प्रकाश ज्ञानाचा ; निरास अज्ञानाचा!
नमस्कार !
मागच्या वेळेला ‘ज्ञानदीप तेवत राहो’ मध्ये ‘लोकांनी श्लोकाची भूमिका
स्वीकारावी’, अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्या अपेक्षेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात.
तेव्हा हा मांगल्याचा, ज्ञानाचा प्रकाश पसरवत अज्ञानाचा निरास करूयात. वळूयात
महर्षी पतंजलींच्या आठव्या सूत्राकडे –
विपर्ययो मिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठम्
|| ८ ||
(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.८)
‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल
योगदर्शन’ या ग्रंथामध्ये योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर या आठव्या सूत्राचा
अर्थ सांगताना विशद करतात, “एका वस्तूचे जे वास्तविक स्वरूप आहे, त्यावर त्या
वस्तूचे ज्ञान होत नसून अतद्रूप म्हणजे दुसऱ्याच वस्तुस्वरूपावर जेव्हा ती पहिली
वस्तू भासते तेव्हा होत असलेले जे मिथ्या ज्ञान तो विपर्यय होय.” (उदा. समोर पडलेली दोरी साप भासणे)
याचा सूत्रार्थ सांगताना स्वामी विवेकानंद ‘राजयोग’
मध्ये स्पष्टीकरण देतात, “एका गोष्टीला चुकीने वा भ्रांतीने दुसरीच समजणे हा आपल्या चित्तात उठणार्या वृत्तींचा दुसरा
वर्ग आहे. उदाहरणार्थ शिंपल्याला चांदीचा तुकडा समजणे.”
तर सूत्रार्थ सांगताना ओशो ‘ओशो पातंजल योग – भाग १’
यामध्ये लिहितात, “असम्यक,
मिथ्या ज्ञान म्हणजे वस्तूच्या यथार्थ स्वरूपाशी न जुळणारी फसवी धारणा.”
या सूत्राचे विवेचन करताना ‘पातंजल योग – विज्ञाननिष्ठ
निरुपण’ या ग्रंथात डॉ. प. वि. वर्तक लिहितात, “त्याच्या
रूपात स्थित नसलेले मिथ्या ज्ञान म्हणजे विपर्यय.”
हे सगळे सूत्रार्थ वाचले की लक्षात येते,
‘विपर्यय’ शब्द थोडासा अवघड वाटला तरी ‘मिथ्या ज्ञान’ हा शब्द आपल्या परिचयाचा
आहे. ‘ब्रह्म
सत्य जगन् मिथ्या’ हे आम्ही कधीनाकधी, कुठेनाकुठे वाचलेले असते, कानावर पडलेले असते. हे आठवल्याबरोबर आम्ही लगेच निष्कर्षावर येतो, ‘हं, माहिती आहे हे. पण ते काही आपल्या कामाचे नाही. तत्त्वज्ञानाची
बोजड ओझी उचलणा-यांनी त्याच्याकडे बघावे. काय ते एक ब्रह्मच सत्य आहे, आणि जग मात्र खोटे, असं काहीतरी सांगते ते. आपल्याला
आपले समोर दिसते ते खरं मानावं आणि गप्प बसावं झालं.” अशी साधारण आपली प्रतिक्रिया
असते.
आणि आपल्याही नकळत आपण विपर्यय, विपर्यास करण्यास सुरुवात केलेली असते. कारण आमचा पूर्वग्रह तिथे आपसूक कार्यरत होतो. मिथ्या शब्दाचा अर्थ फक्त ‘खोटे’ एवढाच होतो, आणि तोच अर्थ आहे, हे आम्ही १०० % खरं मानलेले असते. खरे मानलेले असते ते ऐकीव किंवा वरवरच्या माहितीवर. तपासून पाहण्याचे, शब्दाच्या मुळाशी जाण्याचे कष्ट कोणी घ्यायचे? ते अभ्यासकांनी घ्यावेत अशी आमची स्पष्ट धारणा असते. अभ्यासक कष्ट घेतातही. मात्र आपण त्यांच्यापर्यंत तरी पोहोचणे गरजेचे आहेच ना!
डॉ. प. वि. वर्तक सांगतात मिथ म्हणजे ‘खोटा’ हा
व्यवहारातला अर्थ. मिथ याचा खरा अर्थ ‘जुळून तयार झालेले’ असा आहे. कारण त्यात ‘मिथ
म्हणजे जुळणे’ हा धातू आहे. दोन गोष्टी जुळून जे तयार होते ते मिथ असते. ते जुळून
तयार झालेले असल्याने भास असतो, सत्य नसते. म्हणून मिथ म्हणजे खोटे हा अर्थ नंतर
प्राप्त झाला आहे. येथे विपर्यय मिथ्या म्हणजे जुळून तयार कसा होतो, ते पाहू. विपर्यय हा अतद्रूपप्रतिष्ठम् आहे. ‘त्याच्या रूपात स्थित न झालेले’, असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्याच्या म्हणजे कोणाच्या
रूपात ? समोर जे प्रमाण असेल त्याच्या रूपात.
आधीच्या सातव्या सूत्रात मनाच्या नेहमीच्या वृत्ती
सांगितलेल्या आहेत. समोरच्या प्रत्यक्ष वस्तूशी समरूप होणे ही पहिली वृत्ती होय.
त्या वस्तू वरून अनुमान काढणे ही दुसरी वृत्ती होय. त्या वस्तूसंबंधी आगम ज्ञानाची
उजळणी करणे ही तिसरी वृत्ती आहे. पण या तिन्ही वृत्ती सोडून मन चौथ्या वृत्ती मागे
जाते. ही चौथी वृत्ती म्हणजे समोरच्या गोष्टीचा विपर्यास करणे. प्रत्यक्ष, अनुमान
व आगम या तीनही वृत्ती एकत्रितपणे ‘प्रमाण’ या नावानं संबोधल्या असल्याने,
विपर्यास ही दुसरी वृत्ती ठरते.
आता विपर्यय किंवा मिथ्या ज्ञान या गोष्टी आपल्याला
कळाल्या. मात्र हे तद्रूपप्रतिष्ठम् आणि अतद्रूपप्रतिष्ठम् ही काय
भानगड आहे? हे
लक्षात येण्यासाठी, योगाचार्य कोल्हटकर आपल्या मदतीला येतात. साप आणि दोरीचे उदाहरण
ते विस्ताराने समजावून सांगतात. आता ‘हा साप आहे’, हे
ज्ञान ‘तद्रूपप्रतिष्ठ’
किंवा ‘अतद्रूपप्रतिष्ठ’ आहे, म्हणजे काय?
हा साप आहे, हे
ज्ञान जर खराखुरा साप पाहून झाले तर ते सापाच्या खऱ्या स्वरूपावर आधारलेले म्हणजे ‘तद्रूपप्रतिष्ठ’ (त्याच्या मूळ रूपावर स्थित होणारे)
होय. पण जर ते ज्ञान सापावर न होता साप नसलेली जी दोरी तिच्यावर भासमान होईल तर ते
‘अतद्रूपप्रतिष्ठ’ झाले. तात्पर्य एका वस्तूचा भास जेव्हा दुसऱ्या वस्तूवर होतो
आणि दुसऱ्या वस्तूचे स्वरूप यथार्थपणे जाणल्यावर जो भास मिथ्या ठरतो त्याला
विपर्यय म्हणावयाचे. दोरीच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर हा साप आहे ह्या ज्ञानाचा
निरास होतो किंवा त्या संदर्भात ते चुकीचे ज्ञान आहे, अज्ञान आहे हे कळते आणि त्याचा निरास होतो. सापाचा भास होऊन चालणारी
धावाधाव थांबते.
एखाद्या वस्तूविषयी येणारा संशय हा अतद्रूपप्रतिष्ठ असल्याने आणि त्याची
निवृत्ती होत असल्याने तोही विपर्यय होय. या मिथ्याज्ञानविपर्यायला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पाच अवस्था आहेत. कळकळीने
सांगितलं जातं तेव्हा विपर्यास घडत नाही. ‘कळकळ’ म्हणजे ज्याला कळतं, कळणं खोलवर जातं आणि हे दुसऱ्याला कळलं पाहिजे, याची ओढ लागते
त्यातून ‘कळकळ’ जन्माला येते. कळकळीनं सांगावं, पोहोचवावं. जे खरं आहे तेच पोहोचू
शकतो, हे वास्तव आहे, सत्य आहे.
दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र येऊन जे दिसते ते मिथ होय. समोरच्या वस्तूशी एकरूप होणे, तद्रूप
होणे ही नेहमीची क्रिया आहे. तशी तद्रूपता आली नाही तर विपर्यय होतो. समोरच्या
वस्तूशी जर आपले मन तद्रूप झाले नाही तर त्या वस्तूचे खरे ज्ञान होत नाही. अशा
वेळी मिथ्या ज्ञान निर्माण होते. मिथ्या ज्ञान कसे निर्माण होते? म्हणजे जुळण्याची
क्रिया इथे आहे, समोर वस्तू आहे, आपलं मन आहे, तरी तद्रूप करता आलेले नाही.
अशावेळी पूर्वग्रहामुळे आपल्या मनातील कल्पना त्या वस्तूच्या ग्रहण क्रियेमध्ये
मिसळतात. या मिसळीमुळे मिथ्या ज्ञान तयार होते. उदाहरणार्थ
दोरी समोर असताना तो साप दिसणे.
विपर्यय होण्याचे कारण, काहीतरी पूर्वग्रह असतो. या
पूर्वग्रहामुळे एक विशिष्ट समजूत आपण करून घेतो. व त्या दृष्टिकोनातून आपण बघतो.
यामुळे सत्य बाजूला सारले जाऊन, विपर्यास पदरी येतो. विपर्ययात आपल्या डोळ्यांसमोर
जे असते, त्याचे सत्यरूप आपणाला कळत नाही. जे खरे रूप आहे, त्याचे ज्ञान बाजूला
सारले जाऊन मिथ ज्ञान पुढे आणले जाते. हीच मनाची विपर्यय करण्याची वृत्ती आहे.
व्यवहारात मनुष्य नेहमीच प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करीत असतो. अहो, माणसाचे काय विचारता, ‘वाजे पाऊल आपुले; वाटे मागुनी कोण आले’ अशी त्याची संभ्रमित अवस्था. जे खरं आहे ते तसं न बघता आपल्या कल्पनांची पुटं चढवून, तो बघतो. साहजिकच सत्य ज्ञान होत नाही. सत्य म्हणजेच ब्रह्म किंवा आत्मा असल्यामुळे आपण ब्रह्म किंवा आत्मा यांचे ज्ञान करून घेऊ शकत नाही. विपर्यायाची वृत्ती नाहीशी केली, तरच आत्मज्ञान होऊ शकते. देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण जन्मावा आणि साऱ्या अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात, अज्ञानाचा निरास व्हावा, तसे हे आठवे सूत्र मला विपर्यास नाहीसे करून सत्याच्या दिशेने नेणारे वाटते. आजच्या दीप अमावास्येला विपर्यासाचा अंधार संपून सत्याचा प्रकाश पसरावा एवढीच प्रार्थना !
वृंदा आशय
अतिशय क्लिष्ट विषय सुंदर रीतीने सोपा करून सांगितला आहे....👍👍
ReplyDeleteमिथ चा नवीन अर्थ कळला.
ReplyDeleteVery well explained
ReplyDeleteविपर्यासाचा अंधार संपून सत्याचा प्रकाश पसरावा ... छान !
ReplyDeleteछान विवेचन
ReplyDeleteब्रम्हा पासुन माया निर्माण झाली. पंचभुतात्मक वस्तु वर मायेचे आवरण असल्यामुळे जीवाला त्याचे खरे स्वरुप जाणवत नाही. ब्रम्हांडातील सर्व पसारा हे ब्रम्हाचेच रुप आहे.
ReplyDeleteखूप गहाण विचार
ReplyDeleteसुंदर लेखन
ReplyDeleteसुंदर विवचन
ReplyDelete