Showing posts with label योग. Show all posts
Showing posts with label योग. Show all posts

Sunday, 12 September 2021

जागर संकल्पांचा !

 





जागर संकल्पांचा !


    पहाटे अंगणात जाणं हा आता माझा परिपाठ झाला आहे. सृष्टीची अपार शांती हृदयात भरून घेतल्याशिवाय तुमच्याशी बोलताच येत नाही मला. दारी फुललेला चांदीपाट, बहरलेला प्राजक्त मला धुंद करतो आहे. आकाशीचे नक्षत्र आणि फुलातलं साधर्म्य, ‘नक्षत्र माझ्या दारी आल्याचं’ सुख देत आहेत. दारी ‘मोती पोवळ्यांच्या राशी’ असं म्हणणाऱ्या बहिणाबाई आतमध्ये साद घालत आहेत. ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती’ असं म्हणणारे, कवी  कुसुमाग्रज पुन्हा जागे होत आहेत. कविराज आपल्या शब्दांनी, कल्पनांनी, प्रेमाच्या, पराक्रमाच्या उदात्त भावनांनी आमच्यातला वाचक घडवला. नाशिकला तुमच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं, तेव्हा अपार तृप्तीचा अनुभव घेतला. कविवर्य तुम्हाला वंदन !  तुमच्याच प्रेरणेतून सांगते, ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती, अक्षरांचा संग त्याला लाभणार आहे’. प्रिय वाचकांनो किती विषयांवर भरभरून बोलावं वाटतं मला तुमच्याशी. कृष्णसखी होऊन अभंगांबद्दल बोलत राहावं वाटतं. ज्या कवितांवर मी आयुष्यभर प्रेम केलंय, त्या कवितांचे विवेचन घेऊन तुमच्याकडे यावं वाटतं. येईल, निश्चितच लवकर येईल !

‘जनी जनार्दन’ म्हणणारे संत मला दिसतात. काय ‘जनी जनार्दन’ एका विशिष्ट काळातच होता का? नाही. तो कालातीत आहे. तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. ‘जन हे वोळतु जेथे’ म्हणणारे शरच्चंद्र मुक्तिबोध मला भावतात. सामान्य जनांनी आपलं सामर्थ्य पणाला लावलं, म्हणून स्वतंत्र झालेली भूमाता मला दिसते. म्हणूनच आज, जेव्हा बुद्धिदाता गणेश आणि माय, माता महालक्ष्मी अधिष्ठित झालेले आहेत तेव्हा त्यांना आशीर्वाद मागते, देवी सरस्वतीची उपासना अखंडपणे करण्याची अनुमती मला द्या. मायमाऊली हृदयी वसते, डोळे मिटता सर्वत्र दिसते! हे देवा, हे संपूर्ण जीवन प्रार्थना होऊन जाऊ दे !

 

आज आपण महर्षी पतंजलींच्या तेराव्या आणि चौदाव्या सूत्राचा एकत्रित विचार करणार आहोत. पाहता पाहता १२ सूत्र झाली. बारा हा अंक तपाचा निदर्शक. तुमच्यामुळे हे तपाचरण शक्य झालं. तुमच्या साथीनं घडलं. म्हणून त्याचा आनंद मी तुमच्याजवळ व्यक्त केला पाहिजे. काय घडलं नाही या तपाचरणात? नियम पालनापासून सुरुवात केली आणि थेट श्रीकृष्ण दर्शनाच्या सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचलो. योगसूत्रांची ही ताकदच निराळी. स्वतःकडे पाहायला लागलं की परब्रह्म आपसूक भेटते. परब्रह्माच्या दर्शनानं आपणही नि:शब्द झालात. आपला प्रवास प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतो. उत्सवी शब्दांनी, अभिनंदनीय शब्दांनी सुरू झालेला हा तुमचा प्रवास मोठ्या वेगात आणि जोशात चालू होता. पण त्या श्रीकृष्णाचे दर्शन घडताच आपणही थबकलात. इतकी प्रामाणिक प्रतिक्रिया ! सर्व सहप्रवाशांची मी कृतज्ञ आहे !

तत्र स्थितौ यत्नोSभ्यास: ||१३||

(सूत्रार्थ - निरोधात चित्ताची स्थिरता साधण्यासाठी केला जाणारा जो यत्न तो अभ्यास होय.)

१३ व्या सूत्राच्या विवेचनात योगाचार्य कोल्हटकर म्हणतात, “पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय हे निरोधाचे स्वरूप होय. एकाग्रतेच्या अभ्यासाने अंत:करणात हे सामर्थ्य विकसित होते. अंत:स्फूर्त सामर्थ्याने क्षणमात्र घडलेल्या निरोधाचा सुद्धा चित्तावर संस्कार घडत असतो. हा संस्कारानुभव अंत:स्फूर्त सामर्थ्याला उपकारक ठरतो. निरोधाचा क्षणाक्षणाने वाढता अभ्यास निरोधकाल वाढवतो. सुरुवातीला खंडित होत जाणारा हा निरोधकाल वाढत्या अभ्यासाने अखंडित होत जातो.”  

‘अभ्यास’ या संकल्पनेबद्दल आपण मागच्या सूत्रात विस्तृत संवाद साधला. त्यामुळे आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत १४ व्या सूत्राकडे. ‘अभ्यास कसा करावा’, याकडे.

 

स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि: || १४ ||

(सूत्रार्थ – पण तो अभ्यास दीर्घकाल, खंड न पडता, आणि आदरपूर्वक केला म्हणजे तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो.)

हे १४ वे सूत्र मला खूप आवडते. त्यामुळे मी ते अनेक ठिकाणी उद्धृत करत असते. का माहीत नाही, पण कदाचित माझ्या स्वतःमध्ये या गोष्टींचा अभाव असल्यामुळे ते मला अधिक भावत असेल. बऱ्याच वेळेला काय होतं जे आपल्याकडे नसतं त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. आणि मग त्या गोष्टीबद्दल आपण भरभरून बोलायला लागतो. असो. इथे अभ्यास म्हणजे यत्न, प्रयत्न आणि हा प्रयत्न ज्यातून प्रत्यक्ष व्यक्त होतो ते कर्म लक्षात घेऊन पुढील विवेचन केलेले आहे.  

आपले १४ वे योगसूत्र सांगते, दीर्घकाल आणि निरंतर केलेला अभ्यास सार्थकी लागतो. हे थोडसं आपण विस्तारानं पाहू. यात दीर्घकाळ म्हणजे किती दीर्घकाळ? साधारणपणाने आपण पाहतो, प्रत्येक कामाचा एक विशिष्ट असा वेळ ठरलेला असतो. तितक्यावेळ ते काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं दैनंदिन जीवनात तो, दीर्घकाळ ही संकल्पना साधण्याचा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ एक घास बत्तीस वेळा चावून खावा, साधारणपणे ४५ मिनिटे व्यायाम करावा, दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आवश्यक तो वेळ देत आपण प्रत्येक काम पूर्ण केले पाहिजे. दीर्घकाळ याचा अर्थ उगाच थांबत थांबत, कंटाळा करत, आपल्या दैनंदिन भाषेत ‘टाईमपास करत’ असा काहीही होत नाही. उलट ज्या गोष्टीला जो काळ आवश्यक आहे, त्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने आपण काम केले पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो.

 हे काम निरंतर करावे असे महर्षी सांगतात. निरंतर म्हणजे काय, तर सातत्याने. उदाहरणार्थ आमचे विद्यार्थी मित्र परीक्षा जवळ आली की दीर्घकाळ अभ्यास करतात. दीर्घकाळ म्हणजे त्यांच्यासाठी परीक्षेच्या पेपरच्या आदल्या दिवशीची रात्र. निरंतर या संकल्पनेमध्ये हा धोका टाळणे कुठेतरी महर्षींना अपेक्षित असावे. ‘निरंतर’ या संकल्पनेचा अर्थ विशिष्ट अभ्यासाच्या संदर्भाने लक्षात घेताना तो अभ्यास वर्षभर करायचा, असं सांगता येईल. ज्या अभ्यासक्रमाला, ज्या कोर्सला आपण प्रवेश घेतलेला आहे, त्या कोर्सचा अभ्यास त्याच्या निहित कालात, सातत्याने करणे, दररोजचा काही ठराविक वेळ त्यासाठी बाजूला काढणे आणि दररोज तो अभ्यास करणे असा ‘निरंतर’ याचा अर्थ होतो. योगाभ्यास निरंतर करायचा म्हणजे काय, तर दररोज पाऊण तास आपण योगाभ्यास केलाच पाहिजे. दुर्दैवानं सध्या आपली योगाभ्यास ही संकल्पना ‘योग म्हणजे आसन प्राणायाम’ इतकीच मर्यादित आहे. जेव्हा आपण योगाची आठ अंग समजून घेऊ शकू, त्या वेळेला ‘योग म्हणजे जीवन आहे’ आणि जीवनभर हा अभ्यास निरंतर करत राहायचा असतो, म्हणजे काय, हे आपल्याला लक्षात येईल.

निर् + अंतर असा या शब्दाचा विग्रह होतो. निर् हा उपसर्ग अंतर या शब्दाला लागलेला दिसून येतो. निरंतर जिथे अंतराचा अभाव आहे, म्हणजेच एकदा जे काही ठरवलं ते सातत्याने आपण केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो भाग बनला पाहिजे. त्याने काय होईल तर आपल्याला ती ‘सवय’ लागेल. वयासह, वयासोबत जी वाढते ती सवय. आपली सवय आपला स्वभाव घडवत असते. ज्या सवयी आपण स्वतःला लावत असतो त्या सवयीबद्दल आपण किती जागरूक राहणं आवश्यक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. समजतं.

 सवयीने आपण अनेक गोष्टी आपसूक करत असतो. काही वेळेला तिथे सजगता नसली तरीसुद्धा सवयीने त्या घडून जातात. मग आपल्या स्वभावावर, स्वतःच्या घडण्यावर, स्वतःच्या अस्तित्वावर जी इतकी परिणामकारक ठरते, त्या सवयीच्या बाबतीत आपण किती जागरूक राहिले पाहिजे ! डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, “तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतील.” हे साहजिकच आहे. सवय स्वभाव घडवते, स्वभाव कर्तृत्व घडवतो. स्वाभाविक रित्या हे कर्तृत्व हेच आपलं भविष्य घडवणार आहे. आपल्या कृतीच्या मुळाशी आपण केलेला विचार असतो. तो विचार आपल्या कृतीला प्रभावित करत असतो. म्हणून आपण सातत्यानं, निरंतर  सकारात्मक विचार का केला पाहिजे याचंही कोडं, आपल्याला इथे उलगडतं.

निरंतर याचा अर्थ आपल्याला कळाला. आता सत्कारपूर्वक किंवा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारचा उल्लेख महर्षी का करतात? आदर, सत्कार हे शब्द आपल्याला तसे औपचारिक वाटतात. काही विशिष्ट औपचारिक प्रसंगांच्या वेळेलाच आदर - सत्कार करायचा असतो, अशी आपली स्वाभाविक धारणा असते. मात्र आपण आपल्या जीवनाची जी भूमिका निश्चित करत आहोत, ज्या सवयीतून, दृष्टिकोनातून आपण स्वतःला घडवत आहोत, स्वभाव घडवत आहोत, त्यातून कर्तृत्व साकारत, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर दैनंदिन जीवनाचा आपल्याला आदर वाटला पाहिजे.

दैनंदिन जीवनाकडे आपण ज्या श्रद्धेने, ज्या निष्ठेने पाहू शकू ती श्रद्धा आणि निष्ठा आपल्यातली ही सत्कारपूर्वकता जोपासणारी आहे. आणि मग त्या भूमिकेतून जेव्हा आपण स्वीकारलेल्या कामाकडे, करत असलेल्या कर्तव्याकडे पाहू शकतो, तेव्हाच ते कर्तव्य परिपूर्ण होऊ शकतं. आपण त्याकडे त्राग्याने, वैतागाने, हे माझ्याच वाट्याला का?, मला करायचं नाही पण मला करावं लागतं, अशा भावनेतून जर पाहायला लागलो तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, आपल्या वर्तमानावर, आपल्या सभोवतालावर, आपल्या संपर्कातील व्यक्तींवर झाल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचा वर्तमान हा असा कटकटीचा, तापदायी असतो, त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कारण वर्तमान क्षण, पुढच्या क्षणाला इतिहास झालेला असतो. जिथे इतिहास प्रेरक असतो, तिथे  भविष्य उत्तम, उज्ज्वल घडू शकतं. प्रेरणा माणसाला नेहमी अधिक सकारात्मकतेकडे आणि ऊर्ध्वगामी नेत असते. हा प्रगतीकडचा प्रवास आपल्याला करायचा असेल, तर तो दीर्घकाळ, निरंतर आणि सत्कारपूर्वकतेने, आदराने, आस्थेने केला की या सगळ्याचं एक दृढ अधिष्ठान तयार होतं.

जिथे अधिष्ठान दृढ असतं, त्या दृढ अधिष्ठानाला काळाचं, परंपरेचं, पिढ्यापिढ्यांच संचित लाभत असते. हे संचित, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य हे आपल्या वर्तमान क्रिया प्रतिक्रियांवर प्रभाव टाकत असतं. त्यामुळे असा दृढतेने केलेला अभ्यास निश्चितच फलदायी होतो, याबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

अशी दृढभूमी, दृढ अधिष्ठान घडवण्यामध्ये केवळ आपलाच सहभाग असता तर ती कदाचित लवकरही झाली असती. मात्र या प्रक्रियेवर आपला सभोवताल प्रभाव टाकत असतो. आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, ज्या ठिकाणी वावरतो अशा सर्व ठिकाणची माणसं या ना त्या प्रकाराने आपल्याशी संबंधित असतात. तिथले नियम, तिथल्या योजना, तिथल्या धारणा या सगळ्याच गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच कुठलाही अडथळा आला तरी त्याचं संधीत रूपांतर करत आपण दृढ राहणं गरजेचं असतं. अशा संघर्षातून निर्माण झालेली दृढभूमी अढळपद प्राप्त करते. त्यासाठी पॉन्डिचेरीच्या माताजींनी दिलेला संदेश अनुसरावा लागतो -

Do not aim at success. Our aim is perfection. - The Mother .

वृंदा आशय

Monday, 30 August 2021

गंध स्मृतींचा !

 

गंध स्मृतींचा !

पहाटेचे चार वाजलेले आहेत. ब्राह्ममुहूर्ताची वेळ ! नकळत घराचा दरवाजा उघडला आणि अंगणात येऊन उभी राहिले. भुरभूर पाऊस सुरू आहे. रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात डांबरी रस्ते चमकत आहेत. निसर्गातला मंद अंधार सृष्टीची मोहकता वाढवतो आहे. ओली झालेली फुलझाडं या प्रकाशात स्वत:च्या रंगासह कृष्ण-धवल दर्शन देत आहेत. सृष्टी मध्ये शांततेचा नाद आहे.

हा पडणारा पाऊस, निसर्गातली शांतता माझ्या पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना जाग्या करत आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज कानामध्ये झिरपत चाललेला आहे. छपरावरचा पाऊस, जाळीवरचा पाऊस, झाडावरचा पाऊस, झोपाळ्याच्या कौलारू छतावरचा पाऊस ! प्रत्येक ठिकाणच्या थेंबाचा आवाज निराळा. लाईटच्या प्रकाशात चमकणारे, भिजलेले काळे डांबरी रस्ते पावलांना वेध लावत आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या काळ्या मातीचा कृष्णगंध मनामध्ये दरवळतो आहे.... आणि या मृद्गंधाने मला थेट संस्कृतीच्या मुळापाशी नेऊन सोडलं! सृष्टीतला श्यामवर्ण..... मातीचा कृष्णगंध..... आज श्रीकृष्ण जयंती ! ॐ नमो भगवते वासुदेवाय !

‘कृष्ण’ एक शब्द मनामध्ये उमटला. त्याच्या किती प्रतिमा ! तो बाळक्रीडा करणारा, श्रेयस आणि प्रेयस यांच्या संघर्षात न अडकता दोन्हींनाही यथोचित न्याय देणारा, सहज कर्तृत्व गाजवून कंसवध करणारा, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगून त्याचे सामर्थ्य जागवणारा, महाभारत घडवणारा आणि ‘यदा यदा ही धर्मस्य....’ असे अभिवचन देऊन भारताला आश्वस्त करत, विश्वकल्याण साधणारा कालातीत श्रीकृष्ण !  

ज्याने कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगितलेला आहे, त्याचे स्मरण करत महर्षी पतंजलींच्या ‘स्मृती’ ही मनाची वृत्ती स्पष्ट करणाऱ्या ११ व्या सूत्राचे चिंतन करायचे आहे. काय हा मणिकांचन योग ! परमेश्वरा मनोभावे वंदन, संपूर्ण समर्पण !!

अनुभूतविषयासंप्रमोष:  स्मृति: ||११||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ११)

     या सूत्राचा सूत्रार्थ स्पष्ट करताना ‘राजयोग’ ग्रंथात, स्वामी विवेकानंद लिहितात, ‘प्रत्यक्ष अनुभवलेले विषय त्यांच्या वृत्ती मनातून नाहीसे न होता संस्कारांच्या रूपाने जाणिवेत परत येण्याला स्मृती म्हणतात. स्मृतीचे भावित आणि अनुद्भावित असे दोन प्रकार आहेत.’ तर योगाचार्य कृष्णाजी कोल्हटकर त्यांच्या ग्रंथात स्पष्ट करतात, ‘पूर्वी अनुभवलेल्या विषयांचा असंप्रमोष म्हणजे त्या अनुभवामुळे चित्तांत उत्पन्न होणारे त्या विषयाचे अनुसंधान, ही स्मृती होय’. डॉ. प.वि. वर्तक सांगतात, ‘अनुभव घेतलेल्या विषयाचा, परिपूर्ण नाश न होणे याचा अर्थ तो अनुभव तो विषय कुठेतरी शिल्लक असणे होय; त्यालाच स्मृती किंवा आठवण म्हणतात.’ ओशो लिहितात, - स्मृती ही मनाची पाचवी वृत्ती आहे. तिचा उपयोग किंवा गैर उपयोग होऊ शकतो. जर स्मृतीचा गैर उपयोग झाला तर ती गोंधळ निर्माण करते.

दैनंदिन जीवनात आपण ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने किंवा मनाने अनुभव घेत असतो. हा अनुभव बऱ्याच वेळेला घर करून मनात राहतो किंवा आठवत तरी राहतो. अनुभव घेतानाची बाह्य सदृश्य परिस्थिती समोर असणे किंवा सुप्तावस्थेतील विशिष्ट संस्कार जागा होणे यामुळे अनुभव विषयाचं पुन्हा प्रकटीकरण होतं, यालाच ‘स्मृती’ म्हणतात. ही स्मृती मनाची वृत्ती आहे. विषय ज्ञानेंद्रियाने भोगवून संपवला तरी अनुभव नाहीसा होत नाही. ही नाहीसे न होण्याची प्रवृत्ती म्हणजे स्मृती. अनुभव घेतलेल्या विषयाभोवती पिंगा घालण्याची मनाची वृत्ती म्हणजेच स्मृती. मनाची ती वृत्ती असल्याने, मन त्याला वाटेल तेव्हा, स्मृतीत रममाण होते. ही स्मृती मनाला वाटेल तितकी वर्षे मागे भूतकाळात घेऊन जाते कोणाकोणाला गत जन्माच्या आठवणी देखील येतात. आपल्या मनाला स्थानापन्न व्हायला समोर प्रमाण नसेल, विपर्यय नसेल, विकल्प नसेल व निद्रा येत नसेल तर माणसाचे मन स्मृतिरंजन करीत बसते.

     सगळे योगाचार्य ‘स्मृती’ बद्दलचे असे शास्त्र स्पष्ट करत असले तरी सर्वसामान्य माणसासाठी ‘स्मृती जागवणे’ आणि काहीतरी ‘विस्मृतीत टाकणे’ ही एक मोठी कला आहे. ही कला ज्याला साध्य होते, त्याचे जीवन सुखी होते.मला काय आठवायचं आहे, काय विसरायचं आहे, आणि असे का करायचे आहे, याची स्पष्टता ज्याच्याजवळ असेल ना, त्याच्या आयुष्यात कुरकुरीला आणि तक्रारीला जागा राहत नाही. माझा मेंदू, माझे मन माझंच ऐकणार नसेल तर ‘माझा’ उपयोग काय? माझं इतरांनी ऐकावे असं जे मला वाटतं, त्याला अर्थ काय?

योगाचार्य कोल्हटकरांनी मोठे छान सांगितलेले आहे, “या वृत्तीरूप जंजाळाचा द्रष्टा आत्मा असल्यामुळे तो त्यापासून अगदी वेगळा असतो. पण तो वेगळा असल्याचा विवेक न होणे हीच अविद्या होय. या अविद्यारूप क्लेशाने युक्त असलेल्या वृत्ती क्लिष्ट वृत्ती होत. योग या क्लिष्ट वृत्तींचा निरोध करण्यास सांगतो.”

     व्यक्तिगत जीवनातल्या आठवणी हा तर ज्याचा – त्याचा प्रश्न आहे. पण या समाजजीवनात, राष्ट्र्जीवनात आपल्या काही सामूहिक जबाबदाऱ्या आहेत. ज्यांचे विश्वकल्याणात फार मोठे योगदान असणार आहे. तेव्हा माझ्या देशाला त्याच्या आध्यात्मिक स्वभावाची आत्मविस्मृती कधीच होऊ नये, एवढीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना ! विश्वकल्याणासाठी प्रत्येक भारतीय कटिबद्ध आहे. त्याने ईशचरणी समर्पित व्हावे. ‘कर्मातचि तुझा भाग, तो फळात नसो कधी’, या नि:संगतेने ज्ञानपूर्ण, भक्तियुक्त कर्मयोग आचरावा. त्याच्या स्मृतींचा गंध स्थल-कालाच्या मर्यादा ओलांडून निरंतर दरवळत राहील.

वृंदा आशय     

Sunday, 1 August 2021

ज्ञानदीप तेवत राहो

 

ज्ञानदीप तेवत राहो

 

वडीलधा-यांनी आशीर्वाद दिले, सहका-यांचे प्रोत्साहन मिळाले, योग तज्ज्ञांनी कौतुकाची थाप दिली, मग मनोवृत्ती प्रफुल्लित होणार नाहीत का? मन आनंदी झालं की मनाची कवाडं उघडतात. बंद दरवाजे उघडले की मोकळं वारं खेळायला लागतं, स्वच्छ प्रकाश पसरायला लागतो. स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसायला लागतं. खूप काही कळायला, समजायला लागतं. माणूस ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. तेव्हा या प्रफुल्लित मनोवृत्तीने वळूयात महर्षी पतंजलींच्या सातव्या सूत्राकडे जे ज्ञानप्राप्तीची प्रमाणे विषद करते-

प्रत्यक्षानुमानागमा: प्रमाणानि || (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ७)

(सूत्रार्थ - प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम ही तीन प्रमाणे होत.)

सहाव्या सूत्रामध्ये महर्षींनी प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती या पाच प्रमुख मनोवृत्ती असल्याचे निर्देशित केले आहे. सातव्या सूत्रामध्ये ‘प्रमाण’ या पहिल्या वृत्तीबद्दल ते स्पष्टीकरण देतात. या वृत्तीचे तीन प्रकार. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये याचा सूत्रार्थ सांगताना स्वामी विवेकानंद नोंदवतात – प्रत्यक्षानुभव, अनुमान व आप्तवचन (अधिकारी व्यक्तींचे शब्द) ही प्रमाणे होत.

         स्वामीजी सांगतात प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे जे काही आपण पाहतो किंवा अनुभवतो ते. इंद्रियांना भ्रमात पाडणारी कोणतीही गोष्ट न घडल्यास मला जे दिसेल वा अनुभवास येईल ते प्रमाण मानलं पाहिजे. मी हे जग पाहतो, अनुभवतो हाच जगाच्या अस्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे. याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. प्रति + अक्ष = प्रत्यक्ष. आपल्या डोळ्यांसमोर जे घडतं ते प्रत्यक्ष. डोळ्यांबरोबरच कान, नाक, जीभ व त्वचा ही सर्व ज्ञानेन्द्रिये प्रत्यक्ष प्रमाण देतात. ऐकल्याबरोबर मन ध्वनीच्या उगमापाशी सरूपता साधतं, गंध आल्याबरोबर त्याच्या उगमाशी, चव लागल्याबरोबर त्याच्या मूळ कारणाशी तर स्पर्शाबरोबर मोहरलेले मन त्या अनुभवाशी सरूप होतं. हे असं मूळापाशी जाणं घडत असतं म्हणून ती प्रमाण वृत्ती. पाचही ज्ञानेंद्रियांकडून येणार ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण या सदरात मोडतं, असं योगशास्त्राचे अभ्यासक डॉ. प.वि.वर्तक यांनी आपल्या, ‘पातंजल योगदर्शन : विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथामध्ये नोंदवलेलं आहे.

         अचूक स्वरुपात ज्ञानग्रहण करण्यासाठी आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. लहान मुलांची ही क्षमता अगदी तीव्र आणि तीक्ष्ण असते. त्यामुळे अनुभव त्यांच्या थेट आत उतरतो. अनुभवाचा अर्थ लावणारे मन, बुद्धी सक्षम पाहिजेत. माणसाने हलक्या कानाचे, दुर्बल मनाचे नसावे. त्यातच आजच्या काळात पाहणे म्हणजे फक्त समोर घडणारेच नाही. यंत्रांच्या माध्यमातून पाहणे अधिक घडते. दुर्बीण दूरपर्यंतचे दाखवू शकते तर टीव्ही, मोबाईल सगळं जग समोर आणून ठेवतात. संगणक, मोबाईल हाताळताना आमची तारांबळ उडते. सगळे पर्याय  तिथेच असतात पण पाहता येत नाहीत. करून पाहण्याची तयारी नाही. आपण होऊन माहिती, ज्ञान घेण्याची उत्सुकता नसते. संयम आणि चिकाटी नसते. ते वाढवले पाहिजेत.

    मात्र दरवेळी प्रत्यक्ष प्रमाणाचा आग्रह धरता येत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाला काही मर्यादा पडतात. ज्ञान तर त्याच्या व्यापक आणि मूळ स्वरुपात होणे आवश्यक आहे. त्यामुळे आणखी काही प्रमाणे ठरवलेली आहेत. अनुमान हे दुसरे प्रमाण होय. मनाचे या अर्थी मान हा शब्द तयार होतो. मनाचे ज्ञान म्हणजे मान होय. उदाहरणार्थ मी असे मानतो. शेवटी आपल्या मानण्या, न मानण्यावर, सामूहिक मान्यता देण्यावर आपण ‘प्रमाण’ काय ते ठरवत असतो. मनाच्या मागोमाग येते ते ‘अनुमान’ होय. तर्क होय. एखाद्या चिन्हावरून त्यानं सुचवलेल्या वस्तूचं ज्ञान होतं. उदा. धूर पाहून तिथे अग्नी आहे असे ज्ञान झालं, याला म्हणतात अनुमान प्रमाण. रेडिओवर गायक गातो. आपण आवाजावरून ओळखतो, कोण गात आहे ते. फुलं समोर  दिसत नसले तरी दुरूनच सुगंध येतो. फुलं दिसत नाहीत पण आपण अचूक ओळखतो कोणती फुलं आहेत मोगरा, गुलाब, निशिगंध की रातराणी, सहज सांगतो. मागच्या अनुभवावरून ते ओळखतो. अनुमाना मुळे स्थलकालाची मर्यादा ओलांडली जाते. पूर्वी काय घडले होते आणि पुढे काय घडणार याचा अंदाज बांधता येतो. आपल्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे हे अनुमान बरोबर किंवा चूक  ठरते.

         
आगम हे तिसरे प्रमाण आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते आगम प्रमाण म्हणजे आप्तवाक्य. आप्तवाक्य म्हणजे ज्यांना सत्याचा मूर्त साक्षात्कार झालेला आहे अशा योग्यांची प्रत्यक्ष अनुभूती. जो विशुद्ध सत्वाचा योगी असतो, जो पवित्र, निर्मोही, नि:स्वार्थी, नि:संग आणि अतिंद्रीय ज्ञानी असतो त्याला भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व उघड्या पुस्तकासारखे वाचता येतं. त्याचे शब्द प्रमाण असतात. कारण ज्ञानाचा त्याला स्वतःच्या अंतर्यामी साक्षात्कार झालेला असतो. तो सर्वज्ञ असतो. असेच पुरुष शास्त्रांचे प्रणेते असतात आणि म्हणूनच शास्त्र ही प्रमाण होत.

         डॉ. प. वि. वर्तक ‘आगम’ प्रमाणाचा वेगळा अर्थ लावतात. त्यांच्या मते काही वेळा अनुमान करणे जमत नाही कारण आपले ज्ञान त्या तोडीचे नसते. मग ‘आगम’ हेच प्रमाण असते. आगम म्हणजे आपल्यापर्यंत आलेले ज्ञान. हे ज्ञान आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत येते किंवा वर्तमानकालीन ज्ञानी माणसांकडून आपल्यापर्यंत येते. माणसाच्या मर्यादित आयुष्यात सर्व ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने मिळवणे केवळ अशक्य असते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण आगम प्रमाण व्यक्त करते. इतरांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण ज्ञान कमावणे म्हणजे आगम. हे इतर म्हणजे जगातील यच्चयावत लोक. कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंतचे सारेच यात सामावले जातात.

    आगमाची अशी व्यापकता वाढली की ज्ञानाचे पावित्र्य जाणीवपूर्वक  टिकवावे लागते. ज्ञान हे सत्यज्ञान असले पाहिजे. ते पूर्वज्ञानाला विरोधी नसावे. शास्त्राच्या कसोटीवर कोणालाही पारखून घेता यावे. ज्ञान आणि ज्ञानोपासकाचे चारित्र्य या दोघांचेही तेज परस्परावलंबी असते. लोक आणि श्लोक हे दोन शब्द एकमेकांच्या फार जवळ जातात. लोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारली पाहिजे. माहितीचा पसारा न देता ज्ञानाचे मांगल्य पुढे नेता आलं पाहिजे.

    आज मला मोठा आनंद आहे. या सूत्राचे विवेचन करत असताना वर निर्देशित केलेल्या सर्व गुणांनी युक्त अशा दोन महापुरुषांचे संदर्भ आजच्या दिवसाला आहेत. या ज्ञानी, कर्तृत्ववान आणि कल्याणकारी अशा  महापुरुषांची एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी आहे.

    .....पण खेद याचाच आहे, सामान्य माणसापर्यंत पोहचलेलं ज्ञान त्याला सांगतंय, कोणत्याही एकाच महापुरुषाचा पुरस्कार कर. पर्यायाने वास्तव इतिहासाचा तिरस्कार कर. आपल्या भूमिकेने वर्तमानात हाहाकार निर्माण करणा-या माणसाने, समाजाने आत्मपरीक्षण करून आपले काय चुकतंय याचे ज्ञान करून घेणे, ही काळाची गरज आहे.

वृंदा आशय   

Monday, 21 June 2021

योगायोग

व्यक्त व्हावं असं वाटलं आणि व्यक्त होण्यासाठी ब्लॉगचं माध्यम निवडलं. काही बोलावं. काही लिहावं. काही सांगावं. काही ऐकावं. हे करता करता आपल्यातलं माणूसपण गवसावं, एवढाच हेतू. आठवड्यातून एकदा त्यासाठी आपल्या भेटीला येईल.

लिहायचं ठरलं. पण काय लिहावं? घनगंभीर विषयांची एक यादीही मनात चमकली. मात्र त्याबरोबर ‘अभ्यासोनी प्रकटावे, नाही तरी झाकोनी असावे’ हा संत रामदासांचा दंडुकाही मागोमाग आला. तेव्हा या नव्या माध्यमाची स्वतःला सवय लावताना काहीतरी स्फुट लिहावं, असं सध्यातरी ठरवलं. निमित्त-प्रसंगांनी येणारं, कधीतरी वाचलेलं, मनात घोळत राहणारं, दैनंदिन जीवनात निर्णय घेताना हे का ते या घोळात टाकणारं, कधी विचारानं मार्ग दाखवणारं, कधी अतिविचारानं गुंता वाढवणारं. असं काहीही लिहावं, मोकळं व्हावं!

आज ‘योग दिन’. ‘योग’ भारतीय संस्कृतीला व्यापक आणि सखोल तत्वज्ञान, जीवनपद्धती देणारा एक राजमार्ग. हा मार्ग अनुसरावा असा संकल्प अनेकवेळा होतो. योगशास्त्राचा दैनंदिन जीवनात व्यावहारिक पातळीवर विचार करताना सहज मनात आलं, शरीर-मनाची सांगड घालावी हे योगाचं सांगणं. जिथे आपण शरीरानी आहोत तिथं मनानी राहावं इतकंच मागणं. पण खरंच हे साधणं सहज आहे का? अनुभवाला तर येतं हे सगळ्यात कठीण आहे. एका ठिकाणी बसलो तरी मन आपलं सगळीकडे बागडून येतं. स्वतःचंच मन आणि आपलंच ऐकत नाही. असं जर होतं, तर इतरांनी आपलं ऐकलं नाही म्हणून आपण तक्रार का करतो? आधी आपण आपलं ऐकावं, मग दुसऱ्यांना ऐकवावं. ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीत केवढा मोठा अर्थ अभिप्रेत आहे ना? हा अर्थ लक्षात आला की ‘सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो’, म्हणजे काय हे कळायला लागतं. कोणाचं तरी बोलणं प्रेरणेचा झरा, परिवर्तनाचा स्रोत का ठरतं आणि बाकीच्यांचं शब्दांचं अवडंबर का वाटतं, यामागचं रहस्य उलगडायला लागतं.

हा अवघड वाटणारा योग साधण्यासाठीच, महर्षी पतंजलींच्या योगशास्त्रातलं, समाधिपादातलं पहिलं सूत्र सांगतं, ‘अथ योगानुशासनम्’ ! अनुशासन म्हणजे अभ्यास करणे, वापर करणे, अमलात आणणे. योगशास्त्राची परंपराप्राप्त शिकवण आचरणात आणायची. मुळातच शासन, अनुशासन, शिस्त म्हणलं की मन बिथरतं. त्याच्या स्वातंत्र्यावरची बंधनं त्याला सहन होत नाहीत. वास्तविक पाहता शिस्तीवर जीवनाची भिस्त असते. बेशिस्त होऊन आयुष्याचे टक्के-टोणपे खाल्ले की तिचं महत्त्व कळायला लागतं. मात्र ही शिस्त दुसऱ्याने कोणी लावली तर ती जाचक वाटते. दुसऱ्याचं पटत नाही आणि आपल्याला जमत नाही, अशी स्थिती होते. या सगळ्या गदारोळातून स्वयंशिस्तच मार्ग दाखवू शकते. करडी शिस्त लागावी पण काळ-परिस्थितीनुसार तिच्यात लवचिकताही ठेवावी. कवी मंगेश पाडगावकर तर म्हणतात, ‘शिस्त गुणगुणता आली पाहिजे.’ अर्थातच शिस्तीतही स्वाभाविकता, सहजता, आनंददायीपण टिकलं पाहिजे. शिस्त हा सहज स्वभाव व्हावा. तसं झालं की अनेकविध संधी सहजतेनं स्वीकारता येतात. विकासाच्या वाटा खुल्या होतात.        

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीनुसार दुसऱ्याच्या अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवली तर आयुष्याला गती येते. बंधनं पाळली तरच आयुष्याचं धन हातात येतं, अन्यथा निर्धन व्हायला वेळ लागत नाही. गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रचलित असलेल्या योगशास्त्राचं पहिलं सूत्र सांगतं, प्रत्येक परंपरेतलं शहाणपण जोपासत आलं पाहिजे, तरच माणूसपण समृद्ध होतं. हे शहाणपण जोपासण्यासाठी, माहितीच्या महापुरातही अनुभवाची जहाजंच तारून नेऊ शकतात. त्यामुळं अनुभव गाठीशी बांधता आला पाहिजे. त्यासाठी समाजातली, कुटुंबातली अनुभवी माणसं जोपासता आली पाहिजेत. ही परंपरा, हे अनुशासन मंगलतेकडे घेऊन जाणारी असेल, याची खात्रीच ‘अथ’ हा मांगल्यवाचक शब्द देतो.

वृंदा आशय


विराम माझ्या असण्याला !

                        विराम माझ्या असण्याला !          विराम माझ्या असण्याला !             जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतरा...