कृतज्ञ
आम्ही !
....आज पुन्हा तीच वेळ ! पहाटेचे चार
वाजले आहेत. सुरेख असा पाऊस पडतोय. पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना जाग्या होत
आहेत. तन-मनाला पुलकित करणारी ही मला ‘कृष्णवेळ’ वाटायला लागलेली आहे. ‘जे पिंडी
ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी’ हे पुन: पुन: सांगणा-या सृष्टीतल्या
आनंदाने मन मोहरून गेलं आहे.
पहाटे पहाटे
प्रभात काळी
ब्रह्मानंदी
लागते टाळी !
असा अनुभव साधकांना, चिंतकांना, कलाकारांना, अभ्यासकांना, जीवनावर भरभरुन प्रेम करणाऱ्या आणि
तन्मय होणाऱ्या कोणालाही देणाऱ्या या 'कृष्णवेळे'ला सादर प्रणाम! या कृष्णवेळी डॉ. राधाकृष्णन् यांना
मनःपूर्वक अभिवादन!
आज ०५ सप्टेंबर शिक्षक
दिन. क्षणाक्षणाला शिकवणाऱ्या आणि आपल्याला घडवत राहणाऱ्या जीवनाला साष्टांग
दंडवत. संपूर्ण जीवन योग आहे हे सांगणार्या योगशास्त्राला मनोभावे वंदन ! वळूयात महर्षी
पतंजलींच्या बाराव्या सूत्राकडे.
अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध:
||१२||
(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र
क्र. १२)
याआधीच्या सूत्रांमधून क्लेशकारक आणि क्लेशरहित
वृत्तींची ओळख झाली. क्लेशकारक वृत्तींचा निरोध केला पाहिजे हे देखील महर्षींनी स्पष्टपणे
सांगितले. या वृत्तींचा निरोध करण्याचे दोन मार्ग म्हणजे ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’
होय.
अभ्यास म्हणजेच पुन्हा पुन्हा
प्रयत्न करणे, सराव करणे होय. कोणत्याही गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न
म्हणजे अभ्यास. हे प्रयत्न जेव्हा परिस्थितीचे निरीक्षण, परीक्षण, चिंतन, अनुभव
अशा टप्प्याने जातात तेव्हा ते प्रयत्न, तो अभ्यास अधिक
जाणीवपूर्वक आणि फलदायी ठरतो. मनामध्ये निर्माण होणा-या क्लेशकारक वृत्तींचे आपण
निरीक्षण केले, त्या का व कशा निर्माण होतात, त्यांची गती, त्यांची तीव्रता किती काळ टिकते? त्यांचा निरोध कशाने होऊ
शकतो या सर्वांचा साकल्याने विचार केला की त्यातूनच निरोधाचा मार्ग सापडतो.
बुद्धीच्या उत्सवात मग्न असतानाच
आज बलाचाही उत्सव आला. ‘बैल माझ्या शिवाराचं हिरवं प्रतीक’ असा पशुसृष्टीशीही
कृतज्ञतेचा स्नेहबंध बांधणारी आमची संस्कृती. गाव सुटले म्हणून ‘पोळा’ साजरा
करायचा थोडीच सोडायचा असतो! पोळ्याचा कालानुरूप अर्थ जाणून घेता आला पाहिजे. पोळा
म्हणजे आमच्या आयुष्यातला, ‘नवसृजन घडवणा-या श्रमसंस्कारांचा उत्सव आहे.’ अभ्यास
म्हणजे पुस्तकी किडा असं चुकीचं समीकरण बांधू पाहणा-या पीढीला बैलाच्या गळ्यातल्या
घंटानादानी जागे करण्याची आवश्यकता आहे. ‘प्रामाणिक परिश्रमाशिवाय यशाची पायरी
चढताच येत नसते’, हे आमचा कष्टकरी शतकानुशतके सांगत
आलेला आहे. या परिश्रमांशी तडजोड नाही केली, यशाचा शोर्टकट नाही शोधला
तरच ‘जगाचा अन्नदाता’ होण्याचे सामर्थ्य येते. आम्ही मागते नाही, देते आहोत ! स्व-स्वरूपाचे भान बाळगा. गलितगात्र शरीराने बुद्धीचे
कोणतेही पेटेंट घेता येत नाही. बलदंड शरीरातच, पोलादी मन घडत असते. जे मातीशी नाते
सांगत मातेपुढे, मातृभूमीपुढे नतमस्तक होऊन जगाच्या कल्याणासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करत, सृष्टीला आशीर्वाद मागत असते. अभ्यास यापेक्षा निराळा काय असतो? व्यष्टी – समष्टी – सृष्टी हे जीवनसूत्र देणा-या भारतीय संस्कृतीचे
आम्ही कृतज्ञ आहोत !
या अभ्यासाला वैराग्याची जोड मिळाली तर
चित्तवृतींचा निरोध सहजतेने होऊ शकतो. वैराग्य म्हणजे आसक्ती नाहीशी होणे. आसक्ती
नाहीशी झाली तरच विषयांच्या पाठोपाठ धावणारे मन थांबून एकाग्र होऊ शकते. या मनावर
न धावण्याची नुसतीच सक्ती केली तर ते अधिक जोरात धावायला लागते. म्हणून वरवरची
मलमपट्टी न करता, मनाच्या सखोलतेमध्ये आत उतरून,
त्याच्या व्यापकतेला एक नियोजनबद्ध दिशा देता येणे आवश्यक असते. शुद्ध, सात्विक,
विवेकी मन लवकर ताब्यात येते. जो निर्माता असतो तोच नि:संग राहू शकतो. उगा नाही
आमुची ज्ञानेश्वर माऊली सांगत, ‘सगुण निर्गुण एकु गोविंदु रे !’
पण मग हे ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’
हे दोन मार्ग सर्वसामान्यांना वापरता येतात की नाही? निश्चितच येतात. एरवी ‘अभ्यास’
हा शब्द आपण केवळ औपचारिक शिक्षणकाळासाठी वापरत असलो तरी लक्षात येते की आमचे दैनंदिन जीवन हेच अभ्यासमय आहे. अभ्यासात
अपेक्षित आहे, ‘पुन्हा पुन्हा करत राहणे’. दैनंदिन जीवनात आम्ही दुसरे काय करतो? पण हे जीवन ख-या अर्थाने अभ्यासमय होण्यासाठी आवश्यकता असते सजगतेची
! ही सजगता बाळगली नाही की आयुष्य म्हणजे ‘पाट्या टाकणे’ होतं. मग आम्ही किती का
मोठ्या पदावर काम करत असेना ! मात्र ही सजगता बाळगली की आमचे झाडणे सुद्धा साधना
व्हायला लागते. उगा नव्हतं घडलं हो, ‘झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी!’ प्रामाणिकतेनं
चालत राहा, तो धावत येतो. मात्र तो धावत आला म्हणून अहंकार बाळगायचा नाही, आणि
त्याचा प्रत्यय नाही आला तरी इतके कष्ट उपसले, दु:ख भोगले तरी त्याला
दया आली नाही, म्हणून रडतखडत तक्रार करायची नाही, याला म्हणतात वैराग्य !
कधी यायचे, कुठे यायचे, कसे यायचे ‘त्याला’ माहिती आहे,
यावरची ठाम श्रद्धाच घडवत असते ‘वैराग्य’! God knows better than
you, what is the best for you ! ते स्वीकारण्याची आपली तयारी असावी लागते, याला म्हणतात ‘वैराग्य’ ! षडरीपुंच्या आहारी न जाता शांत चित्ताने
वाटचाल करत राहायची, हेच तर असते वैराग्य. त्यासाठी संसार सोडून हिमालयावर
जाण्याची आवश्यकता नाही, आणि वयाने वार्धक्याकडे झुकण्याची वाट पाहण्याचीही
आवश्यकता नाही. मानसिक वयाला प्रगल्भतेकडे मात्र नक्कीच झुकावे लागते. कारण, ‘असेल
हरि ; तर देईल खाटल्यावरी’ ही देवाची परीक्षा पाहून नाही चालत. ‘निष्काम कर्मयोग’
साधावा लागतो. मग देवच भक्ताचा ऋणी होतो ! आमच्या संस्कृतीतील भक्तांची, संतांची,
गुरु-शिष्यांची उदाहरणे दुसरं काय सांगतात? ‘चणे खावे लोखंडाचे मग
ब्रह्मपदी नाचे’, या अनुभवाची सत्यता स्थल-कालातीत आहे, हे सांगणारी मूर्तिमंत
उदाहरणे आहेत ती !
अभ्यास आणि वैराग्य अशी काही
निर्भयता विकसित करते, असा काही भाव घडवते की हा भवसागर
केवळ आपण स्वत: नाही, अनेकांना घेऊन सहज पार करतो !
आजही भरपूर कमावून, आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून,
समर्पित भावनेने जगणा-या अशा तमाम विरागी जनांना साष्टांग दंडवत ! जनहो, आपले कर्तव्य आणि आपले कर्तृत्व सांगत राहील, ‘ संपूर्ण जीवन योग
आहे.’
वृंदा आशय
Excellent writing. It is true meaning,with regular study and practice everything is possible.
ReplyDelete