Sunday, 12 September 2021

जागर संकल्पांचा !

 





जागर संकल्पांचा !


    पहाटे अंगणात जाणं हा आता माझा परिपाठ झाला आहे. सृष्टीची अपार शांती हृदयात भरून घेतल्याशिवाय तुमच्याशी बोलताच येत नाही मला. दारी फुललेला चांदीपाट, बहरलेला प्राजक्त मला धुंद करतो आहे. आकाशीचे नक्षत्र आणि फुलातलं साधर्म्य, ‘नक्षत्र माझ्या दारी आल्याचं’ सुख देत आहेत. दारी ‘मोती पोवळ्यांच्या राशी’ असं म्हणणाऱ्या बहिणाबाई आतमध्ये साद घालत आहेत. ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती’ असं म्हणणारे, कवी  कुसुमाग्रज पुन्हा जागे होत आहेत. कविराज आपल्या शब्दांनी, कल्पनांनी, प्रेमाच्या, पराक्रमाच्या उदात्त भावनांनी आमच्यातला वाचक घडवला. नाशिकला तुमच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं, तेव्हा अपार तृप्तीचा अनुभव घेतला. कविवर्य तुम्हाला वंदन !  तुमच्याच प्रेरणेतून सांगते, ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती, अक्षरांचा संग त्याला लाभणार आहे’. प्रिय वाचकांनो किती विषयांवर भरभरून बोलावं वाटतं मला तुमच्याशी. कृष्णसखी होऊन अभंगांबद्दल बोलत राहावं वाटतं. ज्या कवितांवर मी आयुष्यभर प्रेम केलंय, त्या कवितांचे विवेचन घेऊन तुमच्याकडे यावं वाटतं. येईल, निश्चितच लवकर येईल !

‘जनी जनार्दन’ म्हणणारे संत मला दिसतात. काय ‘जनी जनार्दन’ एका विशिष्ट काळातच होता का? नाही. तो कालातीत आहे. तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. ‘जन हे वोळतु जेथे’ म्हणणारे शरच्चंद्र मुक्तिबोध मला भावतात. सामान्य जनांनी आपलं सामर्थ्य पणाला लावलं, म्हणून स्वतंत्र झालेली भूमाता मला दिसते. म्हणूनच आज, जेव्हा बुद्धिदाता गणेश आणि माय, माता महालक्ष्मी अधिष्ठित झालेले आहेत तेव्हा त्यांना आशीर्वाद मागते, देवी सरस्वतीची उपासना अखंडपणे करण्याची अनुमती मला द्या. मायमाऊली हृदयी वसते, डोळे मिटता सर्वत्र दिसते! हे देवा, हे संपूर्ण जीवन प्रार्थना होऊन जाऊ दे !

 

आज आपण महर्षी पतंजलींच्या तेराव्या आणि चौदाव्या सूत्राचा एकत्रित विचार करणार आहोत. पाहता पाहता १२ सूत्र झाली. बारा हा अंक तपाचा निदर्शक. तुमच्यामुळे हे तपाचरण शक्य झालं. तुमच्या साथीनं घडलं. म्हणून त्याचा आनंद मी तुमच्याजवळ व्यक्त केला पाहिजे. काय घडलं नाही या तपाचरणात? नियम पालनापासून सुरुवात केली आणि थेट श्रीकृष्ण दर्शनाच्या सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचलो. योगसूत्रांची ही ताकदच निराळी. स्वतःकडे पाहायला लागलं की परब्रह्म आपसूक भेटते. परब्रह्माच्या दर्शनानं आपणही नि:शब्द झालात. आपला प्रवास प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतो. उत्सवी शब्दांनी, अभिनंदनीय शब्दांनी सुरू झालेला हा तुमचा प्रवास मोठ्या वेगात आणि जोशात चालू होता. पण त्या श्रीकृष्णाचे दर्शन घडताच आपणही थबकलात. इतकी प्रामाणिक प्रतिक्रिया ! सर्व सहप्रवाशांची मी कृतज्ञ आहे !

तत्र स्थितौ यत्नोSभ्यास: ||१३||

(सूत्रार्थ - निरोधात चित्ताची स्थिरता साधण्यासाठी केला जाणारा जो यत्न तो अभ्यास होय.)

१३ व्या सूत्राच्या विवेचनात योगाचार्य कोल्हटकर म्हणतात, “पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय हे निरोधाचे स्वरूप होय. एकाग्रतेच्या अभ्यासाने अंत:करणात हे सामर्थ्य विकसित होते. अंत:स्फूर्त सामर्थ्याने क्षणमात्र घडलेल्या निरोधाचा सुद्धा चित्तावर संस्कार घडत असतो. हा संस्कारानुभव अंत:स्फूर्त सामर्थ्याला उपकारक ठरतो. निरोधाचा क्षणाक्षणाने वाढता अभ्यास निरोधकाल वाढवतो. सुरुवातीला खंडित होत जाणारा हा निरोधकाल वाढत्या अभ्यासाने अखंडित होत जातो.”  

‘अभ्यास’ या संकल्पनेबद्दल आपण मागच्या सूत्रात विस्तृत संवाद साधला. त्यामुळे आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत १४ व्या सूत्राकडे. ‘अभ्यास कसा करावा’, याकडे.

 

स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि: || १४ ||

(सूत्रार्थ – पण तो अभ्यास दीर्घकाल, खंड न पडता, आणि आदरपूर्वक केला म्हणजे तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो.)

हे १४ वे सूत्र मला खूप आवडते. त्यामुळे मी ते अनेक ठिकाणी उद्धृत करत असते. का माहीत नाही, पण कदाचित माझ्या स्वतःमध्ये या गोष्टींचा अभाव असल्यामुळे ते मला अधिक भावत असेल. बऱ्याच वेळेला काय होतं जे आपल्याकडे नसतं त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. आणि मग त्या गोष्टीबद्दल आपण भरभरून बोलायला लागतो. असो. इथे अभ्यास म्हणजे यत्न, प्रयत्न आणि हा प्रयत्न ज्यातून प्रत्यक्ष व्यक्त होतो ते कर्म लक्षात घेऊन पुढील विवेचन केलेले आहे.  

आपले १४ वे योगसूत्र सांगते, दीर्घकाल आणि निरंतर केलेला अभ्यास सार्थकी लागतो. हे थोडसं आपण विस्तारानं पाहू. यात दीर्घकाळ म्हणजे किती दीर्घकाळ? साधारणपणाने आपण पाहतो, प्रत्येक कामाचा एक विशिष्ट असा वेळ ठरलेला असतो. तितक्यावेळ ते काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं दैनंदिन जीवनात तो, दीर्घकाळ ही संकल्पना साधण्याचा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ एक घास बत्तीस वेळा चावून खावा, साधारणपणे ४५ मिनिटे व्यायाम करावा, दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आवश्यक तो वेळ देत आपण प्रत्येक काम पूर्ण केले पाहिजे. दीर्घकाळ याचा अर्थ उगाच थांबत थांबत, कंटाळा करत, आपल्या दैनंदिन भाषेत ‘टाईमपास करत’ असा काहीही होत नाही. उलट ज्या गोष्टीला जो काळ आवश्यक आहे, त्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने आपण काम केले पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो.

 हे काम निरंतर करावे असे महर्षी सांगतात. निरंतर म्हणजे काय, तर सातत्याने. उदाहरणार्थ आमचे विद्यार्थी मित्र परीक्षा जवळ आली की दीर्घकाळ अभ्यास करतात. दीर्घकाळ म्हणजे त्यांच्यासाठी परीक्षेच्या पेपरच्या आदल्या दिवशीची रात्र. निरंतर या संकल्पनेमध्ये हा धोका टाळणे कुठेतरी महर्षींना अपेक्षित असावे. ‘निरंतर’ या संकल्पनेचा अर्थ विशिष्ट अभ्यासाच्या संदर्भाने लक्षात घेताना तो अभ्यास वर्षभर करायचा, असं सांगता येईल. ज्या अभ्यासक्रमाला, ज्या कोर्सला आपण प्रवेश घेतलेला आहे, त्या कोर्सचा अभ्यास त्याच्या निहित कालात, सातत्याने करणे, दररोजचा काही ठराविक वेळ त्यासाठी बाजूला काढणे आणि दररोज तो अभ्यास करणे असा ‘निरंतर’ याचा अर्थ होतो. योगाभ्यास निरंतर करायचा म्हणजे काय, तर दररोज पाऊण तास आपण योगाभ्यास केलाच पाहिजे. दुर्दैवानं सध्या आपली योगाभ्यास ही संकल्पना ‘योग म्हणजे आसन प्राणायाम’ इतकीच मर्यादित आहे. जेव्हा आपण योगाची आठ अंग समजून घेऊ शकू, त्या वेळेला ‘योग म्हणजे जीवन आहे’ आणि जीवनभर हा अभ्यास निरंतर करत राहायचा असतो, म्हणजे काय, हे आपल्याला लक्षात येईल.

निर् + अंतर असा या शब्दाचा विग्रह होतो. निर् हा उपसर्ग अंतर या शब्दाला लागलेला दिसून येतो. निरंतर जिथे अंतराचा अभाव आहे, म्हणजेच एकदा जे काही ठरवलं ते सातत्याने आपण केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो भाग बनला पाहिजे. त्याने काय होईल तर आपल्याला ती ‘सवय’ लागेल. वयासह, वयासोबत जी वाढते ती सवय. आपली सवय आपला स्वभाव घडवत असते. ज्या सवयी आपण स्वतःला लावत असतो त्या सवयीबद्दल आपण किती जागरूक राहणं आवश्यक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. समजतं.

 सवयीने आपण अनेक गोष्टी आपसूक करत असतो. काही वेळेला तिथे सजगता नसली तरीसुद्धा सवयीने त्या घडून जातात. मग आपल्या स्वभावावर, स्वतःच्या घडण्यावर, स्वतःच्या अस्तित्वावर जी इतकी परिणामकारक ठरते, त्या सवयीच्या बाबतीत आपण किती जागरूक राहिले पाहिजे ! डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, “तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतील.” हे साहजिकच आहे. सवय स्वभाव घडवते, स्वभाव कर्तृत्व घडवतो. स्वाभाविक रित्या हे कर्तृत्व हेच आपलं भविष्य घडवणार आहे. आपल्या कृतीच्या मुळाशी आपण केलेला विचार असतो. तो विचार आपल्या कृतीला प्रभावित करत असतो. म्हणून आपण सातत्यानं, निरंतर  सकारात्मक विचार का केला पाहिजे याचंही कोडं, आपल्याला इथे उलगडतं.

निरंतर याचा अर्थ आपल्याला कळाला. आता सत्कारपूर्वक किंवा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारचा उल्लेख महर्षी का करतात? आदर, सत्कार हे शब्द आपल्याला तसे औपचारिक वाटतात. काही विशिष्ट औपचारिक प्रसंगांच्या वेळेलाच आदर - सत्कार करायचा असतो, अशी आपली स्वाभाविक धारणा असते. मात्र आपण आपल्या जीवनाची जी भूमिका निश्चित करत आहोत, ज्या सवयीतून, दृष्टिकोनातून आपण स्वतःला घडवत आहोत, स्वभाव घडवत आहोत, त्यातून कर्तृत्व साकारत, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर दैनंदिन जीवनाचा आपल्याला आदर वाटला पाहिजे.

दैनंदिन जीवनाकडे आपण ज्या श्रद्धेने, ज्या निष्ठेने पाहू शकू ती श्रद्धा आणि निष्ठा आपल्यातली ही सत्कारपूर्वकता जोपासणारी आहे. आणि मग त्या भूमिकेतून जेव्हा आपण स्वीकारलेल्या कामाकडे, करत असलेल्या कर्तव्याकडे पाहू शकतो, तेव्हाच ते कर्तव्य परिपूर्ण होऊ शकतं. आपण त्याकडे त्राग्याने, वैतागाने, हे माझ्याच वाट्याला का?, मला करायचं नाही पण मला करावं लागतं, अशा भावनेतून जर पाहायला लागलो तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, आपल्या वर्तमानावर, आपल्या सभोवतालावर, आपल्या संपर्कातील व्यक्तींवर झाल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचा वर्तमान हा असा कटकटीचा, तापदायी असतो, त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कारण वर्तमान क्षण, पुढच्या क्षणाला इतिहास झालेला असतो. जिथे इतिहास प्रेरक असतो, तिथे  भविष्य उत्तम, उज्ज्वल घडू शकतं. प्रेरणा माणसाला नेहमी अधिक सकारात्मकतेकडे आणि ऊर्ध्वगामी नेत असते. हा प्रगतीकडचा प्रवास आपल्याला करायचा असेल, तर तो दीर्घकाळ, निरंतर आणि सत्कारपूर्वकतेने, आदराने, आस्थेने केला की या सगळ्याचं एक दृढ अधिष्ठान तयार होतं.

जिथे अधिष्ठान दृढ असतं, त्या दृढ अधिष्ठानाला काळाचं, परंपरेचं, पिढ्यापिढ्यांच संचित लाभत असते. हे संचित, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य हे आपल्या वर्तमान क्रिया प्रतिक्रियांवर प्रभाव टाकत असतं. त्यामुळे असा दृढतेने केलेला अभ्यास निश्चितच फलदायी होतो, याबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

अशी दृढभूमी, दृढ अधिष्ठान घडवण्यामध्ये केवळ आपलाच सहभाग असता तर ती कदाचित लवकरही झाली असती. मात्र या प्रक्रियेवर आपला सभोवताल प्रभाव टाकत असतो. आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, ज्या ठिकाणी वावरतो अशा सर्व ठिकाणची माणसं या ना त्या प्रकाराने आपल्याशी संबंधित असतात. तिथले नियम, तिथल्या योजना, तिथल्या धारणा या सगळ्याच गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच कुठलाही अडथळा आला तरी त्याचं संधीत रूपांतर करत आपण दृढ राहणं गरजेचं असतं. अशा संघर्षातून निर्माण झालेली दृढभूमी अढळपद प्राप्त करते. त्यासाठी पॉन्डिचेरीच्या माताजींनी दिलेला संदेश अनुसरावा लागतो -

Do not aim at success. Our aim is perfection. - The Mother .

वृंदा आशय

Monday, 6 September 2021

कृतज्ञ आम्ही !

 

कृतज्ञ आम्ही !

....आज पुन्हा तीच वेळ ! पहाटेचे चार वाजले आहेत. सुरेख असा पाऊस पडतोय. पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना जाग्या होत आहेत. तन-मनाला पुलकित करणारी ही मला ‘कृष्णवेळ’ वाटायला लागलेली आहे. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी’ हे पुन: पुन: सांगणा-या सृष्टीतल्या आनंदाने मन मोहरून गेलं आहे.


पहाटे पहाटे
प्रभात काळी
ब्रह्मानंदी
लागते टाळी !


असा अनुभव साधकांना, चिंतकांना, कलाकारांना, अभ्यासकांना, जीवनावर भरभरुन प्रेम करणाऱ्या आणि तन्मय होणाऱ्या कोणालाही देणाऱ्या या 'कृष्णवेळे'ला सादर प्रणाम! या कृष्णवेळी डॉ. राधाकृष्णन् यांना मनःपूर्वक अभिवादन!
          
आज ०५ सप्टेंबर शिक्षक दिन. क्षणाक्षणाला शिकवणाऱ्या आणि आपल्याला घडवत राहणाऱ्या जीवनाला साष्टांग दंडवत. संपूर्ण जीवन योग आहे  हे सांगणार्‍या योगशास्त्राला मनोभावे वंदन ! वळूयात महर्षी पतंजलींच्या बाराव्या सूत्राकडे.

अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध: ||१२||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. १२)

याआधीच्या सूत्रांमधून क्लेशकारक आणि क्लेशरहित वृत्तींची ओळख झाली. क्लेशकारक वृत्तींचा निरोध केला पाहिजे हे देखील महर्षींनी स्पष्टपणे सांगितले. या वृत्तींचा निरोध करण्याचे दोन मार्ग म्हणजे ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’ होय.

 

अभ्यास म्हणजेच पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे, सराव करणे होय. कोणत्याही गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न म्हणजे अभ्यास. हे प्रयत्न जेव्हा परिस्थितीचे निरीक्षण, परीक्षण, चिंतन, अनुभव अशा टप्प्याने जातात तेव्हा ते प्रयत्न, तो अभ्यास अधिक जाणीवपूर्वक आणि फलदायी ठरतो. मनामध्ये निर्माण होणा-या क्लेशकारक वृत्तींचे आपण निरीक्षण केले, त्या का व कशा निर्माण होतात, त्यांची गती, त्यांची तीव्रता किती काळ टिकते? त्यांचा निरोध कशाने होऊ शकतो या सर्वांचा साकल्याने विचार केला की त्यातूनच निरोधाचा मार्ग सापडतो.

बुद्धीच्या उत्सवात मग्न असतानाच आज बलाचाही उत्सव आला. ‘बैल माझ्या शिवाराचं हिरवं प्रतीक’ असा पशुसृष्टीशीही कृतज्ञतेचा स्नेहबंध बांधणारी आमची संस्कृती. गाव सुटले म्हणून ‘पोळा’ साजरा करायचा थोडीच सोडायचा असतो! पोळ्याचा कालानुरूप अर्थ जाणून घेता आला पाहिजे. पोळा म्हणजे आमच्या आयुष्यातला, ‘नवसृजन घडवणा-या श्रमसंस्कारांचा उत्सव आहे.’ अभ्यास म्हणजे पुस्तकी किडा असं चुकीचं समीकरण बांधू पाहणा-या पीढीला बैलाच्या गळ्यातल्या घंटानादानी जागे करण्याची आवश्यकता आहे. ‘प्रामाणिक परिश्रमाशिवाय यशाची पायरी चढताच येत नसते’, हे आमचा कष्टकरी शतकानुशतके सांगत आलेला आहे. या परिश्रमांशी तडजोड नाही केली, यशाचा शोर्टकट नाही शोधला तरच ‘जगाचा अन्नदाता’ होण्याचे सामर्थ्य येते. आम्ही मागते नाही, देते आहोत ! स्व-स्वरूपाचे भान बाळगा. गलितगात्र शरीराने बुद्धीचे कोणतेही पेटेंट घेता येत नाही. बलदंड शरीरातच, पोलादी मन घडत असते. जे मातीशी नाते सांगत मातेपुढे, मातृभूमीपुढे नतमस्तक होऊन जगाच्या कल्याणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत, सृष्टीला आशीर्वाद मागत असते. अभ्यास यापेक्षा निराळा काय असतो? व्यष्टी – समष्टी – सृष्टी हे जीवनसूत्र देणा-या भारतीय संस्कृतीचे आम्ही कृतज्ञ आहोत !              

 या अभ्यासाला वैराग्याची जोड मिळाली तर चित्तवृतींचा निरोध सहजतेने होऊ शकतो. वैराग्य म्हणजे आसक्ती नाहीशी होणे. आसक्ती नाहीशी झाली तरच विषयांच्या पाठोपाठ धावणारे मन थांबून एकाग्र होऊ शकते. या मनावर न धावण्याची नुसतीच सक्ती केली तर ते अधिक जोरात धावायला लागते. म्हणून वरवरची मलमपट्टी न करता, मनाच्या सखोलतेमध्ये आत उतरून, त्याच्या व्यापकतेला एक नियोजनबद्ध दिशा देता येणे आवश्यक असते. शुद्ध, सात्विक, विवेकी मन लवकर ताब्यात येते. जो निर्माता असतो तोच नि:संग राहू शकतो. उगा नाही आमुची ज्ञानेश्वर माऊली सांगत, ‘सगुण निर्गुण एकु गोविंदु रे !’   

पण मग हे ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’ हे दोन मार्ग सर्वसामान्यांना वापरता येतात की नाही? निश्चितच येतात. एरवी ‘अभ्यास’ हा शब्द आपण केवळ औपचारिक शिक्षणकाळासाठी वापरत असलो तरी लक्षात येते की आमचे दैनंदिन जीवन हेच अभ्यासमय आहे. अभ्यासात अपेक्षित आहे, ‘पुन्हा पुन्हा करत राहणे’. दैनंदिन जीवनात आम्ही दुसरे काय करतो? पण हे जीवन ख-या अर्थाने अभ्यासमय होण्यासाठी आवश्यकता असते सजगतेची ! ही सजगता बाळगली नाही की आयुष्य म्हणजे ‘पाट्या टाकणे’ होतं. मग आम्ही किती का मोठ्या पदावर काम करत असेना ! मात्र ही सजगता बाळगली की आमचे झाडणे सुद्धा साधना व्हायला लागते. उगा नव्हतं घडलं हो, ‘झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी!’ प्रामाणिकतेनं चालत राहा, तो धावत येतो. मात्र तो धावत आला म्हणून अहंकार बाळगायचा नाही, आणि त्याचा प्रत्यय नाही आला तरी इतके कष्ट उपसले, दु:ख भोगले तरी त्याला दया आली नाही, म्हणून रडतखडत तक्रार करायची नाही, याला म्हणतात वैराग्य ! कधी यायचे, कुठे यायचे, कसे यायचे ‘त्याला’ माहिती आहे, यावरची ठाम श्रद्धाच घडवत असते ‘वैराग्य’! God knows better than you, what is the best for you ! ते स्वीकारण्याची आपली तयारी असावी लागते, याला म्हणतात ‘वैराग्य’ ! षडरीपुंच्या आहारी न जाता शांत चित्ताने वाटचाल करत राहायची, हेच तर असते वैराग्य. त्यासाठी संसार सोडून हिमालयावर जाण्याची आवश्यकता नाही, आणि वयाने वार्धक्याकडे झुकण्याची वाट पाहण्याचीही आवश्यकता नाही. मानसिक वयाला प्रगल्भतेकडे मात्र नक्कीच झुकावे लागते. कारण, ‘असेल हरि ; तर देईल खाटल्यावरी’ ही देवाची परीक्षा पाहून नाही चालत. ‘निष्काम कर्मयोग’ साधावा लागतो. मग देवच भक्ताचा ऋणी होतो ! आमच्या संस्कृतीतील भक्तांची, संतांची, गुरु-शिष्यांची उदाहरणे दुसरं काय सांगतात? ‘चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे’, या अनुभवाची सत्यता स्थल-कालातीत आहे, हे सांगणारी मूर्तिमंत उदाहरणे आहेत ती !  

अभ्यास आणि वैराग्य अशी काही निर्भयता विकसित करते, असा काही भाव घडवते की हा भवसागर केवळ आपण स्वत: नाही, अनेकांना घेऊन सहज पार करतो ! आजही भरपूर कमावून, आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून, समर्पित भावनेने जगणा-या अशा तमाम विरागी जनांना साष्टांग दंडवत ! जनहो, आपले कर्तव्य आणि आपले कर्तृत्व सांगत राहील, ‘ संपूर्ण जीवन योग आहे.’

वृंदा आशय            

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...