Sunday, 22 August 2021

अभावातली संपन्नता !

 

अभावातली संपन्नता !

नमस्कार! आज राखी पौर्णिमा. आपल्या सगळ्यांना या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा! मला अगदी स्वाभाविकपणे शाळेतली प्रतिज्ञा आठवते आहे. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’. पण खरं सांगू का, या तंत्रज्ञानाने ही प्रतिज्ञा आता व्यापक केली आहे. “जग माझं घर आहे. सारे जगत् निवासी माझे बांधव आहेत.” इथे बसल्या बसल्या जगातल्या सार्‍या माणसांची भेट होऊ शकते. काय हवं अजून आपल्याला? आणि म्हणून या जगातल्या प्रत्येक निवासीला या राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! ज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र आलं तर काय चमत्कार होऊ शकतो, याचा प्रत्यय घेतल्यासारखं वाटतं आहे मला. नाहीतर एरवी, ‘तंत्रज्ञान आपल्या आयुष्यावर स्वार होतंय, म्हणून मीही तक्रारच करायचे’

अगदी परवाच आपली भेट झाली आणि आज लगेच भेटतोय. तर मला वाटलं, मला स्वप्न पडते आहे की काय? पण नंतर लक्षात आलं की, आपल्या नियमित भेटीचा दिवस रविवारच आहे. मागच्या भेटीला जरा विलंब झाला होता. गप्पा मारता मारता आता मन भरकटायला लागले बरं. महर्षी पतंजली रागावतील. महर्षींच्या दहाव्या सूत्राकडे वळूयात -

अभावप्रत्ययालम्बना वृत्तिर्निद्रा || १० ||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. १०)

याचा सूत्रार्थ स्पष्ट करताना योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये लिहितात पदार्थ मात्राच्या अभावाचा जो प्रत्यय म्हणजे अनुभव तो ज्या वृत्तीला आलंबन म्हणजे आधार असतो ती वृत्ती निद्रा होय.

‘राजयोग’ या ग्रंथात स्वामी विवेकानंद लिहितात- ‘शून्यत्वबोध हा ज्या वृत्तीचा आधार वा विषय असतो तिला निद्रा म्हणतात’.

डॉक्टर प. वि. वर्तक ‘पातंजल योगदर्शन : विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथाद्वारे प्रतिपादन करतात -  ‘अभावाच्या प्रत्ययावर अधिष्ठित असलेली वृत्ती म्हणजे निद्रा.’

निद्रा म्हणजे झोप. झोप हा आपल्या सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. झोपेचे किती प्रकार ! रात्री हवी असते पण लागता लागत नाही, ती ‘खट्याळ झोप’. मध्यरात्री अगदी नकळत लागते ती ‘गाढ झोप’. पहाटे पहाटे उठायचं असतं पण उठवत नाही, आणि गोड स्वप्नांमध्ये रममाण होतो ती ‘साखर झोप’. झोपेबद्दल अनेक प्रकारचे भाव आमच्या मनामध्ये आहेत. आणि इतकी भावात्मकता  तिच्यामध्ये असताना ती अभावावर आधारलेली आहे म्हणजे काय?

अहो, आम्हीच काय आमचे देवसुद्धा झोपतात. काकड आरती, शेज आरती, देवशयनी एकादशी, कोजागिरी पौर्णिमा हे सर्व देवांच्या झोपण्या-उठण्याचे संकेत आहेत. इथे देवाला सुद्धा आम्ही आराम करायला लावतो, त्या झोपेवर आमचं किती प्रेम असेल. आणि त्या झोपेबद्दल आमचा भाव किती समृद्ध असेल बरं! मग योगशास्त्रातील ही अभावाची भानगड काय?

योगाचार्य कोल्हटकर म्हणतात, निद्रावस्थेत रजोगुणापासून निर्माण झालेल्या कर्मेंद्रियांची क्रियाशीलता आणि सत्त्वगुणापासून  निर्माण झालेल्या ज्ञानेंद्रियांची प्रकाशशीलता या दोन्हींमध्ये शिथिलता निर्माण झालेली असते. अशा वेळी आपल्या शरीरात केवळ स्थितीशीलता राहिलेली असते. या स्थितिशीलतेमध्ये कोणत्याही बाह्य स्थूल विषयांचे किंवा आंतरसूक्ष्म विषयांचे स्फुरण चित्तामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व वस्तूंच्या अभावाच्या अनुभवाचेच केवळ स्फुरण चित्तामध्ये होत असते. या अनुभवालाच या सूत्रात सर्व वस्तूंच्या अभावाचा प्रत्यय असे म्हणलेले आहे. इतर कोणत्याही वस्तूचे भान यावेळी होत नाही एवढेच एक भान चित्तात उरलेले असते . हीच या सूत्रात सांगितलेली अभावप्रत्ययालंबना वृत्ती होय.

डॉ. प. वि. वर्तक हे  स्पष्ट करताना सांगतात, अभाव म्हणजे काहीही नसण्याची स्थिती. भू म्हणजे असणे. त्यापासून भाव म्हणजे ‘असण्याची स्थिती’ असा शब्द निघाला व त्याला नकारात्मक ‘अ’ हा उपसर्ग लावून शब्द केला ‘अभाव’ म्हणजे नसण्याची स्थिती. येथे पूर्ण अभाव न धरता कमतरता किंवा तौलनिक अभाव जर घेतला तर नीट उलगडा होतो. प्रत्यय म्हणजे ज्ञान होणे. प्रत्यय या शब्दाची फोड प्रति + अय अशी आहे. ‘प्रति’ म्हणजे आमच्याकडे, ‘अय’ म्हणजे जाणे. एखाद्याकडे जाणे म्हणजे आपली इंद्रिये एखाद्या गोष्टीकडे जाणे, म्हणजेच ज्ञान होणे. या गोष्टीचा प्रत्यय मला मिळाला असे आपण म्हणतो, त्याचा अर्थ तो ‘अनुभव’ आला म्हणजेच ज्ञान झाले. पंचज्ञानेंद्रियांकडून ज्ञानरूपी संदेश येतात, त्यालाच प्रत्यय येणे असे म्हणतात. आतापर्यंत ज्या वृत्ती सांगितल्या आहेत त्या कुठल्यातरी प्रत्ययावर अवलंबून असतात. प्रत्यक्ष, अनुमान किंवा आगम ही ‘प्रमाणे’ प्रत्यय देणारी असतील अथवा समोरच्या वस्तूचे चुकीचे ज्ञान ‘विपर्यय’ तेथे असेल किंवा नुसताच शब्दानुपाती ‘विकल्प’ असेल. काहीतरी प्रत्यय देणारे तेथे असते. पण प्रत्यय देणारे काहीच नसेल तर अभाव झाला. अशा स्थितीत वृत्ती असते का? ‘होय’ असेच त्याचे उत्तर आहे. या वृत्तीला ‘निद्रा’ असे म्हणतात. ज्यावेळी प्रत्यय देणारे काहीच नसेल तेव्हा म्हणजे अभावाचा प्रत्यय असेल तेव्हा झोप येऊ लागते यालाच निद्रा असे म्हणतात.

आपल्या पंचज्ञानेंद्रियांना कुठलाही विषय समोर नसतो, त्यावेळी आपणास झोप येऊ लागते. मनाला कुठलेही काम नसते, त्यावेळी झोप येऊ लागते. म्हणजे प्रत्येकाच्या अभावाने निद्रा येते. प्रत्यक्ष प्रमाण नसते, आपण अनुमान करत नसतो, आपण आगम स्वीकारत नसतो, चुकीचे अर्थ काढत पर्यायात गुरफटलेले नसतो व विकल्पही करत नसतो त्या वेळी आपण झोपतो. म्हणून मनाची ही वृत्ती निद्रा आहे. मन हे चंचल असते त्यामुळे वृत्ती सारख्या बदलतात. प्रत्यक्ष प्रमाण समोर असताना आपण अनुमान करतो किंवा विपर्यय करतो किंवा विकल्पही मनात येतो. त्याचप्रमाणे या पाच वृत्ती आलटून पालटून चालू असताना सहावी निद्रा सुद्धा येऊ शकते. म्हणूनच तिला वृत्ती म्हणलं आहे. साधारणतः पहिल्या पाचांचा अभाव म्हणजे निद्रा होय. या सर्व वृत्ती आपण याआधीच्या एकेका सूत्रात सविस्तर समजावून घेतलेल्या आहेतच.

     निर्माण होणारा हा अभाव प्रमाण नसल्यामुळे निर्माण होईल, किंवा इंद्रियांच्या थकव्यामुळे निर्माण होईल. कसाही असला तरी हा भाव निद्रेचा कारक आहे हे निश्चित. निद्रा हीसुद्धा मनाची एक वृत्तीच आहे हा फार  मोठा सिद्धांत महर्षी पतंजलींनी मांडलेला आहे. इतर दर्शनकार निद्रेला वृत्ती मानत नाहीत ती सुषुप्ति अवस्था आहे असं ते म्हणतात.

     तमोगुणप्रधान वाटणा-या निद्रेचे स्वरूप योगनिद्रा मात्र पार बदलून टाकते. ३० मिनिटांच्या योगनिद्रेत चार तासांचा आराम देण्याची क्षमता आहे. चित्तावर विशिष्ट संस्कार ठसवण्यासाठी योगनिद्रा प्रभावी ठरते. सातत्याने केलेल्या योगनिद्रेचा अभ्यास झोपेलाही सजग ध्यानाचे रूप देऊ शकतो. ही फार पुढची अवस्था आहे. राग-लोभाला थारा न देता आपण किमान स्वस्थ व शांत मनाने झोपण्याची सवय स्वत:ला लावू शकलो, सद्विचारांनी निद्रेच्या अधीन होऊ शकलो तरी पुष्कळच काही साध्य केल्यासारखे आहे. पुरेशी आणि व्यवस्थित झोप ही संतुलित व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक आहे. अर्थातच व्यक्तीनुसार, तिच्या जीवनशैलीनुसार आवश्यक झोपेचा कालावधी कमी – अधिक होऊ शकतो. असो.

योगसूत्रे अशी आहेत की निद्रा हा विषय मांडतात आणि जीवनाला एक नवी जाग आणतात. ज्ञानाची पौर्णिमा अशीच होत असते.

वृंदा आशय

4 comments:

  1. शब्दांच्या पलीकडले!

    ReplyDelete
  2. योगनिद्रा, कोल्हटकर आणि वर्तक यांचे संदर्भ, संवादात्मक भाषा, निद्रेची आवश्यकता आणि त्यामागील शास्त्रीयदृष्ट्या उलगडलेलं विज्ञान इत्यादी वरील ब्लॉगची वैशिष्टये जाणवतात. 👌🏻👏🏻

    ReplyDelete
  3. Yognidrevar khoop Chan vivechan

    ReplyDelete

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...