Thursday, 19 August 2021

महात्म्य नामस्मरणाचे !

 

महात्म्य नामस्मरणाचे !

नमस्कार ! यावेळच्या इथल्या भेटीला जरा विलंब झाला. मात्र भेटीत खंड नव्हता याचा आनंद आहे. श्रीअरविंद केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण भेटी सुरु होत्या. पातंजल योगाकडून पूर्णयोगाकडे घेऊन जाणारा तो प्रवास निश्चितच मनमोहक, आनंददायी, समाधानकारक आणि प्रगतिपथावर नेणारा आहे. तूर्त वळूयात महर्षी पतंजलींच्या नवव्या सूत्राकडे.

शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प: ||९||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ९)

सातव्या आणि आठव्या सूत्रात ‘प्रमाण’ आणि ‘विपर्यय’ या वृत्तींचा आपण परिचय करून घेतला. नवव्या सूत्रात ‘विकल्प’ या वृत्तीचे प्रतिपादन केलेले आहे. काही वेळा समोर कुठचीच वस्तू नसते तरी माझे मन ऐकलेल्या गोष्टींशी सरूपता साधते. ही तिसरी वृत्ती म्हणजे विकल्प होय.

 हा सूत्रार्थ स्पष्ट करताना योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये लिहितात ‘शब्दापासून उत्पन्न झालेले जे ज्ञान ते शब्दज्ञान. शब्दज्ञानाच्या मागोमाग उत्पन्न होण्याचा ज्याचा स्वभाव आहे, पण जो वस्तुशून्य आहे, म्हणजे ज्याला आधाराला तशा प्रकारची वस्तूच नसते अशा स्वरूपाचा जो बोध तो विकल्प होय.’

तर ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद सूत्रार्थ स्पष्ट करतात – ‘शब्द आहे पण त्याने सूचित होणारी वस्तू मात्र अस्तित्वात नाही, अशा शब्दाने होणाऱ्या ज्ञानाला विकल्प किंवा शब्दजन्य भ्रांती म्हणतात. हा विकल्प वस्तूविकल्प, क्रियाविकल्प आणि अभावविकल्प अशा तीन प्रकारचा असतो.’

तर डॉ. प.वि.वर्तक, ‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथात अगदी सोप्या पद्धतीने सांगतात, ‘वस्तू नसतानाही शब्दाच्या ज्ञानामागोमाग येतो तो विकल्प होय.’

अधिक स्पष्ट करताना ते लिहितात, आता हे योगशास्त्रावरील निरूपण वाचत असताना ‘वस्तू’ हा शब्द आपण वाचला. या शब्दाबरोबर आपणासमोर कुठलीतरी वस्तू उभी राहील व त्या वस्तूवरच तुमचे मन जाईल. एखादी वस्तू सापडत नसेल तर ते आठवेल व ती वस्तू कुठे असेल याचा विचार तुम्ही करू लागाल. समोर योगशास्त्र असूनही तुमचे मन त्या वस्तूमागे भरकटत जाईल. हाच विकल्प होय.

वर्गात अध्यापक शिकवत असतात त्याच वेळी नेमका एखादा कावळा ओरडतो. कावळ्याचा शब्द ऐकला की मन कावळ्यामागे जाते. कावळ्यावरच विचार चालू होतो व अध्यापकांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हा विकल्प झाला. समोर कावळा नाही तरी त्याच्या शब्दाच्या ज्ञानामागोमाग मन धावत गेले. ही तिसरी वृत्ती झाली.

समोर वस्तू असेल तर मन त्यावर विचार करते. ही मनाची वृत्ती आहे. त्याच चार वृत्ती म्हणून सहाव्या सूत्रात सांगितलेल्या आहेत. पण मनाच्या धावण्याला समोर वस्तू पाहिजेच असे नाही. वस्तू नसेल तरी मन धावत सुटते, याला विकल्प म्हणतात. विशेष रीतीने कल्पना करणे म्हणजे विकल्प. विकृत कल्पना करणे म्हणजेही विकल्प होईल. आता आली का पंचाईत? शास्त्र आपल्याला गोंधळात टाकतं, ते असं. आता विकल्प म्हणजे नक्की काय समजायचे?

 ‘विकल्प’ या शब्दापासून ‘वैकल्पिक’ असा शब्द आपण वापरतो. वैकल्पिक या संकल्पनेनुसार, ‘आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे दिलेल्या सर्व गोष्टींमधून  काही गोष्टी निवडायच्या असतात. उदा. महाविद्यालयात कंपलसरी विषयांबरोबरच तीन ऑपश्नल म्हणजेच वैकल्पिक विषय निवडायचे असतात. त्यात १० विषयातून ०३ विषय निवडता येतात. इथे निवड करताना इच्छा, उपयुक्तता, भावी संधी, निवड करण्याची व केल्यानंतर होणारे परिणाम स्वीकारण्याची जबाबदारी, आदी बाबी आपसूकच गृहीत असतात. आयुष्यात कोणताही आणि कधीही वैकल्पिक पर्याय निवडताना या सर्वच बाबी गृहीत असतात. आता इथेही विकल्प म्हणजे आपण ‘विशेष कल्पना करायची’ की ‘विकृत कल्पना करायची’ याची निवड वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला करता आली पाहिजे.

विकल्प याचा अर्थ, विरुद्ध विचार येणे असाही आहे. शब्दावरूनच तोही विचार येतो. अध्यात्माचा विचार चालू असताना अध्यात्म विरोधी विचार मनात येतात हे विकल्प होत. विकल्प ही मनाची वृत्ती आहे ती नष्ट होणे शक्य नाही, म्हणून ती काबूत आणली पाहिजे. त्यासाठी नामस्मरण सांगितले आहे. देवाचे नामस्मरण सतत केले तर विकल्प वृत्तीमुळे शब्दामागोमाग, देवाच्या नामामागोमाग आपले मन देवाकडे धावत जाईल व देव दिसेल. वाईट गोष्टीकडे मन जाण्यापेक्षा देवाकडे गेलेले फार चांगले. कारण त्यामुळे आपल्या हातून चांगली कर्मे होतात निदान वाईट कर्मे होत नाहीत. सत्य, शिव, ब्रह्म ही नामे मनात ठेवली तर मन विकल्पाने तिकडे धावेल व त्याच्याशी एकरूप होईल. म्हणजेच योग साधेल, जो विकल्प आपल्या मनास देवाकडे किंवा शिवाकडे किंवा ब्रह्माकडे घेऊन जाईल तो अक्लेश्कारक / अक्लिष्ट विकल्प आहे पण शेख महंमदी मात्र क्लेशकारक / क्लिष्ट विकल्प आहे. कारण शेख महंमद क्लेशकारक आहे तर ईश्वरचिंतन सुखकारक आहे.

या काळात ईश्वरचिंतन आणि नामस्मरण केले पाहिजे का? कशासाठी? कारण आम्ही तर बुद्धिवादी विज्ञान, तंत्रज्ञानाचे उपासक, सृष्टीचेही विजयकर्ते ! मानवी जीवनाची अस्मिता व्यक्त करणारा हा अभिमान कदाचित शोभणारा असेलही. मात्र त्याचे कळत-नकळत अहंकारात होणारे परिवर्तन हेच ठरते पतनाचे कारण, आणि या कलियुगात तर हे हमखासच घडते.    

कलियुग कसे असेल आणि या युगात कसे वागावे याबाबतची कथा आपल्याला काय सांगते, त्याचे निष्कर्ष आपल्याला काय सांगतात हे बघणे उद्बोधक होईल.कोकिळा, ससा, विहिरी, शिळा, रोपटे अशा विविध रूपकांच्या माध्यमातून ही कथा सांगते-   

‘कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील,कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील पण ते आपल्या धनातील  एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत,कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल,कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण

करील, त्यांचा उद्धार होईल.’ हा उद्धार होण्यासाठी आपण किती आंतरिक सजगतेने वागतो हे मात्र महत्त्वाचे ठरणार आहे.

आपला आध्यात्मिक गुरू निवडताना डोळसपणे, विचारपूर्वक निवड केली तर शोषणाचा प्रश्न उद्भवणार नाही. उपकाराची भावना न बाळगता आपण आपल्यापरीने गरीबांना मदत केली तर विषमतेचे प्रश्न समाजाला छळणार नाहीत. आपण आपल्या मुलांवर, पालकांवर, नातेवाईकांवर इतर कोणावरही किंबहुना सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, पण आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही, याबाबत दक्ष राहिलं पाहिजे.अनुकूल – प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत आपले चारित्र्य आपण प्राणपणाने जपले पाहिजे. आपला तिरंगाही हाच संदेश देतो, ‘सावधान चौबिसो घंटे, अरे चक्र के है कहते!’ ही देशभक्ती आणि देवभक्ती साधली तर जगाचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी जगाला भक्कम आधार देणारे ईशचिंतन आणि नामस्मरण हाच सहज-सोपा मार्ग आहे.

वृंदा आशय

 

 

  

8 comments:

  1. खूप छान आणि सोप्या शब्दात सांगितलं. धन्यवाद

    ReplyDelete
  2. Khupch sunder n samarpak bolta tumhi ma'am.
    Hardik abhinandan

    ReplyDelete
  3. खूप छान����

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  5. कलीयुगात नामसाधना किती श्रेष्ठ हे वरील विवेचनावरून समजते. सर्व संत हेच सांगतात.

    ReplyDelete
  6. सर्व वयोगटातील लोकांनी वाचावे इतके उपयुक्त लिखाण 👌👌

    ReplyDelete
  7. ऑडियो फारच आणि उत्कृष्ट .

    ReplyDelete

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...