पहाटेचे पाच वाजलेले. रस्त्यावरचे लाईट गेलेले. एक दोन घरांचे दिवे सुरू होते. रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात त्यांचा प्रकाश चमकत होता. बाकी सारे चराचर स्थिर आणि नि:स्तब्ध ! आकाशामध्ये असलेली चांदणी सुद्धा लुकलुकत नव्हती. अंधार दाटलेला. अशावेळी श्री. रवींद्रनाथ टागोर यांची कविता आठवली.
विपत्तिमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही.
विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये
इतकीच माझी इच्छा!......
सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा ;
दु:खाच्या रात्री सगळे जग
जेव्हा माझी फसवणूक करेल
तेव्हा तुझ्याविषयी
माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये
इतकीच माझी इच्छा!
काळ्याकुट्ट अंधारातही माझा तुझ्यावरचा विश्वास यत्किंचितही कमी होऊ नये. सगळ्यांनी माझी साथ सोडली तरी तुझ्यावरची माझी श्रद्धा अढळ राहावी, परमेश्वराला केलेली ही प्रार्थना माणसाला संतुलित सामर्थ्य प्रदान करते.
कदाचित संतुलित सामर्थ्याची हीच अपेक्षा व्यक्त करते, महर्षी
पतंजलींचे १६ वे योगसूत्र.
तत्परं
पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ||१६||
(सूत्र क्र. १६, समाधिपाद, पातंजल योगदर्शन)
योगग्रंथांच्या आधारेच आजचे हे सूत्र समजावून घेऊयात. ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये ‘योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर’ सूत्रार्थ स्पष्ट करताना लिहितात, “चित्ताहून पुरुष वेगळा आहे, असा विवेक उत्पन्न होणे ही पुरुषख्याती होय. अशा प्रकारची पुरुषख्याती झाल्यामुळे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांविषयी जे वैतृष्ण्य उत्पन्न होते ते परवैराग्य होय.”
बाराव्या सूत्रांत, अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने चित्तवृत्ती निरोध होतो असे सांगितले. तेरा आणि चौदा या दोन सूत्रात अभ्यासाचे स्वरूप सांगितले. पंधराव्या सूत्रात वशिकार-संज्ञक वैराग्याचे स्वरूप सांगितले. आता असंप्रज्ञात समाधीद्वारा पुरुषख्याती म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यावर जे फलरूप वैराग्य उत्पन्न होते, त्याचे स्वरूप या सोळाव्या सूत्रात सांगितले आहे.
स्वामी आनंदऋषी, ‘पातंजल योगदर्शन – एक अभ्यास’ या ग्रंथात सोळाव्या सूत्राचे स्पष्टीकरण देताना लिहितात,
“अंतिम वैराग्य म्हणजे ‘पुरुषा’च्या ज्ञानामुळे विकसणारे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांबाबतचे वैराग्य, म्हणजेच गुणवैतृष्ण्य होय. सत्त्व, रज व तम हे तीनही गुण जीवात्म्याला भोगाकडे नेतात. याला भोगार्थता म्हणतात. तम-रज शांत झाले म्हणजे व सत्त्वगुण विकसित झाला, म्हणजे तो सत्त्वगुण जीवात्म्याला, साधकाला कैवल्याच्या दिशेने नेतो. याला अपवर्गार्थता म्हणतात. जीवात्म्याची किंवा चित्ताची भोगार्थता संपून अपवर्गार्थतेची सुरुवात होणे, म्हणजे चित्तवृत्तीनिरोधाची सुरुवात. ही अपवर्गार्थता जेव्हा संपुष्टात येते, तेव्हा त्या अवस्थेला असंप्रज्ञात समाधी म्हणतात.
योगाचार्य कोल्हटकर सांगतात, योग्याचे चित्त असंप्रज्ञात समाधीत वृत्तिशून्य आणि संस्कारशेष अशा भावास प्राप्त झालेले असते. समाधीत ‘तदा द्रष्टु: स्वरूपेSवस्थानम्’ असते. यामुळे आत्मसाक्षात्कार हा येथेच होतो. तरीपण यावेळी चित्त निर्वृत्तिक असल्याने आत्मसाक्षात्काराचा वृत्ती रूपाने परामर्श या अवस्थेत शक्यच नसतो. या असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे प्रारब्धवशात व्युत्थान झाले म्हणजे या अवस्थेचा वृत्तीरूप परामर्श चित्तावर आरूढ होतो. गाढ झोपेत, झोपेतील अनुभवाची वृत्तीरूपाने जाणीव नसते. परंतु उठल्यावर ‘सुखमहमस्वाप्सम’ म्हणजे, मी सुखाने झोपलो असा निद्राकालीन अनुभवाचा स्मृतिरूप परामर्श चित्तात वृत्तीरूपाने उदित होतो. असाच प्रकार असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे उत्थान झाले म्हणजे घडून येतो. म्हणजे असंप्रज्ञात समाधीत जो आत्मसाक्षात्कार घडत असतो, त्याचा परामर्श व्युत्थानदशेत वृत्तिरूपाने होऊ लागतो. मी असंग आहे, सत्य-ज्ञानानंदरूप आहे इत्यादी वृत्तींनी हा परामर्श व्यक्त केला जातो.
‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’, या ग्रंथात डॉ.प.वि.वर्तक लिहितात,‘पुरुष’ म्हणजे परमात्मा. पुरुष या शब्दाची फोड ‘पुरे शेते इति’ - शरीरात झोपलेला तो पुरुष अशी सर्व तज्ञ करतात. पण परमात्मा शरीरात झोपत नाही. तो जागाच असतो. आपण झोपलो तरी आपलं पचन, श्वसन, रक्ताभिसरण, चालू असतं. पंचप्राणांच्या क्रिया चालू असतात. आपली वाढ होत असते. शरीरशास्त्राच्या दृष्टीने परमात्मा झोपत नाही, हे नक्की.
त्यांनी स्वत: पुरुष या शब्दाची फोड, ‘पुरं उषति इती’, अशी केलेली आहे. जो कोणी शरीराचा व्यवहार चालवतो, तो पुरुष. ‘उष्’ या धातूचा अर्थ जीवन कंठणे, जाळणे, पीडणे असा आहे. आपलं शरीर खरोखरच जळत असतं. ऑक्सिजनशी सतत संयोग सुरू असल्यामुळे शरीरात उष्णता असते. आपल्याला या शरीरातच भोग भोगावे लागतात व पीडा सहन कराव्या लागतात. या पीडा देणारा आत्मा शरीरातच वसलेला असतो. आपले सर्व जीवन व्यवहार चालवणारी, शरीरातच वसलेली शक्ती म्हणजे ‘पुरुष’ म्हणजेच आत्मा होय. योग्याला हा आत्मा समजतो. एकदा या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे निर्गुण - निराकार अवस्था कळते. निर्गुण-निराकार अवस्थेतील गोडी कळते आणि मग साहजिकच गुणांबद्दलची ओढ किंवा आदर किंवा आवड कमी होते किंवा नाहीशी होते.
वशीकार-संज्ञक वैराग्य प्राप्त झालेल्या माणसांना व सामान्य माणसांना गुणांबद्दल आदर असतो. गुण हवेहवेसे वाटतात. चांगले गुण मिळविण्याची खटपट प्रत्येकजण करीत असतो. मी दिसायला चांगला असावा, माझी बुद्धी चांगली असावी, मन चांगलं असावं, शरीर चांगलं असावं, मला पत्नी, पुत्र, कन्या चांगल्या मिळाव्या, मित्र चांगले मिळावे, शत्रू चांगले मिळावे, ऐश्वर्य चांगले मिळावे, दृष्टांत चांगला मिळावा, साक्षात्कार चांगला व्हावा, चांगला स्वर्ग मिळावा किंवा अन्य चांगला परलोक मिळावा, अशी प्रत्येकाची तहान असते. पण ही गुणांची तृष्णा सुद्धा नाहीशी होते त्यावेळी परमवैराग्य येते.
आपल्याला हे तत्त्वज्ञान एकदम पटणार नाही कारण आपल्या कल्पना संकुचित असतात. दृष्टीही संकुचित असते. जड सृष्टीच्या, व्यवहाराच्या संकुचित भूमिकेतून सर्व चांगले गुण हवेत, असे वाटते. गुण वंदनीय, स्वीकारार्ह वाटतात. पण एकदाका आत्म्याचा साक्षात्कार झाला की विशाल दृष्टीकोन प्राप्त होतो आणि चांगले चांगले म्हणले जाणारे चांगले असतेच असे नाही व वाईट ठरलेले वाईट असतेच असे नाही, हे कळते. चांगले-वाईट हे भेद मानवी दृष्टिकोनातून झालेले आहेत. आत्म्याला चांगले-वाईट हा भेदच नाही कारण दोन्ही यातूनच उत्पन्न झाले आहे. तो निर्गुण आहे. निर्गुण ही कल्पनाच आपणाला पेलत नाही. गुण नसणे म्हणजे काय, काहीतरी गुण असणारच, असे सामान्य माणसाला वाटते पण निर्गुण ही अवस्था खरोखरच असते. त्या अवस्थेत सर्व गुण एकत्र असतात. हे मनाला पटणारे पण बुद्धीला गोंधळात टाकणारे विवेचन स्पष्ट करताना डॉ. वर्तक उदाहरण देतात, थंडी व उष्णता हे दोन भिन्न गुण आहेत असं आपण मानतो.
पण खरी तशी स्थिती नाही. 100डिग्री सेंटीग्रेड म्हणजे परम उष्णता असे आपण मानू. उणे 100 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे कमाल थंडी असे आपण मानू. या दोन्ही स्थिती + 100 अंश सेल्सिअस आणि - 100 अंश सेल्सिअस = शून्य अंश सेल्सिअस इतके तापमान होईल. हीच शून्यावस्था, हीच निर्गुण अवस्था. याच शून्य अवस्थेच्या एका बाजूस उष्णता तर दुसर्या बाजूस थंडी असते. म्हणजे शून्यातूनच दोन्ही गुण निर्माण होतात. 100 फूट उंच व 100 फूट खोल हे दोन भिन्न गुण आहे, असं आपण मानतो.
पण दोन्ही एकत्र केले तर उंचवटा नाहीसा होईल व खड्डाही नाहीसा होईल. म्हणजेच समानता येईल. या समानतेला निर्गुण शून्यावस्था म्हणतात. यातूनच एका बाजूला ढीग व दुसऱ्या बाजूला खड्डा निर्माण होतो. हीच कल्पना सूक्ष्म करून सर्व गुणदोषांना लावली म्हणजे, निर्गुणाची कल्पना येईल. शीत–उष्ण, उंच-सखल, प्रकाश-अंधार, धन-ऋण, सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन इत्यादी सर्व द्वंद्व एकत्र केली म्हणजे, जे होईल ते निर्गुण होय. निर्गुणातूनच ही द्वंद्वे बाहेर पडलेली आहेत. या निर्गुण आत्म्याचा एकदा साक्षात्कार झाला की खरे ज्ञान होते. हे सत्य ज्ञान झाले की कुठल्याच गुणाबद्दल ओढ राहत नाही. मला हा गुण प्राप्त व्हावा अशी तृष्णा राहात नाही. अशा गुणाचा माणूस किंवा प्राणी मला जास्त आवडतो, अशी वृत्ती राहत नाही. सर्व गुण सारखेच असा समभाव निर्माण होतो. या स्थितीलाच गुणवैतृष्ण्य किंवा गुणांबद्दलची विरक्ती, असं म्हणलं आहे.
दैनंदिन, व्यावहारिक जीवनात निर्माण होऊ शकणारा एक धोकाही डॉ. वर्तक स्पष्ट करतात, गुणांबद्दलची विरक्ती याचा अर्थ कुठल्याच गुणाबद्दल विशेष प्रेम राहत नाही पण याचा अर्थ सद्गुणांबद्दल द्वेष व दुर्गुणांबद्दल प्रेम, असा नव्हे. तरीही दुर्दैवाने तसा अर्थ केला जातो. ही विरक्ती आली की स्वच्छतेबद्दल विशेष आवड राहत नाही. पण मुद्दाम स्वच्छ जागा सोडून उकिरड्यात राहायचं असं नाही. खरी परम विरक्ती ज्याला प्राप्त होईल तो असेल त्या जागी आनंदात राहील. मग तो राजवाडा असो की उकिरडा असो. त्याला मिळेल ते अन्न तो आनंदाने खाईल; मग श्रीखंड असो की अंबोण असो. परम विरक्त ज्ञानी एखाद्या संतावर प्रेम करेल, तेवढेच दुष्टावरही प्रेम करेल.
पण संतांकडे दुर्लक्ष करून दुष्टाला जवळ करणार नाही. दुष्टाकडून सुद्धा परब्रह्माचे कार्य होत असते हे त्याला कळते एवढेच. खरा परम विरक्त मनुष्य स्वर्ग लोकाचीही अभिलाषा धरत नाही. मला स्वर्ग मिळावा किंवा ब्रह्मलोक मिळावा अशी इच्छा सुद्धा त्याच्या मनात निर्माण होत नाही. ही श्रेष्ठतम विरक्ती होय. अशी विरक्ती मिळवण्याचा सतत प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वामी आनंद ऋषी सांगतात-जेव्हा त्रिगुणांची भोगापवर्गार्थता संपते तेव्हा योग्याला त्रिगुणांविषयी एक अलिप्तता वाटते. अंतर्यामीच्या दृष्ट्या पुरुषाच्या अनुभूतीमुळे ही अलिप्तता किंवा गुणवैराग्य प्राप्त होते. ही असंप्रज्ञात समाधीची सुरुवातीची सबीज अवस्था असते. आता कैवल्य अवस्थेला नेणारी निर्बीज समाधी किंवा धर्ममेध समाधी फारशी दूर नसते. अंतिम निर्बीज असंप्रज्ञात समाधी-अवस्था त्रिगुणातीत असते.
सामान्य भाषेत सांगायचं तर म्हणता येईल की या गुणांविषयीच्या विरक्तीत अवगुणांविषयीची विरक्तीही सामावलेली आहे. त्रिगुण जातात ते त्यांच्या दोन्ही बाजूंसकट जातात. त्यामुळे खऱ्या विरक्त माणसाची नेहमी सहजावस्था असते. तो सहजतेने जगतो, यदृच्छेने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टींचा तो स्वीकार करतो.
सूत्राच्या विवेचनाने एक समाधान मनात पसरले आणि मन आपोआप बा. भ. बोरकरांचे गीत गुणगुणू लागले –
झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन .....
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणांत प्रवीण !
वृंदा आशय

