Friday, 24 June 2022

पुनश्च हरि ॐ !


 

(दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग  ) .  

पुनश्च हरि ॐ !

                                                                        

        
जागतिक योग दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गेल्या वर्षी याच दिवशी 'योग रहस्य' या ब्लॉग अंतर्गत योगसूत्रांच्या विवेचनास प्रारंभ केला होता. एकूण १६ सूत्रे गतवर्षी पाहिली. आजही त्या लिंकवर जाऊन आपण सर्व सूत्रांचे विवेचन वाचू शकता.व्यस्ततेमुळे मध्ये त्यात खंड पडला होता. आजच्या ‘योग दिनी’ या ब्लॉगचा पुन्हा प्रारंभ करत आहे. दर महिन्याला किमान एका सूत्राचे विवेचन करावे आणि ते दर २१  तारखेला किंवा त्या आठवड्यात प्रकाशित करावे असा मानस आहे. मध्ये खंड पडला होता तरी आपण सर्व सोबत आहातच या आत्मविश्वासाने हे पाऊल उचलत आहे.


      
आज माझ्या दिवसाची सुरुवात  सुंदर झाली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या लाल मैदानात योग वर्ग घेऊन सुरू होणारा दिवस किती आनंददायी आणि साऱ्या योग आठवणींना उजाळा देणारा असू शकतो याचा सुरेख प्रत्यय घेतला. त्रिवार ॐकार, गुरुवंदन आणि महर्षी पतंजलींना केलेले वंदन, मला जवळपास २५ वर्षांच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेले. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या योग शास्त्राविषयी त्यानिमित्तानं कृतज्ञता व्यक्त करता आली. ती कृतज्ञता मनात ठेवूनच वळत आहे पतंजली महामुनींच्या सतराव्या सूत्राकडे –



वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञात: ||१७||

( समाधीपाद, सूत्र क्र. १७, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन - कृष्णाजी केशव कोल्हटकर )



सूत्रार्थ - संप्रज्ञात समाधीसाठी चित्ताला स्थूल आलंबन असणे हे वितर्काचे रूप, सूक्ष्म आलंबन असणे हे विचाराचे रूप, सत्त्वगुणाची सुखात्मता आलंबन असणे हे आनंदाचे रूप आणि मी आहे एवढेच केवळ स्फुरण आलंबनार्थ असणे हे अस्मितेचे रूप . या चारांच्या रूपांशी चित्ताचा जो अनुगम म्हणजे चित्ताची तदाकारता तिच्या योगाने सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असा चार प्रकारचा संप्रज्ञात समाधी होतो.

     
सोळाव्या सूत्रामध्ये गुणवैराग्याचा परिचय आपण करून घेतला. गुणवैराग्य समाधीतून उत्पन्न होते. या १७ व्या सूत्रात संप्रज्ञात समाधीचा परिचय करून दिलेला आहे. ही संप्रज्ञात समाधी ही वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता या भावांनी युक्त असते.    व्यावहारिक पातळीवरून दैनंदिन जीवनाशी निगडित असे विवेचन करताना मला या सूत्रातल्या संकल्पना आधी समजावून घेणे महत्त्वाचे वाटते.

 

समाधी म्हणजे काय ?

     समाधी’ ही संकल्पना अष्टांग योगातील आठवे / शेवटचे अग म्हणून आपल्याला परिचित आहे. ‘समाधी’ या शब्दाबद्दल, अवस्थेबद्दल जनमानसात आजही एक प्रकारचा आदर दिसून येतो. सर्वसाधारणपणे विभूतीनी कार्यपूर्ती करून आयुष्याला दिलेला पूर्णविराम या ‘समाधी’ संकल्पनेतून व्यक्त होतो. मात्र त्याचबरोबर दैनदिन कामात, आवडत्या कामात, प्राविण्यप्राप्त कामात व्यक्ती तल्लीन झालेली दिसली की आपण त्याची ‘समाधी लागली’ असा शब्दप्रयोग करतो. तसेच कोणत्याही कलेतून अत्त्यूच्च दर्जाचा आनंद मिळत असेल तरी वाचक – श्रोता - प्रेक्षक यांच्या रंगून जाण्यातून, समाधान पावलेल्या भूमिकेतून, वरील शब्दाचा वापर होतो. वरील सूत्राचे विवेचन करताना ही ‘तल्लीनता’ मी स्वत: इथे केंद्रीभूत मानते. स्वाभाविकच कोणत्या तरी गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, एकाग्रता साधून माणूस तल्लीन होत असतो. ज्यावर आपण एकाग्र होतो त्याला योगशास्त्राच्या परिभाषेत ‘आलंबन’ असे म्हणतात. समाधीसाठी स्थूल वा सूक्ष्म आलंबन आवश्यक असते. सर्व तऱ्हेच्या समाधीमध्ये मनाला इतर सार्‍या विषयांपासून दूर करून एका विशिष्ट विषयाच्या – स्वीकारलेल्या आलंबनाच्या - ध्यानात पुन्हा पुन्हा केंद्रित करावे लागते. ओशो लिहितात, ‘समाधान’ या शब्दातून समाधी हा शब्द आला आहे. तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य वाटणारी मनोदशा म्हणजे समाधी.   


संप्रज्ञात समाधी म्हणजे काय ?

     पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथात  डॉ.प.वि.वर्तक लिहितात –“समाधीचे संप्रज्ञात व असंप्रज्ञात असे दोन मुख्य प्रकार संभवतात. समाधी अवस्थेत जाताना जर वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता यांचा संबंध मनाशी असेल तर संप्रज्ञात समाधी लागली असे म्हणतात. संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्यात ज्ञान प्राप्त होते अशी समाधी.

      स्पष्टीकरण करताना ते लिहितात, वितर्क, विचार, आनंद व अस्मिता हे एका पेक्षा एक सूक्ष्मतर असे मनाचे भाव आहेत. कोल्हटकरांच्या स्पष्टीकरणानुसार वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता यांच्या रूपाशी चित्त तदाकार झाल्यामुळे सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मिता असे संप्रज्ञात समाधीचे चार प्रकार होतात. आता या प्रकारांच्या संकल्पना समजावून घेऊ.

१.    सवितर्क संप्रज्ञात समाधी

‘सवितर्क’ हा संप्रज्ञात समाधीचा पाहिला प्रकार आहे. साधक समाधीच्या अभ्यासाला जेव्हा प्रथमच आरंभ करतो तेव्हा त्याला बाह्य / भौतिक सृष्टीतील स्थूल / दृश्य  आलंबनापासूनच सुरुवात करावी लागते. चित्ताच्या आलंबनासाठी स्थूल आभोग असणे हे वितर्काचे रूप होय. जो विशिष्ट तर्क बाळगून त्यावर आपण चिंतन करतो त्याचे सम्यक ज्ञान या प्रकारच्या समाधीत होते.

विचारांच्या अनुषंगाने तर्क – कुतर्क – वितर्क हे शब्द आपण दैनंदिन जीवनात सहजतेने वापरतो. तर्क म्हणजे परिस्थितीनुरूप अनुमान करणे. कुतर्क म्हणजे चुकीचा किंवा नकारात्मक असा तर्क किंवा अनुमान. वितर्क म्हणजे या अनुमानांपैकी विशेष महत्त्वाचे अनुमान होय. अनेक तर्क आपण करीत राहतो व बुद्धीच्या निकषावर घासून पाहतो. या बुद्धीच्या निकषावर टिकणारा तर्क हा वितर्क होय. योगसूत्रावर भाष्य करताना ओशो लिहितात, “संप्रज्ञात समधीचा पाहिला घटक म्हणजे वितर्क. ज्याला आंतरिक शांती मिळवायची आहे त्याला वितर्काचे, विशेष तर्काचे शिक्षण घ्यायला हवे. म्हणजे मग तो नेहमी एखाद्या गोष्टीच्या प्रकाशमान बाजूकडे, विधायक बाजूकडे पाहील.” विचार आणि विचारीपणा यातील फरक स्पष्ट करत ते सांगतात मनातल्या भाऊगर्दीला आपण विचार मानतो पण महामुनी पतंजलीना विचाराचा जो अर्थ अभिप्रेत आहे, तो विचारांचे आंतरिक अनुशासन करणाऱ्या धाग्याचे, त्यात सुव्यवस्थितपणा आणणाऱ्या अंत:सूत्राचे. त्या अंत:सूत्रालाच ते विचार मानतात.         

 स्वामी विवेकानंदांनी ‘राजयोग’ या ग्रंथात वितर्क म्हणजे प्रश्न असे स्पष्टीकरण दिले आहे.  सवितर्क म्हणजे प्रश्नसहित.  या समाधीच्या वेळी या स्थूल भूतामधील सारी शक्ती आणि त्यांच्यात निहीत असलेले सत्य आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून जणू काही आपण त्यांना प्रश्न विचारत असतो.  दैनंदिन जीवनात परमेश्वराच्या नवविधा भक्तिद्वारे साधलेली एकाग्रता अथवा तन्मयता योगशास्त्रातील सवितर्क समाधी होय. चित्तवृत्तीनिरोधाच्या अभ्यासाचा हा  प्रारंभ असतो.

 

२.             सविचार संप्रज्ञात समाधी

‘सविचार’ हा संप्रज्ञात समाधीचा दुसरा प्रकार आहे.  अनेक तर्क वितर्क करून झाले म्हणजे आपण एका विचारावर स्थिर होतो व त्याप्रमाणे वागतो म्हणून त्याला 'विचार' म्हणतात. यात 'चर' म्हणजे 'वागणे' हा धातू आहे. ‘विचार’ हा वितर्कापेक्षा सूक्ष्म व स्थिर असतो. एका विचारावर आपण धारणा करून ध्यान करू लागलो व त्यातच समाधी लागली तर ती ‘सविचार समाधी’ झाली. या विचाराचे उत्तर या समाधीत आपणास मिळते. ‘सवितर्क समाधी’पेक्षा ‘सविचार समाधी’ श्रेष्ठतर आहे. सविचार समाधीत चित्ताला जे आलंबन घ्यावे लागते ते सूक्ष्म असावे लागते. कोणत्याही बाह्य वस्तूची प्रत्यक्ष अपेक्षा न करता मनात ध्येयवस्तूचा विचार येऊन या विचारावरच मन स्थिर करता येऊ लागले म्हणजे ती सविचार समाधी होय. उदाहरणार्थ उपास्य देवतेची मूर्ती पुढे असण्याची आवश्यकता संपली आणि त्या मूर्तीचा नुसता विचार मनात येताच चित्त तदाकार होऊ लागले म्हणजे साधकाचे मन ‘सवितर्का’तून ‘सविचारात’ गेले असे समजावे, हे योगशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे.

 

३.             सानंद संप्रज्ञात समाधी

आपले वितर्क गेले की विचार येतो. विचारही गेले की नुसता आनंद राहतो. नुसता आनंद असणारी स्थिती म्हणजे सानंद समाधी होय. सानंद संप्रज्ञात समाधीचे स्वरूप नीट लक्षात येण्यासाठी आनंद म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो याचा विचार करणं आवश्यक आहे. साधारणपणाने इंद्रियांचा विषयांशी संयोग घडला, एखादी तीव्र इच्छा पूर्ण झाली, चित्तामध्ये शांती आणि समाधान नांदायला लागले म्हणजे चित्तात आनंद निर्माण होतो. अर्थातच आनंदाचे हे तिन्ही प्रकार निरनिराळे आहेत. या तीन प्रकारांमध्ये आनंदाची उत्कटता उत्तरोत्तर अधिकाधिक अनुभवली जाते. आनंदाची अभिव्यक्ती होण्यास चित्ताची सत्त्वारूढता हे प्रमुख कारण आहे. सत्त्वगुण जीवाला सुखसंग आणि ज्ञानसग घडवत असतो. त्यातून माणूस विषयानंदाकडून आत्मानंदाकडे वळायला लागतो. चित्तात सत्त्वाचे प्राबल्य वाढल्याने तेथे आत्मानंद प्रतिबिंबित होतो. चित्ताचे सर्व चांचल्य नाहीसे होऊन आलंबनाची आवश्यकता न उरता चित्तात आनंदाच्या वृत्तीचा प्रशांत प्रवाह वाहू लागला म्हणजे ती सानंद संप्रज्ञात समाधी होय.

 

४.    सास्मिता संप्रज्ञात समाधी

नुसता आनंद असणारी स्थिती म्हणजे ‘सानंद संप्रज्ञात समाधी’ होय. आनंद वाटतो त्या वेळी आपणापाशी द्वैतभाव असतो. तेथे ‘मी’ असतो व ‘आनंद’ असतो. ‘मला आनंद वाटतो’ हा भाव असतो. पण समाधीची याहून पुढली पायरी गाठली की आनंद नाहीसा होतो. आनंद नाहीसा होतो म्हणजे दुःख होते असे नव्हे. दुःख तर विरक्तीतच नाहीसे झालेले असते. आनंद नाहीसा होतो तिथे कुठलीच भावना शिल्लक राहत नाही. भावना शिल्लक नसली तरी भाव शिल्लक असतो. तो भाव म्हणजे मीपणाचा भाव,  अहंभाव, मी आहे’ याची जाणीव. या जाणिवेलाच अस्मिता आहे असे म्हणतात. मी कुणीतरी आहे ही जाणीव या समाधीत असते, म्हणून ती सास्मिता (स + अस्मिता) समाधी होय. अस्मिता आहे म्हणजेच द्वैत आहे. द्वैत आहे म्हणूनच मी आहे. ते आहे व त्याचे मला ज्ञान होत आहे अशी घटना तेथे घडत असते. हे ज्ञान होत असते म्हणूनच ती संप्रज्ञात समाधी होय.


‘संप्रज्ञात’ याचा अर्थ संपूर्णपणे,  सर्व बाजूंनीप्रकर्षाने ज्ञान होणे. ज्ञान होण्याची क्रिया आहे म्हणजेच ‘ज्ञान’, ज्ञेय’ व ‘ज्ञाता’ हे त्रिकुट तिथे आहे. त्यातील 'मी' हा महत्त्वाचा आहे. ‘मी आहे’ ही जाणीव मूलभूत आहे. ‘अस्मिता’ म्हणजे ‘अहंकार नसलेला अहभाव’. ही अस्मिता असली की आनंद होतो. आनंद मिळवण्यासाठीच आपले विचार सतत कार्य करीत असतात. पण हा विचार पक्का होण्यापूर्वी आपण अनेक वितर्क करीत असतो. हे वितर्क अनेक तर्कातून आपण निवडून घेत असतो. म्हणून सामान्य माणूस तर्कामध्ये गुरफटलेला असतो. जसा जसा अभ्यास होत जाईल जाईल तसा तसा तर्कातून वितर्कात, तेथून विचारातमग आनंदात तो जातो. शेवटी आनंदही नाहीसा होऊन केवळ अस्मिता राहते. ही संप्रज्ञात समाधीची शेवटची अवस्था होय.

संप्रज्ञात समाधीत श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होत असते. हे ज्ञान 'मला' प्राप्त होते;  सहाजिकच 'मी'पणा तिथे आहे. म्हणूनच ती अस्मिता असलेली अशी सास्मिता समाधी होय.  ‘राजयोग’ ग्रंथात स्वामी विवेकानंद लिहितात, “ज्ञान ही शक्ती आहे. कोणत्याही वस्तूचे ज्ञान झाले की तिचे आपल्याला नियंत्रण करता येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपले मन सृष्टीतील निरनिराळ्या तत्त्वांचे ध्यान करू लागते तेव्हा त्याला त्यांचे नियंत्रण करता येते. संप्रज्ञात समाधीत प्रकृतीचे दमन करण्याचे सर्व सामर्थ्य अंगी येते.”

‘योग दिनी’ सुरू केलेले विवेचन ‘योगिनी एकादशी’ला पूर्ण होत आहे, या समाधानाच्या काठावर थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्यात १८ व्या सूत्रातील असंप्रज्ञात समाधी जाणून घेण्यासाठी.

                                               वृंदा आशय  
 

 


Monday, 11 October 2021

गुणातीत

                


                                                                           

  गुणातीत

पहाटेचे पाच वाजलेले. रस्त्यावरचे लाईट गेलेले. एक दोन घरांचे दिवे सुरू होते. रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात त्यांचा प्रकाश चमकत होता. बाकी सारे चराचर स्थिर आणि नि:स्तब्ध ! आकाशामध्ये असलेली चांदणी सुद्धा लुकलुकत नव्हती. अंधार दाटलेला. अशावेळी श्री. रवींद्रनाथ टागोर यांची कविता आठवली.

विपत्तिमध्ये तू माझे रक्षण कर

ही माझी प्रार्थना नाही.

विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये

इतकीच माझी इच्छा!......

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन

मी तुझा चेहरा ओळखावा ;

दु:खाच्या रात्री सगळे जग

जेव्हा माझी फसवणूक करेल

तेव्हा तुझ्याविषयी

माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये

इतकीच माझी इच्छा!

काळ्याकुट्ट अंधारातही माझा तुझ्यावरचा विश्वास यत्किंचितही कमी होऊ नये. सगळ्यांनी माझी साथ सोडली तरी तुझ्यावरची माझी श्रद्धा अढळ राहावी, परमेश्वराला केलेली ही प्रार्थना माणसाला संतुलित सामर्थ्य प्रदान करते.

कदाचित संतुलित सामर्थ्याची हीच अपेक्षा व्यक्त करते, महर्षी पतंजलींचे १६ वे योगसूत्र.

तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ||१६||

(सूत्र क्र. १६, समाधिपाद, पातंजल योगदर्शन)

 योगग्रंथांच्या आधारेच आजचे हे सूत्र समजावून घेऊयात. ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये ‘योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर’ सूत्रार्थ स्पष्ट करताना लिहितात, “चित्ताहून पुरुष वेगळा आहे, असा विवेक उत्पन्न होणे ही पुरुषख्याती होय. अशा प्रकारची पुरुषख्याती झाल्यामुळे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांविषयी जे वैतृष्ण्य उत्पन्न होते ते परवैराग्य होय.”

बाराव्या सूत्रांत, अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने चित्तवृत्ती निरोध होतो असे सांगितले. तेरा आणि चौदा या दोन सूत्रात अभ्यासाचे स्वरूप सांगितले. पंधराव्या सूत्रात वशिकार-संज्ञक वैराग्याचे स्वरूप सांगितले. आता असंप्रज्ञात समाधीद्वारा पुरुषख्याती म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यावर जे फलरूप वैराग्य उत्पन्न होते, त्याचे स्वरूप या सोळाव्या सूत्रात सांगितले आहे.

स्वामी आनंदऋषी, ‘पातंजल योगदर्शन – एक अभ्यास’ या ग्रंथात सोळाव्या सूत्राचे स्पष्टीकरण देताना लिहितात,  

“अंतिम वैराग्य म्हणजे ‘पुरुषा’च्या ज्ञानामुळे विकसणारे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांबाबतचे वैराग्य, म्हणजेच गुणवैतृष्ण्य होय. सत्त्व, रज व तम हे तीनही गुण जीवात्म्याला भोगाकडे नेतात. याला भोगार्थता म्हणतात. तम-रज शांत झाले म्हणजे व सत्त्वगुण विकसित झाला, म्हणजे तो सत्त्वगुण जीवात्म्याला, साधकाला कैवल्याच्या दिशेने नेतो. याला अपवर्गार्थता म्हणतात. जीवात्म्याची किंवा चित्ताची भोगार्थता संपून अपवर्गार्थतेची सुरुवात होणे, म्हणजे चित्तवृत्तीनिरोधाची सुरुवात. ही अपवर्गार्थता जेव्हा संपुष्टात येते, तेव्हा त्या अवस्थेला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. 

योगाचार्य कोल्हटकर सांगतातयोग्याचे चित्त असंप्रज्ञात समाधीत वृत्तिशून्य आणि संस्कारशेष अशा भावास प्राप्त झालेले असते. समाधीत ‘तदा द्रष्टु: स्वरूपेSवस्थानम्’ असते. यामुळे आत्मसाक्षात्कार हा येथेच होतो. तरीपण यावेळी चित्त निर्वृत्तिक असल्याने आत्मसाक्षात्काराचा वृत्ती रूपाने परामर्श या अवस्थेत शक्यच नसतो. या असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे प्रारब्धवशात व्युत्थान झाले म्हणजे या अवस्थेचा वृत्तीरूप परामर्श चित्तावर आरूढ होतो. गाढ झोपेत, झोपेतील अनुभवाची वृत्तीरूपाने जाणीव नसते. परंतु उठल्यावर ‘सुखमहमस्वाप्सम’ म्हणजे, मी सुखाने झोपलो असा निद्राकालीन अनुभवाचा स्मृतिरूप परामर्श चित्तात वृत्तीरूपाने उदित होतो. असाच प्रकार असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे उत्थान झाले म्हणजे घडून येतो. म्हणजे असंप्रज्ञात समाधीत जो आत्मसाक्षात्कार घडत असतो, त्याचा परामर्श व्युत्थानदशेत वृत्तिरूपाने होऊ लागतो. मी असंग आहे, सत्य-ज्ञानानंदरूप आहे इत्यादी वृत्तींनी हा परामर्श व्यक्त केला जातो.

‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’, या ग्रंथात डॉ.प.वि.वर्तक लिहितात,‘पुरुष’ म्हणजे परमात्मा. पुरुष या शब्दाची फोड ‘पुरे शेते इति’ - शरीरात झोपलेला तो पुरुष अशी सर्व तज्ञ करतात. पण परमात्मा शरीरात झोपत नाही. तो जागाच असतो. आपण झोपलो तरी आपलं पचन, श्वसन, रक्ताभिसरण, चालू असतं. पंचप्राणांच्या क्रिया चालू असतात. आपली वाढ होत असते. शरीरशास्त्राच्या दृष्टीने परमात्मा झोपत नाही, हे नक्की.

त्यांनी स्वत: पुरुष या शब्दाची फोड, ‘पुरं उषति इती’, अशी केलेली आहे. जो कोणी शरीराचा व्यवहार चालवतो, तो पुरुष. ‘उष्’ या धातूचा अर्थ जीवन कंठणे, जाळणे, पीडणे असा आहे. आपलं शरीर खरोखरच जळत असतं. ऑक्सिजनशी सतत संयोग सुरू असल्यामुळे शरीरात उष्णता असते. आपल्याला या शरीरातच भोग भोगावे लागतात व पीडा सहन कराव्या लागतात. या पीडा देणारा आत्मा शरीरातच वसलेला असतो. आपले सर्व जीवन व्यवहार चालवणारी, शरीरातच वसलेली शक्ती म्हणजे ‘पुरुष’ म्हणजेच आत्मा होय. योग्याला हा आत्मा समजतो. एकदा या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे निर्गुण - निराकार अवस्था कळते. निर्गुण-निराकार अवस्थेतील गोडी कळते आणि मग साहजिकच गुणांबद्दलची ओढ किंवा आदर किंवा आवड कमी होते किंवा नाहीशी होते.

वशीकार-संज्ञक वैराग्य प्राप्त झालेल्या माणसांना व सामान्य माणसांना गुणांबद्दल आदर असतो. गुण हवेहवेसे वाटतात. चांगले गुण मिळविण्याची खटपट प्रत्येकजण करीत असतो. मी दिसायला चांगला असावा, माझी बुद्धी चांगली असावी, मन चांगलं असावं, शरीर चांगलं असावं, मला पत्नी, पुत्र, कन्या चांगल्या मिळाव्या, मित्र चांगले मिळावे, शत्रू चांगले मिळावे, ऐश्वर्य चांगले मिळावे, दृष्टांत चांगला मिळावा, साक्षात्कार चांगला व्हावा, चांगला स्वर्ग मिळावा किंवा अन्य चांगला परलोक मिळावा, अशी प्रत्येकाची तहान असते. पण ही गुणांची तृष्णा सुद्धा नाहीशी होते त्यावेळी परमवैराग्य येते.

आपल्याला हे तत्त्वज्ञान एकदम पटणार नाही कारण आपल्या कल्पना संकुचित असतात. दृष्टीही संकुचित असते. जड सृष्टीच्या, व्यवहाराच्या संकुचित भूमिकेतून सर्व चांगले गुण हवेत, असे वाटते. गुण वंदनीय, स्वीकारार्ह वाटतात. पण एकदाका आत्म्याचा साक्षात्कार झाला की विशाल दृष्टीकोन प्राप्त होतो आणि चांगले चांगले म्हणले जाणारे चांगले असतेच असे नाही व वाईट ठरलेले वाईट असतेच असे नाही, हे कळते. चांगले-वाईट हे भेद मानवी दृष्टिकोनातून झालेले आहेत. आत्म्याला चांगले-वाईट हा भेदच नाही कारण दोन्ही यातूनच उत्पन्न झाले आहे. तो निर्गुण आहे. निर्गुण ही कल्पनाच आपणाला पेलत नाही. गुण नसणे म्हणजे काय, काहीतरी गुण असणारच, असे सामान्य माणसाला वाटते पण निर्गुण ही अवस्था खरोखरच असते. त्या अवस्थेत सर्व गुण एकत्र असतात. हे मनाला पटणारे पण बुद्धीला गोंधळात टाकणारे विवेचन स्पष्ट करताना डॉ. वर्तक उदाहरण देतात, थंडी व उष्णता हे दोन भिन्न गुण आहेत असं आपण मानतो. 

पण खरी तशी स्थिती नाही. 100डिग्री सेंटीग्रेड म्हणजे परम उष्णता असे आपण मानू. उणे 100  डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे कमाल थंडी असे आपण मानू. या दोन्ही स्थिती + 100 अंश सेल्सिअस आणि - 100 अंश सेल्सिअस = शून्य अंश सेल्सिअस इतके तापमान होईल. हीच शून्यावस्था, हीच निर्गुण अवस्था. याच शून्य अवस्थेच्या एका बाजूस उष्णता तर दुसर्‍या बाजूस थंडी असते. म्हणजे शून्यातूनच दोन्ही गुण निर्माण होतात. 100 फूट उंच व 100 फूट खोल हे दोन भिन्न गुण आहे, असं आपण मानतो. 

पण दोन्ही एकत्र केले तर उंचवटा नाहीसा होईल व खड्डाही नाहीसा होईल. म्हणजेच समानता येईल. या समानतेला निर्गुण शून्यावस्था म्हणतात. यातूनच एका बाजूला ढीग व दुसऱ्या बाजूला खड्डा निर्माण होतो. हीच कल्पना सूक्ष्म करून सर्व गुणदोषांना लावली म्हणजे, निर्गुणाची कल्पना येईल. शीत–उष्ण, उंच-सखल, प्रकाश-अंधार, धन-ऋण, सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन इत्यादी सर्व द्वंद्व एकत्र केली म्हणजे, जे होईल ते निर्गुण होय. निर्गुणातूनच ही द्वंद्वे बाहेर पडलेली आहेत. या निर्गुण आत्म्याचा एकदा साक्षात्कार झाला की खरे ज्ञान होते. हे सत्य ज्ञान झाले की कुठल्याच गुणाबद्दल ओढ राहत नाही. मला हा गुण प्राप्त व्हावा अशी तृष्णा राहात नाही. अशा गुणाचा माणूस किंवा प्राणी मला जास्त आवडतो, अशी वृत्ती राहत नाही. सर्व गुण सारखेच असा समभाव निर्माण होतो. या स्थितीलाच गुणवैतृष्ण्य किंवा गुणांबद्दलची विरक्ती, असं म्हणलं आहे.

 दैनंदिन, व्यावहारिक जीवनात निर्माण होऊ शकणारा एक धोकाही डॉ. वर्तक स्पष्ट करतात, गुणांबद्दलची विरक्ती याचा अर्थ कुठल्याच गुणाबद्दल विशेष प्रेम राहत नाही पण याचा अर्थ सद्गुणांबद्दल द्वेष व दुर्गुणांबद्दल प्रेम, असा नव्हे. तरीही दुर्दैवाने तसा अर्थ केला जातो. ही विरक्ती आली की स्वच्छतेबद्दल विशेष आवड राहत नाही. पण मुद्दाम स्वच्छ जागा सोडून उकिरड्यात राहायचं असं नाही. खरी परम विरक्ती ज्याला प्राप्त होईल तो असेल त्या जागी आनंदात राहील. मग तो राजवाडा असो की उकिरडा असो. त्याला मिळेल ते अन्न तो आनंदाने खाईल; मग श्रीखंड असो की अंबोण असो. परम विरक्त ज्ञानी एखाद्या संतावर प्रेम करेल, तेवढेच दुष्टावरही प्रेम करेल. 

पण संतांकडे दुर्लक्ष करून दुष्टाला जवळ करणार नाही. दुष्टाकडून सुद्धा परब्रह्माचे कार्य होत असते हे त्याला कळते एवढेच. खरा परम विरक्त मनुष्य स्वर्ग लोकाचीही अभिलाषा धरत नाही. मला स्वर्ग मिळावा किंवा ब्रह्मलोक मिळावा अशी इच्छा सुद्धा त्याच्या मनात निर्माण होत नाही. ही श्रेष्ठतम विरक्ती होय. अशी विरक्ती मिळवण्याचा सतत प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वामी आनंद ऋषी सांगतात-जेव्हा त्रिगुणांची भोगापवर्गार्थता संपते तेव्हा योग्याला त्रिगुणांविषयी एक अलिप्तता वाटते. अंतर्यामीच्या दृष्ट्या पुरुषाच्या अनुभूतीमुळे ही अलिप्तता किंवा गुणवैराग्य प्राप्त होते. ही असंप्रज्ञात समाधीची सुरुवातीची सबीज अवस्था असते. आता कैवल्य अवस्थेला नेणारी निर्बीज समाधी किंवा धर्ममेध समाधी फारशी दूर नसते. अंतिम निर्बीज असंप्रज्ञात समाधी-अवस्था त्रिगुणातीत असते. 

सामान्य भाषेत सांगायचं तर म्हणता येईल की या गुणांविषयीच्या विरक्तीत अवगुणांविषयीची विरक्तीही सामावलेली आहे.  त्रिगुण जातात ते त्यांच्या दोन्ही बाजूंसकट जातात. त्यामुळे खऱ्या विरक्त माणसाची नेहमी सहजावस्था असते. तो सहजतेने जगतो, यदृच्छेने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टींचा तो स्वीकार करतो.

सूत्राच्या विवेचनाने एक समाधान मनात पसरले आणि मन आपोआप बा. भ. बोरकरांचे गीत गुणगुणू लागले –

 

झिणिझिणि वाजे बीन

सख्या रे, अनुदिन चीज नवीन .....

अलख निरंजन वाजविणारा

सहजपणांत प्रवीण !

 वृंदा आशय

 

 

 

 

Monday, 4 October 2021

प्रत्यय कृष्णसुखाचा !

 



                                             कवी - अनामिक

प्रत्यय कृष्णसुखाचा !


         पहाटेचे साडेचार वाजले की, अंगणाची ओढ लागते. त्या ओढीकडे दुर्लक्ष करून, समोरच्या पुस्तकात लक्ष घालून कितीही वाचू म्हणलं, तरी लक्ष लागत नाही. प्रयत्न केला तरी ते  शक्य होत नाही. तो मन खेचून घेऊन जातो, मग पावलं वळायला कितीसा वेळ लागणार ?

     दार उघडून अंगणात गेले. पावसाळी वातावरण. सारी सृष्टी सांद्र झालेली. फांद्या, पानं, फुलं जागच्याजागी डोलून स्वतःचा आनंद व्यक्त करत होती. सृष्टीत भरून राहिलेल्या कृष्णाला पाहून आनंदित होणारी ही फुलं-पानं मोठी मनमोहक दिसत होती. नुकतंच दीर्घश्वसन झालेलं होतं. त्यामुळे पारिजातकाचा सुगंध खोलवर गेला. कृष्ण–रुक्मिणी-सत्यभामा सगळ्यांची त्या सुगंधानं आठवण करून दिली. इतक्यात चांदीपाटाचं फूल आपसूक गळून पडलं. झाडावरचं फूल पडताना निवांतपणं पाहण्यात, काय सौंदर्य साठवलेलं आहे, याचा प्रत्यय घेतला. या सगळ्या सृष्टीत भावोत्कट झालेली मी कृष्णचरणी समर्पित झाले आणि नंतर क्षणात तटस्थता अनुभवली. अनुभवाच्या या दोन टोकांनी, मी चकित झाले. पण त्याचं काम त्यानं केलेलं होतं. कृष्णार्पणमस्तु!

     वळूयात महामुनी पतंजलीच्या पंधराव्या सूत्राकडे. सूत्र आहे वैराग्याचे. वैराग्य हे वृत्तीत असते. देवाने जे दिले त्यात समाधान मानून इतर काही मिळण्याची इच्छा न होणे, म्हणजे वैराग्य होय. श्रीमद्भगवद्गीता (६.३५) आणि  योगसूत्रे  यांमध्ये (१.१२) चित्ताच्या सतत उत्पन्न होणाऱ्या वृत्तींना निरुद्ध करण्याचे दोन उपाय सांगितले आहेत – अभ्यास आणि वैराग्य. ज्याप्रमाणे नदीला बांध घालून तिचे पाणी योग्य दिशेला वळविता येऊ शकते, त्याचप्रमाणे अनर्थकारी विषयांकडे जाणाऱ्या चित्ताला वैराग्याद्वारे नियंत्रित केले जाते व अभ्यासाद्वारे योग्य मार्गाकडे नेले जाते. ज्ञानसहित वैराग्य हेच कैवल्य उत्पन्न करते हा गर्भितार्थ स्पष्ट करणारे १५ वे सूत्र पुढीलप्रमाणे -

 

दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् || १५||

( पातंजल योग, समाधिपाद, सूत्र क्रमांक १५ )

याचा सूत्रार्थ सांगताना योगाचार्य कोल्हटकर सांगतात, “ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव घडला ते दृष्ट विषय आणि शास्त्रादिकांवरून जे समजले ते आनुश्रविक विषय होत. या दोनही प्रकारच्या विषयांविषयीं जी तृष्णा म्हणजे आसक्ती ती ज्याच्या चित्तातून नाहीशी झाली आहे अशा वितृष्ण पुरुषाचें विषयाविषयी जे वैतृष्ण्य म्हणजे वैराग्य ते वशीकारसंज्ञक  वैराग्य होय.”

या विषयात दृष्ट विषय आणि आनुश्रविक विषय असे दोन प्रकार आहेत. (दृष्ट आणि दुष्ट हे दोन शब्द पूर्णत: निराळे आहेत, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.) दृष्ट म्हणजे इंद्रियांच्या द्वारा ज्यांचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष येथे घेता येतो आहे, असे शब्द, स्पर्श, इत्यादी भोग्य पदार्थ. आनुश्रविक म्हणजे शास्त्र, परंपरा, आप्त यासारख्या विश्वासार्ह व्यक्ती, इत्यादिकांकडून ऐकून माहीत झालेले स्वर्ग, अमृतयासारखे विषय. सामान्य माणसांच्या अंत:करणात या दोनही प्रकारच्या विषयांसंबंधी 'हे विषय उपभोगार्थ मला मिळावेत’ अशा प्रकारची तृष्णा असते.

मराठी विश्वकोशामध्ये याचा संदर्भ मोठा छान स्पष्ट केलेला आहे. त्यातील नोंदीत,  समीक्षक : कला आचार्य’ लिहितात,  योगसूत्रांमध्ये (१.१५, १.१६) दोन प्रकारच्या वैराग्याचे वर्णन केले आहे – अपरवैराग्य आणि परवैराग्य. अपरवैराग्य म्हणजे योगसाधनेच्या प्रारंभिक स्थितीमध्ये असणारे वैराग्य होय. दृष्ट म्हणजे लौकिक जगतातील अन्नपान, स्त्रीसुख इत्यादी भौतिक विषयांप्रती आणि आनुश्रविक म्हणजे अलौकिक जगतातील स्वर्ग, अप्सरा  इत्यादी दिव्य विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होणे म्हणजे अपरवैराग्य होय.

वाचस्पती मिश्र आणि विज्ञानभिक्षु या व्याख्याकारांनी अपरवैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत – यतमान, व्यतिरेक, एकेन्द्रिय आणि वशीकार. योगी क्रमाने या चार अवस्थांना पार करतो.

(१) यतमान : सामान्यत: राग, लोभ इत्यादी चित्तातील विकारांमुळे इंद्रिये नेहमी विविध विषयांकडे आकृष्ट होत असतात. ती आकृष्ट होऊ नये या दृष्टीने केला जाणाऱ्या प्रयत्नांचा आरंभ म्हणजे यतमान अवस्था होय. या अवस्थेमध्ये संपूर्ण वैराग्य साध्य होत नाही, परंतु वैराग्यभावना उत्पन्न होण्याच्या दृष्टीने योग्याची वाटचाल सुरू होते.

 

(२) व्यतिरेक : विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्न केल्यावर काही वस्तू अथवा विषयांच्या बाबतीतील राग, लोभ इत्यादी दोष नष्ट होतात; परंतु अन्य काही वस्तूंप्रती योग्याच्या मनात राग, लोभ अजूनही शिल्लक असतो. कोणत्या विषयासंबंधी दोष नष्ट झाले आहेत व कोणत्या विषयासंबंधी अजून शिल्लक आहेत, याचे तटस्थ भावनेने परीक्षण करणे ही वैराग्याची व्यतिरेक अवस्था होय.

 

(३) एकेन्द्रिय : बाह्य इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त झाल्यावर ती इंद्रिये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांप्रती आसक्त होत नाहीत. परंतु, पूर्वकाळातील अनुभवांमुळे चित्तामध्ये सुप्त रूपाने राहिलेले ते रागादि दोष अजूनही संस्कार रूपाने विद्यमान असतात व पुन्हा जागृत होण्यासाठी उत्सुक असतात. मनाद्वारे त्या सुप्त संस्कारांचे व्यवस्थापन करणे व पुन्हा त्यांना जागृत होऊ न देणे ही वैराग्याची अवस्था म्हणजे एकेन्द्रिय होय. मनरूपी एकाच इंद्रियाद्वारे रागदोषावर नियंत्रण केल्यामुळे या अवस्थेला ‘एकेन्द्रिय’ अशी संज्ञा आहे.

 

(४) वशीकार : ज्यावेळेस बाह्य इंद्रियेही विषयांपासून विरक्त होतात, चित्तातील सुप्त संस्कारही जागृत होऊ इच्छित नाहीत आणि योग्याचे चित्त पूर्णपणे वैराग्यभावनेने युक्त असून त्याच्या नियंत्रणातही असते, त्या अवस्थेला वशीकारनामक वैराग्य असे म्हटले जाते.

वरील चार अवस्थांमध्ये ‘वशीकारसंज्ञक वैराग्य’ हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पतंजली ऋषींनी सूत्रामध्ये फक्त वशीकार वैराग्याचाच नामोल्लेख केलेला आहे. कारण अन्य तीन प्राथमिक अवस्थाही त्यात गृहीतच आहेत.जीवनात तीव्र दु:खाचा अनुभव आल्यावर व्यक्तीच्या मनात काही काळापुरते वैराग्य उत्पन्न होते, परंतु ते तात्कालिक आणि नैमित्तिक असल्यामुळे योगसाधनेमध्ये त्याला महत्त्व नाही. चित्तामध्ये वैराग्याची भावना दृढ झाल्यावरच सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते व चित्तवृत्ती निरोधाद्वारे कैवल्य अवस्था प्राप्त होते, असे योगदर्शन मानते.

योगाभ्यासास प्रवृत्त झालेला विवेकी मनुष्य अशा विषयांविषयी वितृष्ण झालेला असतो. विवेकाच्या तारतम्याने वैराग्याच्या स्वरूपात आरंभीच्या प्रयत्नापासून तो वैतृष्ण्यरुपी अंतिम सीमा गाठली जाईपर्यंत या उत्तरोत्तर श्रेष्ठ अवस्था प्राप्त होत असतात. त्या चार असून त्यातील सर्वात श्रेष्ठ अशी अवस्था म्हणजे वरील ‘वशीकारसंज्ञक वैराग्य’ होय.

वैराग्य हे वृत्तीतच असते, हे स्पष्ट करणारी एक कथा अगदी थोडक्यात पाहूयात. एक आश्रम होता. गुरूंची गादी चालवण्यासाठी योग्य शिष्याची निवड त्याठिकाणी करायची होती. गुरुजींनी सगळ्या शिष्यांना आधीच सांगितलेलं होतं, “ नियमांचे पालन काटेकोरपणे करणा-यालाच गादीचा वारस होता येईल.”  नियमांचे शक्य तेवढे कडक पालन करत, आता कोणाला हा वारसा मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात होती.

 एकदा हे सगळे शिष्य दूरवरच्या नदीकाठी फिरायला म्हणून गेले. नदी ओलांडताना एका स्त्रीनं त्यांची मदत मागितली. तिलाही नदी ओलांडून जायचं होतं. तिला पलीकडे नेणार कसं?, हा प्रश्न होताच. शेवटी त्या एका शिष्याने त्या स्त्रीला आपल्या पाठीवरती घेतलं आणि नदी पार करून दिली. बाकी शिष्य मनातल्या मनामध्ये आनंदित झाले, की वारसा हक्काच्या गादीतून हा वगळला गेला.

चार दिवसांनी गुरुजींनी सर्वांना बोलावलं. गादीचा वारस नेमला गेला. पाठीवरती महिलेला घेऊन नदी ओलांडणाऱ्या शिष्याचीच वारस म्हणून नेमणूक झाली. सगळेच आश्चर्यचकित झाले. सरतेशेवटी गुरुजींना प्रश्न विचारला, “तुम्ही या शिष्याची निवड कशी काय केली? आपल्याकडे स्त्रीचा स्पर्श, स्त्रीचे चिंतन वर्ज्य  मानले जाते. यांनी तर परवा एका महिलेला पाठीवरती घेऊन नदी ओलांडून दिली.” गुरुजींनी स्मित केलं आणि ते एवढेच म्हणाले, “त्याने त्या महिलेला नदीपल्याड सोडून दिलं, तेव्हाच सोडून दिलं; पण तुम्ही मात्र तिला इथपर्यंत घेऊन आलात आणि गेल्या चार दिवसांपासून तुमच्या मनामध्ये तिला वागवत आहात.”

वैराग्य म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे तर कर्माची जाणीव न होता पूर्ण कर्म करणे. वैराग्यामध्ये सामर्थ्य अपेक्षित आहे. हा देश  संन्याशांनी चालवलेला आहे. ऋषी-मुनींनी जंगलामध्ये तप करून संसार कसा असावा, याची सूत्रं आखून दिलेली आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या  भूमिकेतून वैराग्याने नि:संग कर्तव्यपूर्ती केलीच पाहिजे.
     वैराग्य  वैर आणि प्रेम यांच्या पलीकडे जाणारे असते.कोणाशीही नीतीने वागू शकणारा तो विरागी असतो.राग म्हणजे आसक्ती तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही तर अभावरूप आहे. 

श्रीकृष्णांनी सांगितलं, उपभोगून पलीकडे गेल्यावर येणारं वैराग्य असंच सृष्टीसारखं ओलं, स्निग्ध, सांद्र असतं. त्यात रुक्षता, कोरडेपणा, रखरखीतपणा येत नाही. उपभोगताना तन्मय होऊन उपभोगावे आणि उपभोगून झाल्यावर क्षणभरही तिथे अडकू नये. नि:संग, निरामय होऊन पुढे चालावं. हातावेगळं केलं की मनावेगळं करावं,वैराग्य  यापेक्षा निराळं ते काय असणार? अनुरागात, रागात आणि वैराग्यात सर्वत्र कृष्णच आहे.त्याला शरण गेले की कृष्णसुखाचा प्रत्यय येतो.

हे सर्वव्यापी श्रीकृष्णा, तुझ्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन, तुझे नाम धारण करण्याची अनुमती दे, हीच प्रार्थना! 

कृष्णसखी,

वृंदा आशय

 

  

Sunday, 12 September 2021

जागर संकल्पांचा !

 





जागर संकल्पांचा !


    पहाटे अंगणात जाणं हा आता माझा परिपाठ झाला आहे. सृष्टीची अपार शांती हृदयात भरून घेतल्याशिवाय तुमच्याशी बोलताच येत नाही मला. दारी फुललेला चांदीपाट, बहरलेला प्राजक्त मला धुंद करतो आहे. आकाशीचे नक्षत्र आणि फुलातलं साधर्म्य, ‘नक्षत्र माझ्या दारी आल्याचं’ सुख देत आहेत. दारी ‘मोती पोवळ्यांच्या राशी’ असं म्हणणाऱ्या बहिणाबाई आतमध्ये साद घालत आहेत. ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती’ असं म्हणणारे, कवी  कुसुमाग्रज पुन्हा जागे होत आहेत. कविराज आपल्या शब्दांनी, कल्पनांनी, प्रेमाच्या, पराक्रमाच्या उदात्त भावनांनी आमच्यातला वाचक घडवला. नाशिकला तुमच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं, तेव्हा अपार तृप्तीचा अनुभव घेतला. कविवर्य तुम्हाला वंदन !  तुमच्याच प्रेरणेतून सांगते, ‘नक्षत्रांचे गुज गवसले हाती, अक्षरांचा संग त्याला लाभणार आहे’. प्रिय वाचकांनो किती विषयांवर भरभरून बोलावं वाटतं मला तुमच्याशी. कृष्णसखी होऊन अभंगांबद्दल बोलत राहावं वाटतं. ज्या कवितांवर मी आयुष्यभर प्रेम केलंय, त्या कवितांचे विवेचन घेऊन तुमच्याकडे यावं वाटतं. येईल, निश्चितच लवकर येईल !

‘जनी जनार्दन’ म्हणणारे संत मला दिसतात. काय ‘जनी जनार्दन’ एका विशिष्ट काळातच होता का? नाही. तो कालातीत आहे. तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. ‘जन हे वोळतु जेथे’ म्हणणारे शरच्चंद्र मुक्तिबोध मला भावतात. सामान्य जनांनी आपलं सामर्थ्य पणाला लावलं, म्हणून स्वतंत्र झालेली भूमाता मला दिसते. म्हणूनच आज, जेव्हा बुद्धिदाता गणेश आणि माय, माता महालक्ष्मी अधिष्ठित झालेले आहेत तेव्हा त्यांना आशीर्वाद मागते, देवी सरस्वतीची उपासना अखंडपणे करण्याची अनुमती मला द्या. मायमाऊली हृदयी वसते, डोळे मिटता सर्वत्र दिसते! हे देवा, हे संपूर्ण जीवन प्रार्थना होऊन जाऊ दे !

 

आज आपण महर्षी पतंजलींच्या तेराव्या आणि चौदाव्या सूत्राचा एकत्रित विचार करणार आहोत. पाहता पाहता १२ सूत्र झाली. बारा हा अंक तपाचा निदर्शक. तुमच्यामुळे हे तपाचरण शक्य झालं. तुमच्या साथीनं घडलं. म्हणून त्याचा आनंद मी तुमच्याजवळ व्यक्त केला पाहिजे. काय घडलं नाही या तपाचरणात? नियम पालनापासून सुरुवात केली आणि थेट श्रीकृष्ण दर्शनाच्या सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचलो. योगसूत्रांची ही ताकदच निराळी. स्वतःकडे पाहायला लागलं की परब्रह्म आपसूक भेटते. परब्रह्माच्या दर्शनानं आपणही नि:शब्द झालात. आपला प्रवास प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतो. उत्सवी शब्दांनी, अभिनंदनीय शब्दांनी सुरू झालेला हा तुमचा प्रवास मोठ्या वेगात आणि जोशात चालू होता. पण त्या श्रीकृष्णाचे दर्शन घडताच आपणही थबकलात. इतकी प्रामाणिक प्रतिक्रिया ! सर्व सहप्रवाशांची मी कृतज्ञ आहे !

तत्र स्थितौ यत्नोSभ्यास: ||१३||

(सूत्रार्थ - निरोधात चित्ताची स्थिरता साधण्यासाठी केला जाणारा जो यत्न तो अभ्यास होय.)

१३ व्या सूत्राच्या विवेचनात योगाचार्य कोल्हटकर म्हणतात, “पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय हे निरोधाचे स्वरूप होय. एकाग्रतेच्या अभ्यासाने अंत:करणात हे सामर्थ्य विकसित होते. अंत:स्फूर्त सामर्थ्याने क्षणमात्र घडलेल्या निरोधाचा सुद्धा चित्तावर संस्कार घडत असतो. हा संस्कारानुभव अंत:स्फूर्त सामर्थ्याला उपकारक ठरतो. निरोधाचा क्षणाक्षणाने वाढता अभ्यास निरोधकाल वाढवतो. सुरुवातीला खंडित होत जाणारा हा निरोधकाल वाढत्या अभ्यासाने अखंडित होत जातो.”  

‘अभ्यास’ या संकल्पनेबद्दल आपण मागच्या सूत्रात विस्तृत संवाद साधला. त्यामुळे आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत १४ व्या सूत्राकडे. ‘अभ्यास कसा करावा’, याकडे.

 

स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि: || १४ ||

(सूत्रार्थ – पण तो अभ्यास दीर्घकाल, खंड न पडता, आणि आदरपूर्वक केला म्हणजे तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो.)

हे १४ वे सूत्र मला खूप आवडते. त्यामुळे मी ते अनेक ठिकाणी उद्धृत करत असते. का माहीत नाही, पण कदाचित माझ्या स्वतःमध्ये या गोष्टींचा अभाव असल्यामुळे ते मला अधिक भावत असेल. बऱ्याच वेळेला काय होतं जे आपल्याकडे नसतं त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. आणि मग त्या गोष्टीबद्दल आपण भरभरून बोलायला लागतो. असो. इथे अभ्यास म्हणजे यत्न, प्रयत्न आणि हा प्रयत्न ज्यातून प्रत्यक्ष व्यक्त होतो ते कर्म लक्षात घेऊन पुढील विवेचन केलेले आहे.  

आपले १४ वे योगसूत्र सांगते, दीर्घकाल आणि निरंतर केलेला अभ्यास सार्थकी लागतो. हे थोडसं आपण विस्तारानं पाहू. यात दीर्घकाळ म्हणजे किती दीर्घकाळ? साधारणपणाने आपण पाहतो, प्रत्येक कामाचा एक विशिष्ट असा वेळ ठरलेला असतो. तितक्यावेळ ते काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं दैनंदिन जीवनात तो, दीर्घकाळ ही संकल्पना साधण्याचा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ एक घास बत्तीस वेळा चावून खावा, साधारणपणे ४५ मिनिटे व्यायाम करावा, दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आवश्यक तो वेळ देत आपण प्रत्येक काम पूर्ण केले पाहिजे. दीर्घकाळ याचा अर्थ उगाच थांबत थांबत, कंटाळा करत, आपल्या दैनंदिन भाषेत ‘टाईमपास करत’ असा काहीही होत नाही. उलट ज्या गोष्टीला जो काळ आवश्यक आहे, त्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने आपण काम केले पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो.

 हे काम निरंतर करावे असे महर्षी सांगतात. निरंतर म्हणजे काय, तर सातत्याने. उदाहरणार्थ आमचे विद्यार्थी मित्र परीक्षा जवळ आली की दीर्घकाळ अभ्यास करतात. दीर्घकाळ म्हणजे त्यांच्यासाठी परीक्षेच्या पेपरच्या आदल्या दिवशीची रात्र. निरंतर या संकल्पनेमध्ये हा धोका टाळणे कुठेतरी महर्षींना अपेक्षित असावे. ‘निरंतर’ या संकल्पनेचा अर्थ विशिष्ट अभ्यासाच्या संदर्भाने लक्षात घेताना तो अभ्यास वर्षभर करायचा, असं सांगता येईल. ज्या अभ्यासक्रमाला, ज्या कोर्सला आपण प्रवेश घेतलेला आहे, त्या कोर्सचा अभ्यास त्याच्या निहित कालात, सातत्याने करणे, दररोजचा काही ठराविक वेळ त्यासाठी बाजूला काढणे आणि दररोज तो अभ्यास करणे असा ‘निरंतर’ याचा अर्थ होतो. योगाभ्यास निरंतर करायचा म्हणजे काय, तर दररोज पाऊण तास आपण योगाभ्यास केलाच पाहिजे. दुर्दैवानं सध्या आपली योगाभ्यास ही संकल्पना ‘योग म्हणजे आसन प्राणायाम’ इतकीच मर्यादित आहे. जेव्हा आपण योगाची आठ अंग समजून घेऊ शकू, त्या वेळेला ‘योग म्हणजे जीवन आहे’ आणि जीवनभर हा अभ्यास निरंतर करत राहायचा असतो, म्हणजे काय, हे आपल्याला लक्षात येईल.

निर् + अंतर असा या शब्दाचा विग्रह होतो. निर् हा उपसर्ग अंतर या शब्दाला लागलेला दिसून येतो. निरंतर जिथे अंतराचा अभाव आहे, म्हणजेच एकदा जे काही ठरवलं ते सातत्याने आपण केलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो भाग बनला पाहिजे. त्याने काय होईल तर आपल्याला ती ‘सवय’ लागेल. वयासह, वयासोबत जी वाढते ती सवय. आपली सवय आपला स्वभाव घडवत असते. ज्या सवयी आपण स्वतःला लावत असतो त्या सवयीबद्दल आपण किती जागरूक राहणं आवश्यक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. समजतं.

 सवयीने आपण अनेक गोष्टी आपसूक करत असतो. काही वेळेला तिथे सजगता नसली तरीसुद्धा सवयीने त्या घडून जातात. मग आपल्या स्वभावावर, स्वतःच्या घडण्यावर, स्वतःच्या अस्तित्वावर जी इतकी परिणामकारक ठरते, त्या सवयीच्या बाबतीत आपण किती जागरूक राहिले पाहिजे ! डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, “तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतील.” हे साहजिकच आहे. सवय स्वभाव घडवते, स्वभाव कर्तृत्व घडवतो. स्वाभाविक रित्या हे कर्तृत्व हेच आपलं भविष्य घडवणार आहे. आपल्या कृतीच्या मुळाशी आपण केलेला विचार असतो. तो विचार आपल्या कृतीला प्रभावित करत असतो. म्हणून आपण सातत्यानं, निरंतर  सकारात्मक विचार का केला पाहिजे याचंही कोडं, आपल्याला इथे उलगडतं.

निरंतर याचा अर्थ आपल्याला कळाला. आता सत्कारपूर्वक किंवा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारचा उल्लेख महर्षी का करतात? आदर, सत्कार हे शब्द आपल्याला तसे औपचारिक वाटतात. काही विशिष्ट औपचारिक प्रसंगांच्या वेळेलाच आदर - सत्कार करायचा असतो, अशी आपली स्वाभाविक धारणा असते. मात्र आपण आपल्या जीवनाची जी भूमिका निश्चित करत आहोत, ज्या सवयीतून, दृष्टिकोनातून आपण स्वतःला घडवत आहोत, स्वभाव घडवत आहोत, त्यातून कर्तृत्व साकारत, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर दैनंदिन जीवनाचा आपल्याला आदर वाटला पाहिजे.

दैनंदिन जीवनाकडे आपण ज्या श्रद्धेने, ज्या निष्ठेने पाहू शकू ती श्रद्धा आणि निष्ठा आपल्यातली ही सत्कारपूर्वकता जोपासणारी आहे. आणि मग त्या भूमिकेतून जेव्हा आपण स्वीकारलेल्या कामाकडे, करत असलेल्या कर्तव्याकडे पाहू शकतो, तेव्हाच ते कर्तव्य परिपूर्ण होऊ शकतं. आपण त्याकडे त्राग्याने, वैतागाने, हे माझ्याच वाट्याला का?, मला करायचं नाही पण मला करावं लागतं, अशा भावनेतून जर पाहायला लागलो तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, आपल्या वर्तमानावर, आपल्या सभोवतालावर, आपल्या संपर्कातील व्यक्तींवर झाल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचा वर्तमान हा असा कटकटीचा, तापदायी असतो, त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कारण वर्तमान क्षण, पुढच्या क्षणाला इतिहास झालेला असतो. जिथे इतिहास प्रेरक असतो, तिथे  भविष्य उत्तम, उज्ज्वल घडू शकतं. प्रेरणा माणसाला नेहमी अधिक सकारात्मकतेकडे आणि ऊर्ध्वगामी नेत असते. हा प्रगतीकडचा प्रवास आपल्याला करायचा असेल, तर तो दीर्घकाळ, निरंतर आणि सत्कारपूर्वकतेने, आदराने, आस्थेने केला की या सगळ्याचं एक दृढ अधिष्ठान तयार होतं.

जिथे अधिष्ठान दृढ असतं, त्या दृढ अधिष्ठानाला काळाचं, परंपरेचं, पिढ्यापिढ्यांच संचित लाभत असते. हे संचित, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य हे आपल्या वर्तमान क्रिया प्रतिक्रियांवर प्रभाव टाकत असतं. त्यामुळे असा दृढतेने केलेला अभ्यास निश्चितच फलदायी होतो, याबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

अशी दृढभूमी, दृढ अधिष्ठान घडवण्यामध्ये केवळ आपलाच सहभाग असता तर ती कदाचित लवकरही झाली असती. मात्र या प्रक्रियेवर आपला सभोवताल प्रभाव टाकत असतो. आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, ज्या ठिकाणी वावरतो अशा सर्व ठिकाणची माणसं या ना त्या प्रकाराने आपल्याशी संबंधित असतात. तिथले नियम, तिथल्या योजना, तिथल्या धारणा या सगळ्याच गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच कुठलाही अडथळा आला तरी त्याचं संधीत रूपांतर करत आपण दृढ राहणं गरजेचं असतं. अशा संघर्षातून निर्माण झालेली दृढभूमी अढळपद प्राप्त करते. त्यासाठी पॉन्डिचेरीच्या माताजींनी दिलेला संदेश अनुसरावा लागतो -

Do not aim at success. Our aim is perfection. - The Mother .

वृंदा आशय

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...