मनाची कैफीयत
सर्व रसिक जाणकार वाचकांना पुनश्च नमस्कार. आपल्या
उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! आपल्या या प्रेमानेच
दुसरं पाऊल उचलण्याचं, विषय निश्चित करण्याचं बळ मला लाभलं. योग दिनाला ‘योगायोगा’ने
आपण भेटलो. योगाच्या अनुशासनावर भरभरून बोललो. आपला धागा जुळला. मग वाटलं सूर जुळत
आहेत, तर याच वाटेने सरळ पुढे जावं. पातंजल योगसूत्राचंच पुढचं पान उलगडावं.
त्याबरोबर समोर सूत्र आलं - ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’! (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. २)
योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे होय. हे
वाचलं आणि मी जागच्या जागी उडालेच. योग शब्दातला मूळ धातू युज्. युज् म्हणजे जोडणे.
आणि निरोध करणे म्हणजे तोडणे, अडवणे, प्रतिबंध करणे. मग योग म्हणजे नक्की काय ?
जोडणे की तोडणे? मन भिरभिरायला लागलं.
तेव्हा लगेच महर्षी पतंजलींचे पहिले सूत्र समोर आले. योगाच्या वाटेवर चालायचे असेल
तर जरा अनुशासन बाळगा. मनाला म्हणलं, “थांब रे बाबा, शांत हो. स्थिर हो.” मला
वाकुल्या दाखवत मन म्हणालं, “जोडायचं काय आणि तोडायचं काय, कळायला नको का?”
शरीर-मनाला जोडण्यासाठी,
आत्मा-परमात्म्याला जोडण्यासाठी, आपणच आपल्याला भेटण्यासाठी, मध्येमध्ये जे अडथळे
आहेत त्यांना दूर करावं लागेल ना? चित्ताच्या वृत्ती म्हणजे मनाचा अखंड चालणारा
व्यापार, मनाकडून येणा-या प्रतिक्रिया. यातून मनाचा दृष्टिकोन, मनाचा कल समजतो. मनाचा हा ‘कल’
जिकडे असेल तिथून आपल्याला काही कळतं, आकलन होतं. आपलं हे गडबड्या मन एकाजागी थोडंच
बसतं? ते कधी डोळ्यातून बाहेर जाईल, काही
पाहून येईल. कधी कानाच्या काठावर उभं राहून काही ऐकेल. कधी नाकातून वा-याच्या
वेगाने जाऊन वास घेऊन येईल. कधी जीभेवर बसून काही चाखेल. कधी उत्सुकतेपोटी
पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींना हात लावेल. अहो, आपण पंचज्ञानेंद्रियांनी अनुभव
घेतो ना तो हाच !
मात्र, हे
लक्षात आल्यावर मी अधिकच सावरून बसले. या सगळ्याला अडवायचे म्हणजे आपण सभोवतालचा
अनुभव घ्यायचा नाही की काय? माहिती मिळवायची नाही की काय? शहाणं व्हायचं नाही का?
जगाशी नातं जोडायचं नाही का? सगळे प्रश्न एकाच वेळी समोर आले.
मन म्हणालं, “अगं, जरा हळू. थोडं थांब. किती डिस्टर्ब करतेस मला?”
मी म्हणलं, “मला तू कायमच डिस्टर्ब करतोस. मग कधी मी
केला तर बिघडलं कुठे?”
“अगं, हा डिस्टर्बच तर थांबवायला सांगताहेत, महामुनी.”
म्हणजे?
म्हणजे असं पहा, मन समजावणीच्या सुरात सांगू लागलं. “त्या
पाच खिडक्यातून मी सतत पळतो. क्षणात इथे, क्षणात तिथे. आपलं काय, मनात आलं तिथं
गेले. तुझ्या भाषेत हा माझा ‘कल’. पण मी एकाच वेळी अनेक ठिकाणी जाऊन आलो की तुला
कसं, मी ‘कलकल’ केल्यासारखं वाटतं. मग बसतेस, डोकं धरुन. काहीच सुदरत नाही, म्हणून.”
“हो. तू उनाड आहेच तसा. उडाणटप्पू. सारखा भटकत बसतोस, मग
माझं एकही काम धड होत नाही. तुझ्यामुळेच आम्ही लहानपणी चंचल असतो, तरुणपणी उच्छृंखल आणि म्हातारपणी
सतत चिंतेत.” मी सुद्धा मनावर राग काढून घेतला.
तेच तर. मी केव्हा बाहेर जायचं?
कुठे जायचं? कधी जायचं? कसं जायचं? काय पाहून यायचं? काय ऐकायचं? काय घ्यायचं? काय
टाळायचं? याची शिस्त नको का तू मला लावायला? मी आपलं दिसेल ते उचलत राहतो. आजच्या
जगात तर मी अजूनच त्रासून जातो. माझे पंख कमी होते की काय, म्हणून अजून भरपूर साधनं
दिली तुम्ही माझ्या हातात. नव्या खिडक्या दिल्यात. मोबाईल तर सहावं इंद्रिय वाटतंय
मला. तिथून आभासी जगात मस्त भटकत असतो मी. अखंड भटकंती मला आवडतेच. स्थळ-काळाचं
कोणतंच बंधन मी जुमानत नाही. पण नंतर थकतो, चिडचिड होते, निराशही होतो. कधी कधी तर वाटतं, चराचरात
हिंडून कचराच गोळा करतोय आपण. शांत, सुंदर आयुष्य मलाही आवडतं ग. तुमच्या
पूर्वजांनी त्याचा मार्गही एवढा स्पष्ट दाखवलाय तुम्हाला. मग का चालत नाही तुम्ही
त्या मार्गावर?
आता तर मी पुरती गोंधळले. पण ठणकावून सांगितलं त्याला, “आता
काही हे शक्य नाही. या माहितीच्या युगात, या धावत्या जगात, मी नाही थांबवू शकत
स्वतःला. मला धावावंच लागेल. नाहीतर या स्पर्धेत मी मागे पडेल. हरेल.”
मन खळखळून हसलं. “अगं, पुढं जायला किंवा मागे पडायला
तुझं अस्तित्व नको का शिल्लक राहायला? स्वतःची ओळख इतरांना करून द्यायची असेल तर आधी आपली
आपल्याला ओळख असली पाहिजे. नाहीतर बुडबुड्यासारखी विरून जाशील या जगात. स्वत:ची
आणि दैनंदिन जीवनाची उपेक्षा करून कोणत्याही पराक्रमाची अपेक्षा तू स्वत:कडून करूच
शकत नाहीस.” मनानं मला दरडावलं.
....पण कसं करायचं रे हे? आता मीच केविलवाणी झाले. तू
ऐकशील माझं?
“अर्थातच. का नाही? देवाला नैवेद्य दाखवायचा असतो, तेव्हा तो होईपर्यंत
सुग्रास भोजनापासून लांब ठेवतेसच ना मला? रस्त्यावर लाल दिव्याचा सिग्नल असतो
तेव्हा कितीही गाडी उडवत जावं असं मला वाटलं तरी, ब्रेक लावतेसच ना मला? आठ
दिवसांनी इथे भेटेन म्हणाली होतीस सगळ्यांना, आणि आलीचसना भेटायला? म्हणजे ठरवलं
की तूच करू शकते. माणूसच घडवतो गं स्वत:चं मानस!
चित्तवृत्तीचा प्रवाह थांबवणं अवघड नाही. तुम्ही माझ्या
स्वैरपणाकडे लक्ष दिलं नाही, त्याला प्रोत्साहन दिलं नाही आणि विरोधही केला नाही
की, माझी शक्ती कमी होते. मग मी तुम्हाला नाही खेचू शकत माझ्यामागे. तुम्ही
माझ्यात गुंतायचंही नाही आणि मला अडवायचंही नाही, तटस्थपणे फक्त बघायचं. हीच पहिली
पायरी असेल साक्षीभावाने स्वतःकडे पाहण्याची. मग मी आपसूक येतो तुमच्या मागे.
तुमच्या - आपल्या सुंदर जगात, शांत जगात, अंतरंगात ! उपजत ज्ञानाचा, परंपरागत
शहाणपणाचा झरा तिथे असतो. तिथे आपण व्हायला लागतो स्वस्थ. स्वस्थ होण्यासाठी,
स्वतःमध्ये स्थित होण्यासाठी पहिली पायरी आहे गं, चित्तवृत्तींचा निरोध!
मला आश्चर्याचा धक्काच बसला. योगसूत्रांवर तुमच्याशी
बोलावं असं मनापासून ठरवलं. आणि लगेच हे मन समंजस झालं की. मन समंजस होण्याचा हा
मार्ग मला ज्या संस्थांनी दाखवला, ते ‘योग विद्या धाम, नाशिक’, ‘श्री अरविंद
केंद्र, औरंगाबाद’ आणि ‘पुनरुत्थान विद्यापीठ, अहमदाबाद’ या संस्थांची, सर्व संबंधितांची मी कृतज्ञ आहे.
वृंदा आशय
खूप छान
ReplyDeleteखूप छान ma'am
ReplyDeleteछानच
ReplyDeleteमनाचा संवाद
अप्रतिम सादरीकरण मॅडम
ReplyDeleteतुमच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
खूपच छान..
ReplyDeleteकाहीतरी छान मिळाले,असे मनापासून वाटले
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteखूप छान वृंदा मनाशी झालेला संवाद असाच होत असतो अगदी तंतोतंत मांडलास
Deleteसोपे शब्द, साधी मांडणी, मनोवेधक लेखन, संवादात्मक शैली ..... वाचून आनंद वाटला....
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteअप्रतिम 👏👏
ReplyDeleteमनाची तयारी मनाला समजून आत्माला जाणून घेण्याचा प्रवास....योग
ReplyDeleteअप्रतिम आहे आवज व लेखन.🙂👍
अप्रतिम👍
ReplyDeleteअप्रतिम ... चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी मनाशी केलेला संवाद भन्नाटच ...
ReplyDeleteयोगसुत्रा सारखा कठीण विषय इतक्या सहजतेने सोप्या शब्दात , नवीन शैलीत मांडत आहात.फार मोठी उपलब्धि आहे ही.
ReplyDeleteNice mam
ReplyDeleteNice mam...
ReplyDeleteUseful and informative nice blog Vrunda.
ReplyDeleteवा! या दोन टाळांच्या सुसंवादाने श्रवणी मधुरता येता भजन घडले , ब्रह्मानंदी टाळी लागली !
ReplyDelete... जणू गुरुवर्य निवृत्तीनाथ ज्ञानदेवा समजावत होते.... बहिर्मन लहान भाऊ तर अंतर मन मोठा भाऊ... एक प्रकारे गुरु-शिष्य संवादाचीच ही प्रचिती ! 🙏 - विजय देशपांडे .
वा! या दोन टाळांच्या सुसंवादाने श्रवणी मधुरता येता भजन घडले , ब्रह्मानंदी टाळी लागली !
ReplyDelete... जणू गुरुवर्य निवृत्तीनाथ ज्ञानदेवा समजावत होते.. बहिर्मन लहान भाऊ तर अंतर मन मोठा भाऊ... एक प्रकारे गुरु-शिष्य संवादाचीच ही प्रचिती ! 🙏
Too good Vrunda. Keep it up.💐
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteIt was really fantastic to read the debet between mind and concious. It was beautiful indeed as it was portraid in a simple language. It is refreshing to read it. Keep it up
ReplyDeleteखूप छान
Deleteअतिशय उत्तम दिशादर्शक आणि चिंतन शीलतेचं दर्शन घडवणारं मनोगत भावली अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी धन्यवाद
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteसर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. मनापासून दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत. स्फूर्तिदायक प्रतिक्रियांसाठी आभारी आहे.धन्यवाद !
ReplyDeleteखूप सूंदर
ReplyDeleteChan👌
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूपच सूंदर संवाद मनाला भावला योगसूत्र सोप्या भाषेत छान सांगितले धन्यवाद वृंदा
ReplyDeleteThe preamble explaining the most imp. basic question to be asked while ushering in the intricate web of phiilosiphies viz."ko aham" is quite interesting.
ReplyDeleteखूप छान
Delete