ज्ञानदीप तेवत राहो
वडीलधा-यांनी आशीर्वाद दिले, सहका-यांचे प्रोत्साहन मिळाले, योग तज्ज्ञांनी कौतुकाची
थाप दिली, मग मनोवृत्ती प्रफुल्लित होणार नाहीत का? मन आनंदी झालं की मनाची कवाडं उघडतात. बंद दरवाजे उघडले की मोकळं
वारं खेळायला लागतं, स्वच्छ प्रकाश पसरायला लागतो. स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसायला
लागतं. खूप काही कळायला, समजायला लागतं. माणूस ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायला
लागतो. तेव्हा या प्रफुल्लित मनोवृत्तीने वळूयात महर्षी पतंजलींच्या सातव्या
सूत्राकडे जे ज्ञानप्राप्तीची प्रमाणे विषद करते-
प्रत्यक्षानुमानागमा:
प्रमाणानि || (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ७)
(सूत्रार्थ - प्रत्यक्ष, अनुमान
आणि आगम ही तीन प्रमाणे होत.)
सहाव्या सूत्रामध्ये महर्षींनी प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती या पाच प्रमुख मनोवृत्ती असल्याचे निर्देशित केले आहे.
सातव्या सूत्रामध्ये ‘प्रमाण’ या पहिल्या वृत्तीबद्दल ते स्पष्टीकरण देतात. या वृत्तीचे
तीन प्रकार. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये याचा सूत्रार्थ
सांगताना स्वामी विवेकानंद नोंदवतात – प्रत्यक्षानुभव, अनुमान व आप्तवचन (अधिकारी व्यक्तींचे शब्द) ही प्रमाणे होत.
स्वामीजी सांगतात प्रत्यक्ष
प्रमाण किंवा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे जे काही आपण पाहतो किंवा अनुभवतो ते.
इंद्रियांना भ्रमात पाडणारी कोणतीही गोष्ट न घडल्यास मला जे दिसेल वा अनुभवास येईल
ते प्रमाण मानलं पाहिजे. मी हे जग पाहतो, अनुभवतो हाच जगाच्या अस्तित्वाचा पुरेसा
पुरावा आहे. याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. प्रति + अक्ष = प्रत्यक्ष.
आपल्या डोळ्यांसमोर जे घडतं ते प्रत्यक्ष. डोळ्यांबरोबरच कान, नाक, जीभ व त्वचा ही
सर्व ज्ञानेन्द्रिये प्रत्यक्ष प्रमाण देतात. ऐकल्याबरोबर मन ध्वनीच्या उगमापाशी
सरूपता साधतं, गंध आल्याबरोबर त्याच्या उगमाशी, चव लागल्याबरोबर त्याच्या मूळ कारणाशी
तर स्पर्शाबरोबर मोहरलेले मन त्या अनुभवाशी सरूप होतं. हे असं मूळापाशी जाणं घडत
असतं म्हणून ती प्रमाण वृत्ती. पाचही ज्ञानेंद्रियांकडून येणार ज्ञान हे प्रत्यक्ष
प्रमाण या सदरात मोडतं, असं योगशास्त्राचे अभ्यासक डॉ. प.वि.वर्तक
यांनी आपल्या, ‘पातंजल योगदर्शन : विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथामध्ये नोंदवलेलं
आहे.
अचूक स्वरुपात ज्ञानग्रहण
करण्यासाठी आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. लहान
मुलांची ही क्षमता अगदी तीव्र आणि तीक्ष्ण असते. त्यामुळे अनुभव त्यांच्या थेट आत
उतरतो. अनुभवाचा अर्थ लावणारे मन, बुद्धी सक्षम पाहिजेत. माणसाने हलक्या कानाचे,
दुर्बल मनाचे नसावे. त्यातच आजच्या काळात पाहणे म्हणजे फक्त समोर घडणारेच नाही. यंत्रांच्या
माध्यमातून पाहणे अधिक घडते. दुर्बीण दूरपर्यंतचे दाखवू शकते तर टीव्ही, मोबाईल
सगळं जग समोर आणून ठेवतात. संगणक, मोबाईल हाताळताना आमची तारांबळ उडते. सगळे पर्याय
तिथेच असतात पण पाहता येत नाहीत. करून
पाहण्याची तयारी नाही. आपण होऊन माहिती, ज्ञान घेण्याची उत्सुकता नसते. संयम आणि
चिकाटी नसते. ते वाढवले पाहिजेत.
मात्र
दरवेळी प्रत्यक्ष प्रमाणाचा आग्रह धरता येत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाला काही
मर्यादा पडतात. ज्ञान तर त्याच्या व्यापक आणि मूळ स्वरुपात होणे आवश्यक आहे. त्यामुळे
आणखी काही प्रमाणे ठरवलेली आहेत. अनुमान हे दुसरे प्रमाण होय. मनाचे या अर्थी मान
हा शब्द तयार होतो. मनाचे ज्ञान म्हणजे मान होय. उदाहरणार्थ मी असे मानतो. शेवटी
आपल्या मानण्या, न मानण्यावर, सामूहिक मान्यता देण्यावर आपण ‘प्रमाण’ काय ते ठरवत
असतो. मनाच्या मागोमाग येते ते ‘अनुमान’ होय. तर्क होय. एखाद्या चिन्हावरून त्यानं
सुचवलेल्या वस्तूचं ज्ञान होतं. उदा. धूर पाहून तिथे अग्नी आहे असे ज्ञान झालं,
याला म्हणतात अनुमान प्रमाण. रेडिओवर गायक गातो. आपण आवाजावरून ओळखतो, कोण गात आहे
ते. फुलं समोर दिसत नसले तरी दुरूनच सुगंध
येतो. फुलं दिसत नाहीत पण आपण अचूक ओळखतो कोणती फुलं आहेत मोगरा, गुलाब, निशिगंध की रातराणी, सहज सांगतो. मागच्या अनुभवावरून ते ओळखतो.
अनुमाना मुळे स्थलकालाची मर्यादा ओलांडली जाते. पूर्वी काय घडले होते आणि पुढे काय
घडणार याचा अंदाज बांधता येतो. आपल्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे हे अनुमान बरोबर
किंवा चूक ठरते.
आगम हे तिसरे प्रमाण आहे. स्वामी
विवेकानंदांच्या मते आगम प्रमाण म्हणजे आप्तवाक्य. आप्तवाक्य म्हणजे ज्यांना
सत्याचा मूर्त साक्षात्कार झालेला आहे अशा योग्यांची प्रत्यक्ष अनुभूती. जो विशुद्ध
सत्वाचा योगी असतो, जो पवित्र, निर्मोही, नि:स्वार्थी, नि:संग आणि अतिंद्रीय ज्ञानी असतो त्याला भूत, भविष्य,
वर्तमान हे सर्व उघड्या पुस्तकासारखे वाचता येतं. त्याचे शब्द प्रमाण असतात. कारण
ज्ञानाचा त्याला स्वतःच्या अंतर्यामी साक्षात्कार झालेला असतो. तो सर्वज्ञ असतो.
असेच पुरुष शास्त्रांचे प्रणेते असतात आणि म्हणूनच शास्त्र ही प्रमाण होत.
डॉ. प. वि. वर्तक ‘आगम’
प्रमाणाचा वेगळा अर्थ लावतात. त्यांच्या मते काही वेळा अनुमान करणे जमत नाही कारण
आपले ज्ञान त्या तोडीचे नसते. मग ‘आगम’ हेच प्रमाण असते. आगम म्हणजे आपल्यापर्यंत
आलेले ज्ञान. हे ज्ञान आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत येते किंवा वर्तमानकालीन
ज्ञानी माणसांकडून आपल्यापर्यंत येते. माणसाच्या मर्यादित आयुष्यात सर्व ज्ञान
प्रत्यक्ष प्रमाणाने मिळवणे केवळ अशक्य असते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण
आगम प्रमाण व्यक्त करते. इतरांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण ज्ञान कमावणे म्हणजे
आगम. हे इतर म्हणजे जगातील यच्चयावत लोक. कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंतचे सारेच
यात सामावले जातात.
आगमाची
अशी व्यापकता वाढली की ज्ञानाचे पावित्र्य जाणीवपूर्वक टिकवावे लागते. ज्ञान हे सत्यज्ञान असले पाहिजे.
ते पूर्वज्ञानाला विरोधी नसावे. शास्त्राच्या कसोटीवर कोणालाही पारखून घेता यावे.
ज्ञान आणि ज्ञानोपासकाचे चारित्र्य या दोघांचेही तेज परस्परावलंबी असते. लोक आणि
श्लोक हे दोन शब्द एकमेकांच्या फार जवळ जातात. लोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारली
पाहिजे. माहितीचा पसारा न देता ज्ञानाचे मांगल्य पुढे नेता आलं पाहिजे.
आज
मला मोठा आनंद आहे. या सूत्राचे विवेचन करत असताना वर निर्देशित केलेल्या सर्व
गुणांनी युक्त अशा दोन महापुरुषांचे संदर्भ आजच्या दिवसाला आहेत. या ज्ञानी, कर्तृत्ववान
आणि कल्याणकारी अशा महापुरुषांची एकाची
जयंती तर एकाची पुण्यतिथी आहे.
.....पण
खेद याचाच आहे, सामान्य माणसापर्यंत पोहचलेलं ज्ञान त्याला सांगतंय, कोणत्याही एकाच
महापुरुषाचा पुरस्कार कर. पर्यायाने वास्तव इतिहासाचा तिरस्कार कर. आपल्या
भूमिकेने वर्तमानात हाहाकार निर्माण करणा-या माणसाने, समाजाने आत्मपरीक्षण करून आपले
काय चुकतंय याचे ज्ञान करून घेणे, ही काळाची गरज आहे.
वृंदा आशय
Khup chaan 👍✌
ReplyDeleteलोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारली पाहिजे. माहितीचा पसारा न देता ज्ञानाचे मांगल्य पुढे नेता आलं पाहिजे.
ReplyDeleteखूप सुंदर ... अप्रतिम ...
प्रमाणाकडे नेणारा अप्रतिम संवाद !
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर लेखन .पण त्याही पेक्षा जेव्हा ऑडियो एकला तेव्हा खूपच छान वाटलं .
ReplyDeleteKhup chaan
ReplyDeleteअतिशय सुरेख... ऑडिओ मुळे जास्त प्रभावशाली
ReplyDeleteखुप छान सादरीकरण ,योगशास्त्रातील अवघड भाग सोपा करुन सांगितला आहे
ReplyDeleteसोप्या शब्दात माडणी खूप छान,
ReplyDeleteछान
ReplyDeleteअप्रतिम, फार छान माहिती मिळाली
ReplyDeleteKhup chan mahiti milali
ReplyDelete