Sunday, 21 June 2026

विराम माझ्या असण्याला !

 

                      विराम माझ्या असण्याला !  

     


विराम माझ्या असण्याला !  

        जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतराव्या सूत्रामध्ये संप्रज्ञात समाधीचा परिचय करून घेतला  होता.  जिज्ञासूंच्या अभ्यासासाठी सूत्र क्र. १७ चा दुवा इथे देत आहे.  

                  https://vrunda-deshpande-joshi.blogspot.com/2022/06/blog-post.html

आता त्यापुढील अठराव्या सूत्राकडे वळूयात. 

विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोन्य:  ||१८|| 

 ( पातंजल योगदर्शन, समाधी पाद, सूत्र  क्रमांक १८)

'विरामप्रत्ययाभ्यासपूर्व: संस्कारशेषोन्य:' हे अठरावे सूत्र आपल्याला सांगते 'विराम' म्हणजे 'चित्तवृत्तींचा  उपशम'.  चित्तवृत्तींचा उपशम या साक्षात्काराचा पुन्हा पुन्हा अनुभव घेणे म्हणजे असंप्रज्ञात समाधी होय. वरील सूत्रातील 'विरामप्रत्ययाभ्यासपूर्व:' हे पद असंप्रज्ञात समाधीचा हेतू सांगते तर 'संस्कारशेषोन्य:'  हे पद असंप्रज्ञात समाधीचे स्वरूप सांगते.  

        सवितर्क समाधीमध्ये चित्ताची आलंबने एकाहून एक सूक्ष्म असतात. सास्मित समाधी पर्यंत आलेल्या योग्याला पूर्वीची आलंबने टाकून त्याहून सूक्ष्म आलंबनाचे ग्रहण करण्याची सवय झालेली असते. या सवयीच्या बळावर त्याने 'मी आहे' या सूक्ष्म वृत्तीचा ही त्याग करावयाचा असतो. 'योगेन योगो ज्ञातव्यो योगो योगात्प्रवर्तते' या वचनाचा अर्थ हाच आहे. 'मी आहे' या सूक्ष्म अहंकार वृत्तीचा संथ प्रवाह पूर्वीच्या अभ्यासबलाच्या सहाय्याने क्षणाक्षणाला बंद करावयाचा प्रयत्न साधकाने केला म्हणजे तेवढ्या क्षणापुरता त्या वृत्तीचा निरोध हळूहळू साधू लागतो. ज्या क्षणात तो साधतो तेवढ्या क्षणापुरता सर्व वृत्तींचा उपशम झाला, हाच सर्व वृत्तींचा विराम होय. या विरामाचा क्षणाक्षणांनी वाढता प्रत्यय घेणे हाच सूत्रात सांगितलेला 'विरामप्रत्ययाभ्यास' होय.  

        असंप्रज्ञात समाधी साध्य होण्यापूर्वी हा 'विरामप्रत्ययाभ्यास' करावयाचा असतो. या अभ्यासातूनच निर्वृत्तिक असा 'असंप्रज्ञात समाधी' साध्य होतो. हा अभ्यास असंप्रज्ञात समाधीचे कारण होय. हा अभ्यास दृढमूल झाला म्हणजे 'मी आहे' ही सूक्ष्म वृत्ती अथवा हे सूक्ष्म स्फुरण हृदयाकाशात निर्माण होण्याचे थांबते. सर्व वृत्तींचा क्षय होऊन चित्त द्रष्ट्याच्या ठिकाणी संस्कारमात्र राहते. चित्तात वृत्ती उठतील तर त्या वृत्तींशी द्रष्ट्याचे सारुप्य होईल पण चित्तच निर्वृत्तिक झाल्यावर द्रष्टा स्वरूपाने अवस्थित होतो आणि सर्वथा निर्व्यापार झालेले चित्त द्रष्ट्याच्या ठिकाणी केवळ संस्कारमात्र उरते. हा असंप्रज्ञात  समाधी 'विराम-प्रत्ययाभ्यासपूर्व' आणि 'संस्कारशेष' असा असतो.

        'राजयोग' या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद सांगतात असंप्रज्ञात समाधीची अवस्था ही पूर्ण ज्ञानातीत अशी अवस्था आहे. तिच्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. एखाद्याला सर्व शक्ती प्राप्त होऊनही त्याचा अध:पात होणे शक्य आहे. जोपर्यंत आत्मा प्रकृतीच्या अतीत होऊन संप्रज्ञात समाधीच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत पतनाचे भय उरते. या उच्चतर समाधीच्या सततच्या अभ्यासाने  मनाची चंचल, जड प्रवृत्ती नष्ट होतेच पण त्याबरोबरच सत्प्रवृत्ती देखील नाहीशी होऊन जाते. ही समाधी निर्बीज रूप धारण करते.

        'पातंजल योग :  विज्ञाननिष्ठ निरूपण'  या ग्रंथात  डॉ. प. वि. वर्तक यांनी वरील सूत्राच्या अर्थामध्ये 'मनुष्याच्या अस्मितेचा विराम करावयास पाहिजे', असा अर्थ सूचवलेला आहे. जोपर्यंत अस्मिता आहे तोपर्यंत 'मी पण' आहे. द्वैताची स्थिती आहे. म्हणून संप्रज्ञात समाधी ही ज्ञानदायक स्थिती आहे परंतु 'मी पण'  मिटला, 'मी' पणाचे ज्ञान मिटले की असंप्रज्ञात समाधी सुरू होते.

        मात्र व्यवहारामध्ये माणूस अस्मिताशून्य वागू शकत नाही. सरावाने, अभ्यासाने मीपणा नाहीसा होणे व परत अवतरणे यामधील काळ ही 'विराम' अवस्था असते. त्याचे वर्णन करता येत नाही तर त्याचा अनुभव घेणे, प्रत्यय घेणे एवढेच आपल्या हातात आहे. ही असंप्रज्ञात समाधी 'संस्कारशेष' असते हे सांगताना ते म्हणतात हे संस्कार जीवाचे असतात, शरीराचे असतात आणि त्यामुळे माणसाचे दैनंदिन जीवन हे या संस्कारांच्या आधारे सुरू राहते. तर स्वामी आनंद ऋषी सांगतात, "  'आहे'पणाचे  ज्ञान मिटले की असंप्रज्ञात समाधीचा प्रांत सुरू होतो. जीवाच्या हातून गोष्टी सहजतेने घडतात आता मन आणि बुद्धी यांची जीवनामध्ये अडचण वाटत नाही." थोडक्यात 'अस्मिता' हा मनाचा भाव आहे आणि तो भाव असंप्रज्ञात समाधीमध्ये पूर्णपणे विराम पावतो.

            आजच्या योग दिनाच्या निमित्ताने पतंजली ऋषींचे हे सूत्र आणि त्यावरील विविध भाष्ये वाचली तेव्हा कै. नरहर कुरुंदकर यांच्या कधीतरी वाचलेल्या, "एखादी गोष्ट  येत नाही म्हणून सोडणे म्हणजे न्यूनत्व व करता येऊनही सोडणे म्हणजे ऋषीत्व" या वाक्याचा गर्भितार्थ स्पष्ट झाला.   

 

संदर्भ ग्रंथ

 

१. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन - योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर

२. राजयोग - स्वामी विवेकानंद 

३. 'पातंजल योग :  विज्ञाननिष्ठ निरूपण'  - डॉ. प. वि. वर्तक

 

 


Friday, 19 June 2026

प्रवास पूर्णत्वाचा !

 



•| ॐ |•

प्रवास पूर्णत्वाचा !

 


ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

अर्थ : हा मंत्र वैश्विक पूर्णतेचे (ईश्वराचे) वर्णन करतो. 'ते (परम सत्य) पूर्ण आहे आणि हे (दृश्य जग) देखील पूर्ण आहे. पूर्ण सत्यातूनच या पूर्ण सृष्टीचा उगम होतो. त्या पूर्णत्वातून पूर्णत्व काढून घेतले तरीही, मूळ पूर्णत्वच शिल्लक राहते.'

काल 'समग्रता' आणि 'चक्रीयता' या भारतीय संस्कृतीच्या विशेषांबद्दल लिहिल्यापासून वरील श्लोक  मनामध्ये सतत घुमतो आहे. मी तो पहिल्यांदा ऐकला होता १९९६ साली. त्या वेळेला मी बारावीच्या वर्गात शिकत होते. त्याच वर्षी 'योग विद्या धाम' या संस्थेच्या माध्यमातून माझ्या योगशिक्षणाला प्रारंभ झालेला होता. आधी माझ्या वडिलांनी हे योग शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी योग विषयक आणलेल्या पुस्तकांमध्ये हा श्लोक होता. त्याचे वाचन करून या श्लोकाचा अर्थ त्यांनी आम्हाला सांगितला. अर्थ ऐकल्याबरोबर मी आणि माझी बहीण वर्षा खो खो हसत सुटलो.

            "पूर्णातून पूर्ण काढल्यावर पूर्णच शिल्लक राहते" ही कल्पनाच आम्हाला मोठी गमतीदार वाटली. असे काही होते तर गणित विषयाची आवश्यकताच काय? पूर्णातून पूर्ण काढायचे कशासाठी, असे अनेक प्रश्न आम्ही वडिलांना विचारले होते. नेहमीच्या गणितातील बेरीज - वजाबाकी मोठ्या मुश्किलीने करणाऱ्या आम्ही. पूर्णांक - अपूर्णांक हे शब्द उच्चारल्यानंतर आज देखील गणिताची सारी चिन्हे सभोवती फिरायला लागतात आणि मेंदूची चक्रीय गती (चक्कर येणे) वाढण्यास सुरुवात होते ; ही माझी गणित विषयातील स्थिती. मात्र वरील श्लोक ऐकल्यानंतर 'पाचातून तीन गेल्यावर दोन राहतात' हे 'पूर्णातून पूर्ण काढल्यावर पूर्णच राहते' त्यापेक्षा खचितच सोपे वाटले होते. वडिलांनी त्यांच्या परीने श्लोक समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्हीही माना डोलावल्या. मात्र पाचातून पाच काढले तर शून्यच राहायला हवे. पाच कसे राहतील? हा प्रश्न काही पिच्छा सोडत नव्हता.

            मला वाटतं या श्लोकाचा भावार्थ समजण्यासाठी मला दोन दशके लागली. मुळामध्ये हा प्रश्न गणितातील नाही, (खरं म्हणजे हे विधान ठामपणाने करताना माझंच मन माझ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं करत आहे, 'खरंच?') तर तत्त्वज्ञानातील आहे. (मात्र अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून आपण जी शाखाभिन्नता मान्य केलेली आहे तिच्या आधारे हे विधान मी करत आहे.)

            या संपूर्ण श्लोकाचा भावार्थ लक्षात घेतला तर तो असा -

          हे (परमतत्त्व / परमात्मा) पूर्ण आहे. ही (सृष्टी) पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निर्माण झाल्याने ते पूर्णत्वाचाच अनुभव देते. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते.

         हा भावार्थ समजून घेण्याच्या दृष्टीने आपण आपल्या समजूतीच्या पायरीपासून पुढे जाऊयात. आपल्या गणितीय सूत्रानुसार पूर्णातून पूर्ण काढल्यावर शून्य शिल्लक राहायला हवे. (उदा. ५ - ५ = ० ) 'शून्य' या गणितीय संज्ञेचा विचार करताना आपल्याला लक्षात येते 'शून्य' ही भारताची जगाला सर्वात मोठी देणगी आहे. ती कोणत्याही अंकाच्या पुढे लावली की त्या मूळ अंकाची किंमत वाढत जाते. (उदा. १०, १००, १००० इ.)

            आपण आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये 'शून्य' या प्रतिमेचा अनेक वेळा उल्लेख करतो. उदाहरणार्थ ' तो शून्यात नजर लावून बसला' , ' त्याचे योगदान शून्य' , 'त्याने शून्यातून विश्व निर्माण केले' या तिन्ही ठिकाणी 'शून्य' हा शब्द आपण 'पूर्ण अभाव' या अर्थी वापरतो.            

             तत्त्वज्ञानामध्ये 'शून्य', 'महाशून्य' या संज्ञा आपल्याला दिसून येतात. मी स्वतः कै. दुर्गाबाई भागवत यांचे साहित्य वाचत असताना या 'शून्य', 'महाशून्य' चे संदर्भ वाचलेले आहेत. तथापि या संकल्पनेवर माझा अद्याप अभ्यास झालेला नाही. त्यामुळे केवळ संदर्भ म्हणून इथे त्याचा उल्लेख करत आहे. येथील शून्य हे 'अनंतता' दर्शवणारे आहे.

               आपल्या सामान्य तौलनिक बुद्धीने विचार केला असता स्वाभाविकच प्रश्न पडतो एकीकडे शून्य म्हणजे 'पूर्ण अभाव' आणि एकीकडे शून्य म्हणजे 'अनंतता' ; हे कसे शक्य आहे? ही पूर्ण विसंगती आहे हे आपल्या लक्षात येते. एकाच शून्याचे हे दोन अर्थ स्वीकारण्यास नकार देण्याची प्रक्रिया सुरू होते.

             इथे मला वाटतं आपण जेव्हा 'शून्यातून विश्व निर्माण केलं' असं जे म्हणतो या वाक्याचा आकारानुसार विचार केला तर 'शून्य' हे 'गोलाकार' आहे आणि विश्व हे देखील 'गोलाकार' आहे. हवं तर एक छोटा आकार आणि एक मोठा आकार, मात्र दोन्हीही समान ; हे आपल्या बुद्धीला पटू शकते. म्हणजेच मानवी जीवनाचा किंवा मानवी कर्तृत्वाचा प्रवास हा 'शून्याकडून महाशून्याकडे' आहे. याचाच अर्थ तो पूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे आहे.

            कसा ? एखाद्या वृक्षाचा प्रवास हा बीजापासून सुरू होतो तो वटवृक्ष होईपर्यंत. वटवृक्ष पुन्हा बीज देतो. दिवस उगवतो तो अंधारामधून आणि मावळतो तो देखील अंधारात, उद्याच्या प्रकाशाचा दिलासा देत. मातीतून घडा निर्माण होतो, तो पुन्हा मातीतच विलीन होतो. पंचमहाभूतातून आणि त्रिगुणातून माणूस निर्माण होतो तो पुन्हा त्यातच विलीन होतो. भाषेचा प्रवास मूलध्वनीतून सुरु होतो तिचे विघटन करत करत आपण पुन्हा मूलध्वनीकडे येतो.

           मनुष्याच्या वाढीच्या अवस्था आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येते बालपणी, निरागस असताना ; जे आपल्याला वाटत होते, जाणवत होते आणि नकळत आपण करत होतो तेच आपण मोठे होण्याच्या प्रवासामध्ये कुठेतरी हरवून बसतो आणि पुन्हा एकदा जाणते होऊन, शहाणे होऊन त्याच मार्गावर जाण्यास सांगतो.

             कसे ? लहान मुलांची भांडणे चटकन मिटतात , ती पुन्हा खेळण्यासाठी पटकन एकत्र येतात. मोठ्या माणसांची भांडणे मिटता मिटत नाहीत. भांडणे मिटवल्यासारखी दाखवली तरी मनातल्या गाठी सुटता सुटत नाहीत. 'सुंभ जळाला तरी पीळ जात नाही' , 'स्वभावाला औषध नाही' यासारख्या आपल्या म्हणी कदाचित हीच स्थिती व्यक्त करतात. आयुष्य थकलेल्या , मृत्यूशय्येवर निजलेल्या व्यक्ती, 'आयुष्यात माणसेच महत्त्वाची आहेत अन्य काही नाही' असे सांगत असतात. खूप पैसा कमावलेला उद्योजक 'आयुष्यात पैसा फार महत्त्वाचा नाही',  हे सांगत असतो आणि ज्यांच्याकडे 'पैसे नाहीत', जे गरीब आहेत त्यांना स्वाभाविक प्रश्न पडतो, "बाबारे ! सगळं आयुष्य उपभोगून झाल्यावर तू हे सांगतो आहेस. आम्हालाही थोडा पैसा कमावून उपभोग घेऊन पाहू दे ना!" शस्त्रसज्ज झालेले देश अन्य देशांना शस्त्रास्त्र वाढवू नका ; अहिंसा, मानवता याच महत्त्वाच्या आहेत ; म्हणून सांगतात, वारांगणेसारख्या फिरणाऱ्या त्यांच्या राजनीतीचा वास त्यातून आपल्याला येतो. यात चूक काहीच नाही.

          थोडक्यात, आदी-अंती समग्रता आहेच. त्या समग्रतेच्या वाटेला चक्रीयता असल्याने आपण असेच फिरत राहणार. फक्त हे फिरणं 'जाणीवपूर्वक', 'ज्ञानयुक्त' झालं तर मग जगणं निरामय होतं इतकंच. ‘सा विद्या या विमुक्तये’ हा प्रत्यय खरोखरच अनुभवण्यासारखा आहे.

 

श्रीकृष्णार्पणमस्तु!


Friday, 24 June 2022

पुनश्च हरि ॐ !


 

(दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग  ) .  

पुनश्च हरि ॐ !

                                                                        

        
जागतिक योग दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गेल्या वर्षी याच दिवशी 'योग रहस्य' या ब्लॉग अंतर्गत योगसूत्रांच्या विवेचनास प्रारंभ केला होता. एकूण १६ सूत्रे गतवर्षी पाहिली. आजही त्या लिंकवर जाऊन आपण सर्व सूत्रांचे विवेचन वाचू शकता.व्यस्ततेमुळे मध्ये त्यात खंड पडला होता. आजच्या ‘योग दिनी’ या ब्लॉगचा पुन्हा प्रारंभ करत आहे. दर महिन्याला किमान एका सूत्राचे विवेचन करावे आणि ते दर २१  तारखेला किंवा त्या आठवड्यात प्रकाशित करावे असा मानस आहे. मध्ये खंड पडला होता तरी आपण सर्व सोबत आहातच या आत्मविश्वासाने हे पाऊल उचलत आहे.


      
आज माझ्या दिवसाची सुरुवात  सुंदर झाली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या लाल मैदानात योग वर्ग घेऊन सुरू होणारा दिवस किती आनंददायी आणि साऱ्या योग आठवणींना उजाळा देणारा असू शकतो याचा सुरेख प्रत्यय घेतला. त्रिवार ॐकार, गुरुवंदन आणि महर्षी पतंजलींना केलेले वंदन, मला जवळपास २५ वर्षांच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेले. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या योग शास्त्राविषयी त्यानिमित्तानं कृतज्ञता व्यक्त करता आली. ती कृतज्ञता मनात ठेवूनच वळत आहे पतंजली महामुनींच्या सतराव्या सूत्राकडे –



वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञात: ||१७||

( समाधीपाद, सूत्र क्र. १७, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन - कृष्णाजी केशव कोल्हटकर )



सूत्रार्थ - संप्रज्ञात समाधीसाठी चित्ताला स्थूल आलंबन असणे हे वितर्काचे रूप, सूक्ष्म आलंबन असणे हे विचाराचे रूप, सत्त्वगुणाची सुखात्मता आलंबन असणे हे आनंदाचे रूप आणि मी आहे एवढेच केवळ स्फुरण आलंबनार्थ असणे हे अस्मितेचे रूप . या चारांच्या रूपांशी चित्ताचा जो अनुगम म्हणजे चित्ताची तदाकारता तिच्या योगाने सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असा चार प्रकारचा संप्रज्ञात समाधी होतो.

     
सोळाव्या सूत्रामध्ये गुणवैराग्याचा परिचय आपण करून घेतला. गुणवैराग्य समाधीतून उत्पन्न होते. या १७ व्या सूत्रात संप्रज्ञात समाधीचा परिचय करून दिलेला आहे. ही संप्रज्ञात समाधी ही वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता या भावांनी युक्त असते.    व्यावहारिक पातळीवरून दैनंदिन जीवनाशी निगडित असे विवेचन करताना मला या सूत्रातल्या संकल्पना आधी समजावून घेणे महत्त्वाचे वाटते.

 

समाधी म्हणजे काय ?

     ‘समाधी’ ही संकल्पना अष्टांग योगातील आठवे / शेवटचे अंग म्हणून आपल्याला परिचित आहे. ‘समाधी’ या शब्दाबद्दल, अवस्थेबद्दल जनमानसात आजही एक प्रकारचा आदर दिसून येतो. सर्वसाधारणपणे विभूतींनी कार्यपूर्ती करून आयुष्याला दिलेला पूर्णविराम या ‘समाधी’ संकल्पनेतून व्यक्त होतो. मात्र त्याचबरोबर दैनंदिन कामात, आवडत्या कामात, प्राविण्यप्राप्त कामात व्यक्ती तल्लीन झालेली दिसली की आपण त्याची ‘समाधी लागली’ असा शब्दप्रयोग करतो. तसेच कोणत्याही कलेतून अत्त्यूच्च दर्जाचा आनंद मिळत असेल तरी वाचक – श्रोता - प्रेक्षक यांच्या रंगून जाण्यातून, समाधान पावलेल्या भूमिकेतून, वरील शब्दाचा वापर होतो. वरील सूत्राचे विवेचन करताना ही ‘तल्लीनता’ मी स्वत: इथे केंद्रीभूत मानते. स्वाभाविकच कोणत्या तरी गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, एकाग्रता साधून माणूस तल्लीन होत असतो. ज्यावर आपण एकाग्र होतो त्याला योगशास्त्राच्या परिभाषेत ‘आलंबन’ असे म्हणतात. समाधीसाठी स्थूल वा सूक्ष्म आलंबन आवश्यक असते. सर्व तऱ्हेच्या समाधीमध्ये मनाला इतर सार्‍या विषयांपासून दूर करून एका विशिष्ट विषयाच्या – स्वीकारलेल्या आलंबनाच्या - ध्यानात पुन्हा पुन्हा केंद्रित करावे लागते. ओशो लिहितात, ‘समाधान’ या शब्दातून समाधी हा शब्द आला आहे. तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य वाटणारी मनोदशा म्हणजे समाधी.   


संप्रज्ञात समाधी म्हणजे काय ?

     ‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथात  डॉ.प.वि.वर्तक लिहितात –“समाधीचे संप्रज्ञात व असंप्रज्ञात असे दोन मुख्य प्रकार संभवतात. समाधी अवस्थेत जाताना जर वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता यांचा संबंध मनाशी असेल तर संप्रज्ञात समाधी लागली असे म्हणतात. संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्यात ज्ञान प्राप्त होते अशी समाधी.”

      स्पष्टीकरण करताना ते लिहितात, वितर्क, विचार, आनंद व अस्मिता हे एका पेक्षा एक सूक्ष्मतर असे मनाचे भाव आहेत. कोल्हटकरांच्या स्पष्टीकरणानुसार वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता यांच्या रूपाशी चित्त तदाकार झाल्यामुळे सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मिता असे संप्रज्ञात समाधीचे चार प्रकार होतात. आता या प्रकारांच्या संकल्पना समजावून घेऊ.

१.    सवितर्क संप्रज्ञात समाधी –

‘सवितर्क’ हा संप्रज्ञात समाधीचा पाहिला प्रकार आहे. साधक समाधीच्या अभ्यासाला जेव्हा प्रथमच आरंभ करतो तेव्हा त्याला बाह्य / भौतिक सृष्टीतील स्थूल / दृश्य  आलंबनापासूनच सुरुवात करावी लागते. चित्ताच्या आलंबनासाठी स्थूल आभोग असणे हे वितर्काचे रूप होय. जो विशिष्ट तर्क बाळगून त्यावर आपण चिंतन करतो त्याचे सम्यक ज्ञान या प्रकारच्या समाधीत होते.

विचारांच्या अनुषंगाने तर्क – कुतर्क – वितर्क हे शब्द आपण दैनंदिन जीवनात सहजतेने वापरतो. तर्क म्हणजे परिस्थितीनुरूप अनुमान करणे. कुतर्क म्हणजे चुकीचा किंवा नकारात्मक असा तर्क किंवा अनुमान. वितर्क म्हणजे या अनुमानांपैकी विशेष महत्त्वाचे अनुमान होय. अनेक तर्क आपण करीत राहतो व बुद्धीच्या निकषावर घासून पाहतो. या बुद्धीच्या निकषावर टिकणारा तर्क हा वितर्क होय. योगसूत्रावर भाष्य करताना ओशो लिहितात, “संप्रज्ञात समधीचा पाहिला घटक म्हणजे वितर्क. ज्याला आंतरिक शांती मिळवायची आहे त्याला वितर्काचे, विशेष तर्काचे शिक्षण घ्यायला हवे. म्हणजे मग तो नेहमी एखाद्या गोष्टीच्या प्रकाशमान बाजूकडे, विधायक बाजूकडे पाहील.” विचार आणि विचारीपणा यातील फरक स्पष्ट करत ते सांगतात मनातल्या भाऊगर्दीला आपण विचार मानतो पण महामुनी पतंजलींना विचाराचा जो अर्थ अभिप्रेत आहे, तो विचारांचे आंतरिक अनुशासन करणाऱ्या धाग्याचे, त्यात सुव्यवस्थितपणा आणणाऱ्या अंत:सूत्राचे. त्या अंत:सूत्रालाच ते विचार मानतात.         

 स्वामी विवेकानंदांनी ‘राजयोग’ या ग्रंथात वितर्क म्हणजे प्रश्न असे स्पष्टीकरण दिले आहे.  सवितर्क म्हणजे प्रश्नसहित.  या समाधीच्या वेळी या स्थूल भूतांमधील सारी शक्ती आणि त्यांच्यात निहीत असलेले सत्य आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून जणू काही आपण त्यांना प्रश्न विचारत असतो.  दैनंदिन जीवनात परमेश्वराच्या नवविधा भक्तिद्वारे साधलेली एकाग्रता अथवा तन्मयता योगशास्त्रातील सवितर्क समाधी होय. चित्तवृत्तीनिरोधाच्या अभ्यासाचा हा  प्रारंभ असतो.

 

२.             सविचार संप्रज्ञात समाधी –

‘सविचार’ हा संप्रज्ञात समाधीचा दुसरा प्रकार आहे.  अनेक तर्क वितर्क करून झाले म्हणजे आपण एका विचारावर स्थिर होतो व त्याप्रमाणे वागतो म्हणून त्याला 'विचार' म्हणतात. यात 'चर' म्हणजे 'वागणे' हा धातू आहे. ‘विचार’ हा वितर्कापेक्षा सूक्ष्म व स्थिर असतो. एका विचारावर आपण धारणा करून ध्यान करू लागलो व त्यातच समाधी लागली तर ती ‘सविचार समाधी’ झाली. या विचाराचे उत्तर या समाधीत आपणास मिळते. ‘सवितर्क समाधी’पेक्षा ‘सविचार समाधी’ श्रेष्ठतर आहे. सविचार समाधीत चित्ताला जे आलंबन घ्यावे लागते ते सूक्ष्म असावे लागते. कोणत्याही बाह्य वस्तूची प्रत्यक्ष अपेक्षा न करता मनात ध्येयवस्तूचा विचार येऊन या विचारावरच मन स्थिर करता येऊ लागले म्हणजे ती सविचार समाधी होय. उदाहरणार्थ उपास्य देवतेची मूर्ती पुढे असण्याची आवश्यकता संपली आणि त्या मूर्तीचा नुसता विचार मनात येताच चित्त तदाकार होऊ लागले म्हणजे साधकाचे मन ‘सवितर्का’तून ‘सविचारात’ गेले असे समजावे, हे योगशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे.

 

३.             सानंद संप्रज्ञात समाधी –

आपले वितर्क गेले की विचार येतो. विचारही गेले की नुसता आनंद राहतो. नुसता आनंद असणारी स्थिती म्हणजे सानंद समाधी होय. सानंद संप्रज्ञात समाधीचे स्वरूप नीट लक्षात येण्यासाठी आनंद म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो याचा विचार करणं आवश्यक आहे. साधारणपणाने इंद्रियांचा विषयांशी संयोग घडला, एखादी तीव्र इच्छा पूर्ण झाली, चित्तामध्ये शांती आणि समाधान नांदायला लागले म्हणजे चित्तात आनंद निर्माण होतो. अर्थातच आनंदाचे हे तिन्ही प्रकार निरनिराळे आहेत. या तीन प्रकारांमध्ये आनंदाची उत्कटता उत्तरोत्तर अधिकाधिक अनुभवली जाते. आनंदाची अभिव्यक्ती होण्यास चित्ताची सत्त्वारूढता हे प्रमुख कारण आहे. सत्त्वगुण जीवाला सुखसंग आणि ज्ञानसंग घडवत असतो. त्यातून माणूस विषयानंदाकडून आत्मानंदाकडे वळायला लागतो. चित्तात सत्त्वाचे प्राबल्य वाढल्याने तेथे आत्मानंद प्रतिबिंबित होतो. चित्ताचे सर्व चांचल्य नाहीसे होऊन आलंबनाची आवश्यकता न उरता चित्तात आनंदाच्या वृत्तीचा प्रशांत प्रवाह वाहू लागला म्हणजे ती सानंद संप्रज्ञात समाधी होय.

 

४.    सास्मिता संप्रज्ञात समाधी –

नुसता आनंद असणारी स्थिती म्हणजे ‘सानंद संप्रज्ञात समाधी’ होय. आनंद वाटतो त्या वेळी आपणापाशी द्वैतभाव असतो. तेथे ‘मी’ असतो व ‘आनंद’ असतो. ‘मला आनंद वाटतो’ हा भाव असतो. पण समाधीची याहून पुढली पायरी गाठली की आनंद नाहीसा होतो. आनंद नाहीसा होतो म्हणजे दुःख होते असे नव्हे. दुःख तर विरक्तीतच नाहीसे झालेले असते. आनंद नाहीसा होतो तिथे कुठलीच भावना शिल्लक राहत नाही. भावना शिल्लक नसली तरी भाव शिल्लक असतो. तो भाव म्हणजे मीपणाचा भाव,  अहंभाव, ‘मी आहे’ याची जाणीव. या जाणिवेलाच अस्मिता आहे असे म्हणतात. मी कुणीतरी आहे ही जाणीव या समाधीत असते, म्हणून ती सास्मिता (स + अस्मिता) समाधी होय. अस्मिता आहे म्हणजेच द्वैत आहे. द्वैत आहे म्हणूनच मी आहे. ते आहे व त्याचे मला ज्ञान होत आहे अशी घटना तेथे घडत असते. हे ज्ञान होत असते म्हणूनच ती संप्रज्ञात समाधी होय.


‘संप्रज्ञात’ याचा अर्थ संपूर्णपणे,  सर्व बाजूंनी,  प्रकर्षाने ज्ञान होणे. ज्ञान होण्याची क्रिया आहे म्हणजेच ‘ज्ञान’, ‘ज्ञेय’ व ‘ज्ञाता’ हे त्रिकुट तिथे आहे. त्यातील 'मी' हा महत्त्वाचा आहे. ‘मी आहे’ ही जाणीव मूलभूत आहे. ‘अस्मिता’ म्हणजे ‘अहंकार नसलेला अहंभाव’. ही अस्मिता असली की आनंद होतो. आनंद मिळवण्यासाठीच आपले विचार सतत कार्य करीत असतात. पण हा विचार पक्का होण्यापूर्वी आपण अनेक वितर्क करीत असतो. हे वितर्क अनेक तर्कातून आपण निवडून घेत असतो. म्हणून सामान्य माणूस तर्कामध्ये गुरफटलेला असतो. जसा जसा अभ्यास होत जाईल जाईल तसा तसा तर्कातून वितर्कात, तेथून विचारात,  मग आनंदात तो जातो. शेवटी आनंदही नाहीसा होऊन केवळ अस्मिता राहते. ही संप्रज्ञात समाधीची शेवटची अवस्था होय.

संप्रज्ञात समाधीत श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होत असते. हे ज्ञान 'मला' प्राप्त होते;  सहाजिकच 'मी'पणा तिथे आहे. म्हणूनच ती अस्मिता असलेली अशी सास्मिता समाधी होय.  ‘राजयोग’ ग्रंथात स्वामी विवेकानंद लिहितात, “ज्ञान ही शक्ती आहे. कोणत्याही वस्तूचे ज्ञान झाले की तिचे आपल्याला नियंत्रण करता येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपले मन सृष्टीतील निरनिराळ्या तत्त्वांचे ध्यान करू लागते तेव्हा त्याला त्यांचे नियंत्रण करता येते. संप्रज्ञात समाधीत प्रकृतीचे दमन करण्याचे सर्व सामर्थ्य अंगी येते.”

‘योग दिनी’ सुरू केलेले विवेचन ‘योगिनी एकादशी’ला पूर्ण होत आहे, या समाधानाच्या काठावर थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्यात १८ व्या सूत्रातील असंप्रज्ञात समाधी जाणून घेण्यासाठी.

                                               वृंदा आशय  
 

 


विराम माझ्या असण्याला !

                        विराम माझ्या असण्याला !          विराम माझ्या असण्याला !             जवळपास चार वर्षांपूर्वी आपण योगदर्शनातील सतरा...