गंध स्मृतींचा !
पहाटेचे चार वाजलेले आहेत. ब्राह्ममुहूर्ताची
वेळ ! नकळत घराचा दरवाजा उघडला आणि अंगणात येऊन उभी राहिले. भुरभूर पाऊस सुरू आहे.
रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात डांबरी रस्ते चमकत आहेत. निसर्गातला मंद अंधार
सृष्टीची मोहकता वाढवतो आहे. ओली झालेली फुलझाडं या प्रकाशात स्वत:च्या रंगासह
कृष्ण-धवल दर्शन देत आहेत. सृष्टी मध्ये शांततेचा नाद आहे.
हा पडणारा पाऊस, निसर्गातली शांतता माझ्या
पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना जाग्या करत आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज
कानामध्ये झिरपत चाललेला आहे. छपरावरचा पाऊस, जाळीवरचा पाऊस, झाडावरचा पाऊस, झोपाळ्याच्या
कौलारू छतावरचा पाऊस ! प्रत्येक ठिकाणच्या थेंबाचा आवाज निराळा. लाईटच्या प्रकाशात
चमकणारे, भिजलेले काळे डांबरी रस्ते पावलांना वेध लावत आहेत. रस्त्याच्या
आजूबाजूला असलेल्या काळ्या मातीचा कृष्णगंध मनामध्ये दरवळतो आहे.... आणि या मृद्गंधाने
मला थेट संस्कृतीच्या मुळापाशी नेऊन सोडलं! सृष्टीतला श्यामवर्ण..... मातीचा
कृष्णगंध..... आज श्रीकृष्ण जयंती ! ॐ नमो भगवते वासुदेवाय !
‘कृष्ण’ एक शब्द मनामध्ये उमटला. त्याच्या किती
प्रतिमा ! तो बाळक्रीडा करणारा, श्रेयस आणि प्रेयस यांच्या संघर्षात न अडकता दोन्हींनाही
यथोचित न्याय देणारा, सहज कर्तृत्व गाजवून कंसवध करणारा, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला
गीता सांगून त्याचे सामर्थ्य जागवणारा, महाभारत घडवणारा आणि ‘यदा यदा ही धर्मस्य....’
असे अभिवचन देऊन भारताला आश्वस्त करत, विश्वकल्याण साधणारा कालातीत श्रीकृष्ण !
ज्याने कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगितलेला
आहे,
त्याचे स्मरण करत महर्षी पतंजलींच्या ‘स्मृती’ ही मनाची वृत्ती स्पष्ट करणाऱ्या ११
व्या सूत्राचे चिंतन करायचे आहे. काय हा मणिकांचन योग ! परमेश्वरा मनोभावे वंदन, संपूर्ण समर्पण !!
अनुभूतविषयासंप्रमोष: स्मृति: ||११||
(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र
क्र. ११)
या सूत्राचा सूत्रार्थ स्पष्ट करताना ‘राजयोग’ ग्रंथात, स्वामी
विवेकानंद लिहितात, ‘प्रत्यक्ष अनुभवलेले विषय त्यांच्या वृत्ती मनातून नाहीसे न होता
संस्कारांच्या रूपाने जाणिवेत परत येण्याला स्मृती म्हणतात. स्मृतीचे भावित आणि
अनुद्भावित असे दोन प्रकार आहेत.’ तर योगाचार्य कृष्णाजी कोल्हटकर त्यांच्या
ग्रंथात स्पष्ट करतात, ‘पूर्वी अनुभवलेल्या विषयांचा असंप्रमोष म्हणजे त्या
अनुभवामुळे चित्तांत उत्पन्न होणारे त्या विषयाचे अनुसंधान, ही स्मृती होय’. डॉ.
प.वि. वर्तक सांगतात, ‘अनुभव घेतलेल्या विषयाचा, परिपूर्ण नाश न होणे याचा अर्थ तो
अनुभव तो विषय कुठेतरी शिल्लक असणे होय; त्यालाच स्मृती किंवा आठवण म्हणतात.’ ओशो
लिहितात, - स्मृती ही मनाची पाचवी वृत्ती आहे. तिचा उपयोग किंवा गैर उपयोग होऊ
शकतो. जर स्मृतीचा गैर उपयोग झाला तर ती गोंधळ निर्माण करते.
दैनंदिन जीवनात आपण ज्ञानेंद्रियांच्या
सहाय्याने किंवा मनाने अनुभव घेत असतो. हा अनुभव बऱ्याच वेळेला घर करून मनात राहतो
किंवा आठवत तरी राहतो. अनुभव घेतानाची बाह्य सदृश्य परिस्थिती समोर असणे किंवा
सुप्तावस्थेतील विशिष्ट संस्कार जागा होणे यामुळे अनुभव विषयाचं पुन्हा प्रकटीकरण
होतं, यालाच ‘स्मृती’ म्हणतात. ही स्मृती मनाची वृत्ती आहे. विषय ज्ञानेंद्रियाने
भोगवून संपवला तरी अनुभव नाहीसा होत नाही. ही नाहीसे न होण्याची प्रवृत्ती म्हणजे
स्मृती. अनुभव घेतलेल्या विषयाभोवती पिंगा घालण्याची मनाची वृत्ती म्हणजेच स्मृती.
मनाची ती वृत्ती असल्याने, मन त्याला वाटेल तेव्हा, स्मृतीत रममाण होते. ही स्मृती
मनाला वाटेल तितकी वर्षे मागे भूतकाळात घेऊन जाते कोणाकोणाला गत जन्माच्या आठवणी
देखील येतात. आपल्या मनाला स्थानापन्न व्हायला समोर प्रमाण नसेल, विपर्यय नसेल,
विकल्प नसेल व निद्रा येत नसेल तर माणसाचे मन स्मृतिरंजन करीत बसते.
सगळे योगाचार्य ‘स्मृती’
बद्दलचे असे शास्त्र स्पष्ट करत असले तरी सर्वसामान्य माणसासाठी ‘स्मृती जागवणे’
आणि काहीतरी ‘विस्मृतीत टाकणे’ ही एक मोठी कला आहे. ही कला ज्याला साध्य होते,
त्याचे जीवन सुखी होते.मला काय आठवायचं आहे, काय विसरायचं आहे, आणि असे का करायचे आहे, याची स्पष्टता
ज्याच्याजवळ असेल ना, त्याच्या आयुष्यात कुरकुरीला आणि तक्रारीला जागा राहत नाही. माझा
मेंदू, माझे मन माझंच ऐकणार नसेल तर ‘माझा’ उपयोग काय? माझं इतरांनी ऐकावे असं जे मला वाटतं,
त्याला अर्थ काय?
योगाचार्य कोल्हटकरांनी मोठे छान सांगितलेले
आहे, “या वृत्तीरूप जंजाळाचा द्रष्टा आत्मा असल्यामुळे तो त्यापासून अगदी वेगळा
असतो. पण तो वेगळा असल्याचा विवेक न होणे हीच अविद्या होय. या अविद्यारूप क्लेशाने
युक्त असलेल्या वृत्ती क्लिष्ट वृत्ती होत. योग या क्लिष्ट वृत्तींचा निरोध करण्यास
सांगतो.”
व्यक्तिगत
जीवनातल्या आठवणी हा तर ज्याचा – त्याचा प्रश्न आहे. पण या समाजजीवनात, राष्ट्र्जीवनात
आपल्या काही सामूहिक जबाबदाऱ्या आहेत. ज्यांचे विश्वकल्याणात फार मोठे योगदान
असणार आहे. तेव्हा माझ्या देशाला त्याच्या आध्यात्मिक स्वभावाची आत्मविस्मृती कधीच
होऊ नये, एवढीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना ! विश्वकल्याणासाठी प्रत्येक भारतीय
कटिबद्ध आहे. त्याने ईशचरणी समर्पित व्हावे. ‘कर्मातचि तुझा भाग, तो फळात नसो कधी’,
या नि:संगतेने ज्ञानपूर्ण, भक्तियुक्त कर्मयोग आचरावा. त्याच्या स्मृतींचा गंध
स्थल-कालाच्या मर्यादा ओलांडून निरंतर दरवळत राहील.
वृंदा आशय