केल्याने देशाटन
योगेन
चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन |
योSपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोSस्मि ||
योगशास्त्राने मनाचा, व्याकरण
शास्त्राने वाणीचा आणि वैद्यकशास्त्राने शरीराचा मळ नष्ट करणाऱ्या, महामुनी
पतंजलींपुढे मी नतमस्तक आहे. इसवीसनपूर्व २०० हा महामुनी पतंजलींचा कालखंड मानला
जातो. ‘योगसूत्र’, अष्टाध्यायीवरील ग्रंथ ‘महाभाष्य’ आणि ‘आयुर्वेदावरील
भाष्य’ हे त्यांचे साधनारूपी लेखन-चिंतन म्हणजे भारतीय संस्कृतीला मिळालेली मोलाची
देणगी आहे.
भारतीय दर्शनाच्या सहा दर्शनांमधील एक हे मुख्य
स्थान योगसूत्रांना मिळालेले आहे. पतंजली मुनींचं हे जीवनचिंतन इसवीसनपूर्व
काळापासून एकविसाव्या शतकापर्यंत प्रवाहीत होत आलेले आहे आणि पुढेही अखंड प्रवाहीत
होत राहणार आहे. त्यांची ही योगसूत्रे आम्हाला आजही महत्त्वाची वाटतात, आजही त्यांच्या
विवेचनाकडे आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे वाटते, याचा प्रत्यय तुम्हीच तर मला
दिलात. जगभरात देशोदेशी विखुरलेले माझे भारतीय बांधव, माझे मराठी सुहृद ज्या
पद्धतीने या ब्लॉगला वाचत आहेत, प्रतिसाद देत आहेत, तुमच्या या वाचनातून,
प्रतिसादातून त्याचं प्रत्यंतर माझ्या मनापर्यंत गेलं. भारताव्यतिरिक्त ११ देशांमधून आपण याचे वाचन करत आहात. कालातीत असणाऱ्या
आणि शाश्वत ठरलेल्या मार्गदर्शक महामुनी पतंजलींना, म्हणूनच माझ्या - तुमच्याकडून,
आपल्या सर्वांकडून साष्टांग दंडवत !
वळूयात पाचव्या योगसूत्राकडे –
वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ||५||
(पातंजल योगदर्शन, समाधिपाद,
सूत्र क्र.५)
वृत्तींचे
प्रकार आणि स्वरूप या सूत्राद्वारे मांडले गेले आहेत. महामुनी सांगतात, वृत्ती असंख्य
असल्या तरी पाच प्रकारात त्याचे वर्गीकरण करता येते. त्या पाच प्रकारांचे वर्गीकरण
देखील ‘क्लिष्ट’ व ‘अक्लिष्ट’ म्हणजेच ‘क्लेशकारक’ आणि ‘अक्लेशकारक’ अशा दोन
वर्गांमध्ये केलेले आहे.
क्लेश - दुःख हा शब्द उच्चारताच मला वाटायला
लागलं, खरोखर दुःख हेच तर शाश्वत आहे. इथे दिवसभरातून किती वेळा मन मोडत असेल, मन खट्टू होत असेल,
नाराज होत असेल त्याची गणतीच नाही. किती काय काय असतं मनामध्ये! मान मोडून काम
केले तरी मनासारखं काही होईल तर, शपथ! आणि मग असं नाही झालं तर दुःख वाटणारचना. क्लेश
वाटणारच. आमच्या साधुसंतांनी साहित्यिकांनी हेच तर सांगून ठेवलं आहे – ‘सुख पाहतां
जवापाडें | दुःख पर्वताएवढें’ हे संत तुकारामांचे सांगणे असू द्या किंवा
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे
दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’
या सारखं ग.दि.माडगूळकरांचं अजरामर गीत असू द्या. ते आम्हाला
आमच्या शाश्वत चिरंतन अशा दुःखाचीच जाणीव करून देतं ना.
इथे तर पतंजली मुनी सांगतात
क्लेशकारक आहे ते सोडलं पाहिजे. आपण सोडतो पण काय सोडतो, ज्याचा त्रास शरीराला
होतो ते सोडतो, आणि ज्याचा त्रास मनाला होतो ते मात्र धरतो. अर्थात शारीरिक कष्ट
आम्ही सोडतो आणि मानसिक कष्ट वाढवतो. नकारात्मक गोष्टींमध्ये, दुःखामध्ये त्याच
त्या आवर्तामध्ये आम्ही फिरत राहतो. मग आम्हाला आयुष्यच क्लेशकारक वाटायला लागतं. जीवन जगण्याची कला अवगत करता आली पाहिजे. मला तर वाटतं ही कला
माणसाजवळ उपजत असतेच. आपल्या सवयींनी, कामांनी पर्यायाने
स्वभावामुळे आपण तिला हरवून बसतो.
माणूस वयानं मोठा होत जातो तसतशी त्याची
संवेदनशीलता कमी व्हायला लागते. बालपण
संपुष्टात यायला लागतं. तुम्ही म्हणताल वयासोबत प्रगल्भ व्हायचे नाही का? बालीशच
राहायचं का? प्रगल्भ होणं म्हणजे असंवेदनशील होणं नव्हे. उलट कोणत्याही
संवेदनशीलतेला अधिक जबाबदारीनं दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रगल्भता. बालीशपण निराळं
आणि स्वत:मधलं बालपण जोपासणं निराळं.
‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा
केशवसुतांनी व्यक्त केलेला बाणा आणि दिलेला संदेश सर्वपरिचित आहे. अहेतूकपणे,
निरागसतेने प्रश्न विचारत हे बालमन आपल्या सभोवतीच्या जगाची ओळख करून घेत असतं. उत्स्फूर्तपणे
व्यक्त होत स्वत:च्या प्रतिक्रिया नोंदवत जातं. मोठं व्हायला लागतो तसे प्रश्न हरवायला
लागतात. मला वाटतं, प्रश्न हरवतात कारण आयुष्यासंबंधी, माणसांसंबंधी, नात्यांबाबत आपले
अनेक ग्रह तयार होतात, आपण गृहीत धरायला लागतो. न जाणताच
अनेक गोष्टींची उत्तरे मिळाल्यासारखे वागायला लागतो. आपण विचारलेल्या प्रश्नांमागेही
विशिष्ट हेतू कार्यरत झालेले असतात. मग अहेतूकता, निरागसपण कसं राहणार? प्रश्न
पडले पाहिजेत जिज्ञासेनं, त्यांचा पाठपुरावा करता आला पाहिजे सहजतेनं. आपलं बालपण
जपता आलं पाहिजे ते उत्स्फूर्तता आणि उत्कटता सांभाळून ठेवत. उत्कटता आपल्याला
आयुष्यभर साथ देते, जीवन रसरशीतपणे जगायला शिकवते.
क्लेश आणि क्लेशकारक अवस्था - व्यक्ती,
कुटुंब, समाज, देश, मानवी समाज – जग, या पातळ्यांनुसार बदलत जाते. कुटुंबाच्या
भल्यासाठी व्यक्तिहिताचा दुराग्रह आम्हाला सोडता आला पाहिजे, त्याला ‘स्वार्थत्याग’ म्हणतात. समाजाच्या भल्यासाठी कुटुंबाला कष्ट पडले तरी, ते आम्हाला सोसता आले
पाहिजेत त्याला ‘चिकाटी’ म्हणतात. देशाच्या भल्यासाठी विशिष्ट समाजाच्या भलेपणाचा अट्टहास
आम्ही सोडला पाहिजे त्याला ‘सामंजस्य’ म्हणतात. मानवी समाजाच्या, जगाच्या कल्याणासाठी देशांना पुढाकार घेता
आला पाहिजे, त्याला देशाचा स्वभाव – ‘राष्ट्रधर्म’ म्हणतात.
भारतीय संस्कृतीने, देशाला नव्हे
जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे ‘भारताचा अध्यात्मिक स्वभाव’ होय. भारताला मानवी
कल्याणाची असलेली आत्मिक ओढ त्यातूनच निपजली आहे. भारत सांगतो माणसानं ‘धर्मानं’
वागावं म्हणजे क्लेशकारक काही घडत नाही. ही सृष्टी, हे ब्रह्मांड ज्या
तत्त्वानं, ज्या नियमानं चालतं ती मूलभूत तत्त्वं म्हणजे धर्म. या नियमांशी नातं
सांगत जीवनाची घडी बसवली की ते आपोआप धर्माधिष्ठित जीवन होते.
आपल्या संस्कृतीने प्रत्येक
नात्याला, प्रत्येक भूमिकेला विशिष्ट धर्म दिलेला आहे. तो धर्म आम्ही यथास्थितपणं
सांभाळला की क्लेशकारकतेला आमच्या जीवनात प्रवेश
करण्याची अनुमती नाही. मात्र जेव्हा आम्ही आमचा धर्म सोडतो, तेव्हा आमची नाती शबल
आणि दु:खदायी व्हायला लागतात. समाजातील अनेकविध घटना पाहता लक्षात येतं, आमची नाती
कलुषित होत आहेत, शरमेनं मान खाली घालत आहेत. असं घडतं तेव्हा, आई-वडिलांचं आणि
मुलांचं, भावा-बहिणीचं, पती-पत्नीचं, नणंद-भावजयीचं, सासू-सूनेचं नातं संशयाचे प्रश्न
आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करायला लागतं. कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा
पाया आहे. जे जे क्लेशकारक आहे ते सगळं सोडून हा पाया भक्कम करावाच लागेल.
समर्थ भारत फक्त इतिहासामध्ये नसतो.
केवळ तो गौरव आठवून फुकाचा अभिमान आम्ही बाळगायचा नसतो. हा भारत अखंड आणि
सामर्थ्यशाली राहील यासाठी जाणीवपूर्वक आम्ही आमचे योगदान, वर्तमानाच्या
गरजांनुसार, कालभान राखून, प्रसंगानुरूप द्यायचं असतं. ते देता आलं पाहिजे.
त्यातूनच घडत असतं, तावून सुलाखून निघालेलं प्रत्येकाचं भारतीयत्व !
विश्वभर संचार करणाऱ्या या
भारतीयत्वाच्या चेतनेचा मला अभिमान आहे. दिक्कालावर मात करत आपल्या कर्तृत्वाच्या
प्रतिभेने जगभर संचार करा, पण भारतीयत्वाच्या सत्त्वाचा विसर पडू देऊ नका. जीवनमूल्यं
हरवली की समूळ नाश व्हायला लागतो. तेव्हा संस्कृतीचं सार घेऊन आपण पाय रोवून उभे राहा.
संत तुकारामांच्या आत्मविश्वासानं सांगा,
“आम्ही भारतवासी | आलो
याचि कारणासी |
बोलिले जे ऋषी | साच भावे वर्ताया ||"
जगभरातल्या स्वार्थी सत्तांना
ठणकावून सांगा, अन्यायकारी वृत्तींना दम देऊन सांगा, शोषक प्रवृत्तींना धारेवर
धरून सांगा; संत ज्ञानदेवांचे पसायदान ‘विश्वगीत’ करणारे आम्हीच आहोत. शांती
प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्य व्यक्त करता आलं पाहिजे. मानवी कल्याणाचे अग्रदूत
म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळता आली पाहिजे.
वृंदा आशय
अतिशय सुंदर आणि समर्पक
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteखुप छान मैडम
ReplyDeleteखुप छान व समर्पक विश्लेषण ����
ReplyDeleteअतिशय सुंदर आहे
ReplyDeleteवाह!... पुन्हा पुन्हा वाचावे असे...
ReplyDeleteउत्कृष्ट!
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteमानवी कल्याणाचे अग्रदुत..... जबाबदारी ... छान ... सुंदर ... अप्रतिम
ReplyDeleteKhoop chan
ReplyDeleteखूप छान अप्रतिम, वाचनीय
ReplyDeleteसहज सोप्या भाषेत पातंजलीकृत योगसुत्रांचं विवेचन केलंत. खरंच खूप स्तुत्य व अभिनंदनीय. असेच वेगवेगळ्या विषयांवर शब्दसेवा आपल्याकडून घडो व त्याचा लाभ जिज्ञासूंना होऊन त्यांचेही जीवन कृतार्थ होवो हीच शुभेच्छा.
ReplyDeleteगोपाळ देशपांडे