मनोवृत्ती
नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली. आपल्या सर्वांच्या स्फूर्तिदायी आणि आशीर्वचन देणार्या प्रतिक्रिया मला गुरूंप्रमाणेच मार्गदर्शक आहेत. विविध माध्यमातून पोहोचलेल्या प्रतिक्रियांचा विनम्रतेने स्वीकार करून, मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना नमन करते. ‘जनी जनार्दन’ या संतोक्तीचे स्मरण करते. जनार्दन दाखवणा-या गुरुंना मनोभावे वंदन करते!
गुरुपौर्णिमेला ‘अनुभवाचं चांदणं’ पसरलं. आणि पुन्हा एकदा मी अनुभवला गुरुकृपेचा वर्षाव ! आशीष देणाऱ्या, सुखद वाटणाऱ्या, तृप्त करणार्या या वर्षावाने आपसूकच माझ्या वाटचालीवर ज्ञानाचा आल्हाददायक प्रकाश पसरला आहे. योगसूत्रांच्या विवेचनात माझ्याकडून ज्या गोष्टी सुटतात, ओघात राहून जातात, क्वचित विशिष्ट प्रवाहात वाहून जातात - त्यांचे प्रेमळ स्मरण गुरुंनी करून दिले आहे. या मार्गदर्शक प्रकाशात योगसूत्र विवेचनाच्या या शब्दशक्तीला सुयोग्य, डोळस अर्थभक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
“योगशास्त्र विशाल आणि गहन आहे. त्याच्या अभ्यासात सातत्य राखावं, अभ्यासाची खोली वाढवावी. योगसूत्रांची वैश्विकता योगशास्त्राची तेजस्विता आहे. त्यांचा मूळ गाभा जपण्यासाठी साहित्य पुनरावलोकनाने सूत्रांचे विवेकपूर्ण विश्लेषण व्हावे. चिकित्सक निरूपण घडावे.” गुरुंनी या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तेव्हा, ‘गुरुते वाट पुसतु’ वळुयात महर्षी पतंजलींच्या सहाव्या सूत्राकडे.
“प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतय:” ||६||
(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.६)
सूत्रार्थ – प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या त्या पाच वृत्ती होत.
‘या त्या पाच वृत्ती होत’, म्हणजे काय हे समजावून घेताना पुन्हा एकदा थोडं,
पाचव्या सूत्राकडे वळावं लागेल. वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ||
या पाचव्या सूत्राचे विवेचन करताना ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये ग्रंथकार ‘योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर’ नोंदवतात, “....वृत्तीचे प्रकार आणि स्वरूप सांगण्याकरता हे सूत्र प्रवृत्त झाले आहे. या सूत्रात वृत्ती क्लिष्ट आणि अक्लिष्ट असल्याचे सांगितले आहे. आत्मसाक्षात्कार होईपर्यंतच्या वृत्ती क्लिष्ट म्हणजे क्लेशांनी युक्त असतात आणि आत्मसाक्षात्कार झालेल्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी वृत्ती क्लेशरहित असल्यामुळे त्या अक्लिष्ट होत. अक्लिष्ट वृत्तींचा निरोध निष्प्रयोजन असून क्लिष्ट वृत्तींचा निरोध सप्रयोजन म्हणून अवश्य करणीय आहे, हे सूचित केले आहे. आता या पाच वृत्ती कोणत्या हे पुढील (म्हणजे सहाव्या) सूत्रात सांगितले आहे. सहाव्या सूत्राचा सूत्रार्थ ते देतात – ‘प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या त्या पाच वृत्ती होत.’ म्हणजे त्यांच्या एकूण विवेचनानुसार, ‘आत्मसाक्षात्कार होईपर्यंतच्या वाटेवर या पाच वृत्ती क्लेशयुक्त ठरतात आणि त्यांचा निरोध जाणीवपूर्वक झाला पाहिजे.’
महर्षी पतंजलींची योगसूत्रे स्पष्ट करून सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये सहाव्या सूत्राचा अर्थ व्यक्त करताना नोंदवलेलं आहे, या पाच वृत्ती पुढील प्रमाणे आहेत - सत्य ज्ञान (प्रमाण), भ्रम (विपर्यय), शब्दजन्य भ्रम (विकल्प), निद्रा आणि स्मृती. इथे वृत्तींसाठी वापरलेले पर्यायी शब्द आपल्याला परिचित वाटतात. त्यामुळे ते अर्थाच्या अधिक जवळ नेतात. योगसूत्राला नेमकं काय म्हणायचं आहे, ते उलगडायला लागतं. पुढील सूत्रांमध्ये एकेका वृत्तीचे स्पष्टीकरण येणारच आहे, तेव्हा त्याच्या तपशीलात त्यावेळी जाऊ.
या सूत्रावर भाष्य करताना, स्वामी माधवनाथ म्हणतात, “मनात जेवढ्या वृत्ती उठतात त्यांची पाच प्रकारात वर्गवारी केलेली आहे. ते पाच प्रकार म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. अक्लिष्ट किंवा अक्लेशकारक वृत्तींचा ध्यानात किंवा इतर जीवनातही अडथळा येत नाही. क्रोध, काम, अहंकार, मत्सर आदी क्लेशकारक वृत्ती आहेत. कामक्रोधादी वृत्ती निर्माण होणारच पण त्यांना संयमित ठेवता आलं पाहिजे. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी या वृत्ती क्लेशमूलक नसतात. अज्ञान्याच्या ठिकाणी याच वृत्ती प्रमाणापेक्षा अधिक होऊन क्लेशकारक होतात.”
व्यावहारिक जीवनाचा विचार करताना आपण अज्ञानी माणूस म्हणण्यापेक्षा सामान्य माणूस म्हणूयात. सामान्य माणसाच्या ठिकाणी क्लेश, वेदना, दु:ख निर्माण होण्याची अनंत कारणे असतात. सौमित्र यांनी मात्र आपल्या गीतात या सगळ्या कारणांमागचे एक कारण चपखलपणे व्यक्त केलेले आहे.
‘माझिया मना जरा थांब ना.....तुझे धावणे अन् मला वेदना’
योगशास्त्र देखील हेच सांगते. म्हणून तर योगसूत्र सुरुवातीपासून चित्तवृत्तींचा निरोध सांगते, त्यांचे स्वैर धावणे बंद करायला सांगते. मनावरचे स्वामित्व म्हणजे योग. पातंजल सूत्रांवर भाष्य करताना ओशो सांगतात, “पतंजलींची सूत्र मनाची, त्याच्या वृत्तीची, त्याच्या नियंत्रणाची त्याच्या वापराची हळूहळू ओळख करून देतात. योगाच्या सर्व पद्धती, सर्व तंत्र, सर्व वाटा मनाला कसं वापरायचं या एकाच समस्येशी खोलवर निगडीत आहेत. योग्य रीतीने वापरलं तर मन अ-मन होतं. चुकीच्या पद्धतीने वापरलं तर मनात अराजकता, गोंधळ निर्माण होतो..... मनाच्या वृत्ती पाच आहेत त्या एक तर दुःखाचं मूळ कारण बनतात किंवा दुःखरहिततेचं कारण बनतात.”
सुख-दु:खावर प्रेम करत जगणारी आपण माणसं, दैनंदिन जीवनामध्ये दु:खरहिततेचा वगैरे विचारही करू शकत नाहीत. मनोवृत्तींच्या आवृत्ती काढत, हसत – खेळत – रडत – कुढत – नावं ठेवत – कौतुक करत – क्वचित कोणावर जळत आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर कधीतरी उजळत आपला जीवनप्रवास चालू असतो. हे उजळणं जरा लवकर घडलं तर आयुष्य शांत – समृद्ध होतं, नाही तर गर्तेतच फिरत राहतं. प्रवाही व्ह्यायचं की भोव-यासारखं गरगरत राहायचं हे आपल्या वृत्तीच ठरवतात. संत तुकारामांचे सूत्र त्यासाठी लक्षात घ्यावे लागते.
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥
क्लेश वाढवायचे की कमी करायचे, आपल्या हातात असते. हळूहळू का होईना क्लेश कमी होत जातील अशा पद्धतीने वृत्तींचा विकास करावा. नियोजन, स्वार्थरहितता, कार्यातील परिपूर्णता आपल्याला निष्कामतेकडे नेतात. मात्र आपल्या सकाम वृत्ती अपेक्षा आणि अपेक्षाभंगातून निर्माण होणा-या दु:खचक्रात आपल्याला अडकवत राहतात.
आपण बऱ्याच वेळेला इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहतो आणि मनासारखी प्रतिक्रिया मिळाली नाही की दुःखी होतो. इतरांनी छान म्हणण्यात खरंच काय दडलेलं आहे?
छान - छान काय असतं?, अपूर्णत्वाचं भान असतं
कामातली एकरूपता टाकून, बाहेर आलेलं ‘मी पण’ असतं
मी तदाकार झाला तर, सारं स्वत:लाच सुंदर दिसतं
तसं घडत नाही तेव्हा, शाश्वताशी तेवढं अंतर असतं .
हे अंतर जितके कमी करू तितके क्लेश कमी होतात.
वृंदा आशय