 'पूर्ण अभाव' आणि एकीकडे शून्य म्हणजे 'अनंतता' ; हे कसे शक्य आहे? ही पूर्ण विसंगती आहे हे आपल्या लक्षात येते. एकाच शून्याचे
हे दोन अर्थ स्वीकारण्यास नकार देण्याची प्रक्रिया सुरू होते.
इथे
मला वाटतं आपण जेव्हा 'शून्यातून विश्व
निर्माण केलं' असं जे म्हणतो या
वाक्याचा आकारानुसार विचार केला तर 'शून्य' हे 'गोलाकार' आहे आणि विश्व हे देखील 'गोलाकार' आहे. हवं तर एक छोटा आकार
आणि एक मोठा आकार, मात्र दोन्हीही
समान ; हे आपल्या
बुद्धीला पटू शकते. म्हणजेच मानवी जीवनाचा किंवा मानवी कर्तृत्वाचा प्रवास हा 'शून्याकडून महाशून्याकडे' आहे. याचाच अर्थ तो
पूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे आहे.
कसा ? एखाद्या वृक्षाचा प्रवास
हा बीजापासून सुरू होतो तो वटवृक्ष होईपर्यंत. वटवृक्ष पुन्हा बीज देतो. दिवस
उगवतो तो अंधारामधून आणि मावळतो तो देखील अंधारात, उद्याच्या प्रकाशाचा दिलासा देत. मातीतून घडा
निर्माण होतो, तो पुन्हा मातीतच विलीन होतो. पंचमहाभूतातून
आणि त्रिगुणातून माणूस निर्माण होतो तो पुन्हा त्यातच विलीन होतो. भाषेचा प्रवास
मूलध्वनीतून सुरु होतो तिचे विघटन करत करत आपण पुन्हा मूलध्वनीकडे येतो.
मनुष्याच्या वाढीच्या अवस्था आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येते बालपणी, निरागस असताना ; जे आपल्याला वाटत होते, जाणवत होते आणि नकळत आपण
करत होतो तेच आपण मोठे होण्याच्या प्रवासामध्ये कुठेतरी हरवून बसतो आणि पुन्हा
एकदा जाणते होऊन, शहाणे होऊन त्याच
मार्गावर जाण्यास सांगतो.
कसे ? लहान मुलांची भांडणे चटकन
मिटतात , ती पुन्हा
खेळण्यासाठी पटकन एकत्र येतात. मोठ्या माणसांची भांडणे मिटता मिटत नाहीत. भांडणे
मिटवल्यासारखी दाखवली तरी मनातल्या गाठी सुटता सुटत नाहीत. 'सुंभ जळाला तरी पीळ जात नाही' , 'स्वभावाला औषध नाही' यासारख्या आपल्या म्हणी
कदाचित हीच स्थिती व्यक्त करतात. आयुष्य थकलेल्या , मृत्यूशय्येवर निजलेल्या व्यक्ती, 'आयुष्यात माणसेच
महत्त्वाची आहेत अन्य काही नाही' असे सांगत असतात. खूप पैसा कमावलेला उद्योजक 'आयुष्यात पैसा फार महत्त्वाचा
नाही', हे सांगत असतो आणि ज्यांच्याकडे 'पैसे नाहीत', जे गरीब आहेत त्यांना
स्वाभाविक प्रश्न पडतो,
"बाबारे ! सगळं आयुष्य उपभोगून झाल्यावर तू हे सांगतो आहेस. आम्हालाही थोडा
पैसा कमावून उपभोग घेऊन पाहू दे ना!" शस्त्रसज्ज झालेले देश अन्य देशांना
शस्त्रास्त्र वाढवू नका ;
अहिंसा, मानवता याच महत्त्वाच्या
आहेत ; म्हणून सांगतात, वारांगणेसारख्या फिरणाऱ्या
त्यांच्या राजनीतीचा वास त्यातून आपल्याला येतो. यात चूक काहीच नाही.
थोडक्यात, आदी-अंती समग्रता आहेच.
त्या समग्रतेच्या वाटेला चक्रीयता असल्याने आपण असेच फिरत राहणार. फक्त हे फिरणं 'जाणीवपूर्वक', 'ज्ञानयुक्त' झालं तर मग जगणं निरामय
होतं इतकंच. ‘सा विद्या या विमुक्तये’ हा प्रत्यय खरोखरच अनुभवण्यासारखा
आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु!


No comments:
Post a Comment