(दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग
पुनश्च हरि ॐ !
जागतिक योग दिनाच्या आपल्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गेल्या वर्षी याच दिवशी 'योग रहस्य' या ब्लॉग अंतर्गत योगसूत्रांच्या
विवेचनास प्रारंभ केला होता. एकूण १६ सूत्रे गतवर्षी पाहिली. आजही त्या लिंकवर
जाऊन आपण सर्व सूत्रांचे विवेचन वाचू शकता.व्यस्ततेमुळे मध्ये त्यात खंड पडला
होता. आजच्या ‘योग दिनी’ या ब्लॉगचा पुन्हा प्रारंभ करत आहे. दर महिन्याला किमान
एका सूत्राचे विवेचन करावे आणि ते दर २१ तारखेला किंवा त्या आठवड्यात
प्रकाशित करावे असा मानस आहे.
मध्ये खंड पडला होता तरी आपण सर्व सोबत आहातच या आत्मविश्वासाने हे पाऊल उचलत आहे.
आज माझ्या दिवसाची सुरुवात सुंदर झाली. सरस्वती भुवन
शिक्षण संस्थेच्या लाल मैदानात योग वर्ग घेऊन सुरू होणारा दिवस किती आनंददायी आणि
साऱ्या योग आठवणींना उजाळा देणारा असू शकतो याचा सुरेख प्रत्यय घेतला. त्रिवार
ॐकार, गुरुवंदन आणि महर्षी
पतंजलींना केलेले वंदन, मला जवळपास २५ वर्षांच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेले. आयुष्याला
कलाटणी देणाऱ्या योग शास्त्राविषयी त्यानिमित्तानं कृतज्ञता व्यक्त करता आली. ती
कृतज्ञता मनात ठेवूनच वळत आहे पतंजली महामुनींच्या सतराव्या सूत्राकडे –
वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात्
संप्रज्ञात: ||१७||
( समाधीपाद, सूत्र क्र. १७, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि
सविवरण पातञ्जल योगदर्शन - कृष्णाजी केशव कोल्हटकर )
सूत्रार्थ - संप्रज्ञात समाधीसाठी
चित्ताला स्थूल आलंबन असणे हे वितर्काचे रूप, सूक्ष्म आलंबन असणे हे विचाराचे रूप, सत्त्वगुणाची सुखात्मता आलंबन असणे
हे आनंदाचे रूप आणि मी आहे एवढेच केवळ स्फुरण आलंबनार्थ असणे हे अस्मितेचे रूप .
या चारांच्या रूपांशी चित्ताचा जो अनुगम म्हणजे चित्ताची तदाकारता तिच्या योगाने
सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असा चार
प्रकारचा संप्रज्ञात समाधी होतो.
सोळाव्या सूत्रामध्ये गुणवैराग्याचा परिचय आपण करून
घेतला. गुणवैराग्य समाधीतून उत्पन्न होते. या १७ व्या सूत्रात संप्रज्ञात समाधीचा
परिचय करून दिलेला आहे. ही
संप्रज्ञात समाधी ही वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता या भावांनी युक्त असते. व्यावहारिक पातळीवरून दैनंदिन जीवनाशी निगडित
असे विवेचन करताना मला या सूत्रातल्या संकल्पना आधी समजावून घेणे महत्त्वाचे
वाटते.
समाधी म्हणजे काय ?
‘समाधी’ ही संकल्पना अष्टांग योगातील आठवे / शेवटचे अंग म्हणून आपल्याला परिचित आहे. ‘समाधी’ या शब्दाबद्दल, अवस्थेबद्दल जनमानसात आजही एक प्रकारचा आदर दिसून येतो. सर्वसाधारणपणे विभूतींनी कार्यपूर्ती करून आयुष्याला दिलेला पूर्णविराम या ‘समाधी’ संकल्पनेतून व्यक्त होतो. मात्र त्याचबरोबर दैनंदिन कामात, आवडत्या कामात, प्राविण्यप्राप्त कामात व्यक्ती तल्लीन झालेली दिसली की आपण त्याची ‘समाधी लागली’ असा शब्दप्रयोग करतो. तसेच कोणत्याही कलेतून अत्त्यूच्च दर्जाचा आनंद मिळत असेल तरी वाचक – श्रोता - प्रेक्षक यांच्या रंगून जाण्यातून, समाधान पावलेल्या भूमिकेतून, वरील शब्दाचा वापर होतो. वरील सूत्राचे विवेचन करताना ही ‘तल्लीनता’ मी स्वत: इथे केंद्रीभूत मानते. स्वाभाविकच कोणत्या तरी गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, एकाग्रता साधून माणूस तल्लीन होत असतो. ज्यावर आपण एकाग्र होतो त्याला योगशास्त्राच्या परिभाषेत ‘आलंबन’ असे म्हणतात. समाधीसाठी स्थूल वा सूक्ष्म आलंबन आवश्यक असते. सर्व तऱ्हेच्या समाधीमध्ये मनाला इतर सार्या विषयांपासून दूर करून एका विशिष्ट विषयाच्या – स्वीकारलेल्या आलंबनाच्या - ध्यानात पुन्हा पुन्हा केंद्रित करावे लागते. ओशो लिहितात, ‘समाधान’ या शब्दातून समाधी हा शब्द आला आहे. तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य वाटणारी मनोदशा म्हणजे समाधी.
संप्रज्ञात समाधी म्हणजे काय ?
‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथात डॉ.प.वि.वर्तक लिहितात –“समाधीचे संप्रज्ञात व
असंप्रज्ञात असे दोन मुख्य प्रकार संभवतात. समाधी अवस्थेत जाताना जर वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता यांचा संबंध
मनाशी असेल तर संप्रज्ञात समाधी लागली असे म्हणतात. संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्यात
ज्ञान प्राप्त होते अशी समाधी.”
स्पष्टीकरण करताना ते लिहितात,
वितर्क, विचार, आनंद व अस्मिता हे एका पेक्षा एक
सूक्ष्मतर असे मनाचे भाव आहेत. कोल्हटकरांच्या स्पष्टीकरणानुसार
वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता यांच्या रूपाशी
चित्त तदाकार झाल्यामुळे सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मिता असे संप्रज्ञात समाधीचे चार प्रकार होतात. आता या प्रकारांच्या संकल्पना समजावून घेऊ.
१.
सवितर्क संप्रज्ञात
समाधी –
‘सवितर्क’ हा संप्रज्ञात समाधीचा
पाहिला प्रकार आहे. साधक समाधीच्या अभ्यासाला जेव्हा प्रथमच आरंभ करतो तेव्हा
त्याला बाह्य / भौतिक सृष्टीतील स्थूल / दृश्य आलंबनापासूनच सुरुवात करावी लागते. चित्ताच्या
आलंबनासाठी स्थूल आभोग असणे हे वितर्काचे रूप होय. जो
विशिष्ट तर्क बाळगून त्यावर आपण चिंतन करतो त्याचे सम्यक ज्ञान या प्रकारच्या
समाधीत होते.
विचारांच्या अनुषंगाने तर्क –
कुतर्क – वितर्क हे शब्द आपण दैनंदिन जीवनात सहजतेने
वापरतो. तर्क म्हणजे परिस्थितीनुरूप अनुमान करणे. कुतर्क म्हणजे चुकीचा किंवा
नकारात्मक असा तर्क किंवा अनुमान. वितर्क म्हणजे या अनुमानांपैकी विशेष महत्त्वाचे
अनुमान होय. अनेक तर्क आपण करीत राहतो व बुद्धीच्या निकषावर घासून पाहतो. या
बुद्धीच्या निकषावर टिकणारा तर्क हा वितर्क होय. योगसूत्रावर भाष्य करताना ओशो
लिहितात, “संप्रज्ञात समधीचा पाहिला घटक म्हणजे वितर्क. ज्याला आंतरिक शांती
मिळवायची आहे त्याला वितर्काचे, विशेष तर्काचे शिक्षण घ्यायला हवे. म्हणजे मग तो
नेहमी एखाद्या गोष्टीच्या प्रकाशमान बाजूकडे, विधायक बाजूकडे पाहील.” विचार आणि विचारीपणा
यातील फरक स्पष्ट करत ते सांगतात मनातल्या भाऊगर्दीला आपण विचार मानतो पण महामुनी पतंजलींना विचाराचा जो अर्थ अभिप्रेत आहे, तो विचारांचे आंतरिक अनुशासन करणाऱ्या
धाग्याचे, त्यात सुव्यवस्थितपणा आणणाऱ्या अंत:सूत्राचे. त्या अंत:सूत्रालाच ते विचार
मानतात.
स्वामी विवेकानंदांनी ‘राजयोग’ या ग्रंथात वितर्क म्हणजे प्रश्न असे स्पष्टीकरण दिले आहे. सवितर्क म्हणजे प्रश्नसहित. या समाधीच्या वेळी या स्थूल भूतांमधील सारी शक्ती आणि त्यांच्यात निहीत असलेले सत्य आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून जणू काही आपण त्यांना प्रश्न विचारत असतो. दैनंदिन जीवनात परमेश्वराच्या नवविधा भक्तिद्वारे साधलेली एकाग्रता अथवा तन्मयता योगशास्त्रातील सवितर्क समाधी होय. चित्तवृत्तीनिरोधाच्या अभ्यासाचा हा प्रारंभ असतो.
२.
सविचार संप्रज्ञात
समाधी –
‘सविचार’ हा संप्रज्ञात
समाधीचा दुसरा प्रकार आहे. अनेक तर्क वितर्क करून
झाले म्हणजे आपण एका विचारावर स्थिर होतो व त्याप्रमाणे वागतो म्हणून त्याला 'विचार' म्हणतात. यात 'चर' म्हणजे 'वागणे' हा धातू आहे. ‘विचार’ हा वितर्कापेक्षा सूक्ष्म व स्थिर असतो. एका
विचारावर आपण धारणा करून ध्यान करू लागलो व त्यातच समाधी लागली तर ती ‘सविचार
समाधी’ झाली. या विचाराचे उत्तर या समाधीत आपणास मिळते. ‘सवितर्क समाधी’पेक्षा ‘सविचार
समाधी’ श्रेष्ठतर आहे. सविचार समाधीत चित्ताला जे आलंबन घ्यावे लागते ते सूक्ष्म
असावे लागते. कोणत्याही बाह्य वस्तूची प्रत्यक्ष अपेक्षा न करता मनात ध्येयवस्तूचा
विचार येऊन या विचारावरच मन स्थिर करता येऊ लागले म्हणजे ती सविचार समाधी होय. उदाहरणार्थ
उपास्य देवतेची मूर्ती पुढे असण्याची आवश्यकता संपली आणि त्या मूर्तीचा नुसता
विचार मनात येताच चित्त तदाकार होऊ लागले म्हणजे साधकाचे मन ‘सवितर्का’तून ‘सविचारात’
गेले असे समजावे, हे योगशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे.
३.
सानंद संप्रज्ञात समाधी
–
आपले वितर्क गेले की विचार येतो. विचारही गेले की नुसता
आनंद राहतो. नुसता आनंद असणारी स्थिती म्हणजे सानंद समाधी होय. सानंद संप्रज्ञात समाधीचे स्वरूप नीट लक्षात येण्यासाठी आनंद म्हणजे
काय आणि तो कशामुळे होतो याचा विचार करणं आवश्यक आहे. साधारणपणाने इंद्रियांचा
विषयांशी संयोग घडला, एखादी तीव्र इच्छा पूर्ण झाली, चित्तामध्ये
शांती आणि समाधान नांदायला लागले म्हणजे चित्तात आनंद निर्माण होतो. अर्थातच आनंदाचे
हे तिन्ही प्रकार निरनिराळे आहेत. या तीन प्रकारांमध्ये आनंदाची उत्कटता
उत्तरोत्तर अधिकाधिक अनुभवली जाते. आनंदाची अभिव्यक्ती होण्यास चित्ताची सत्त्वारूढता
हे प्रमुख कारण आहे. सत्त्वगुण जीवाला सुखसंग आणि ज्ञानसंग घडवत असतो. त्यातून माणूस विषयानंदाकडून आत्मानंदाकडे वळायला लागतो. चित्तात सत्त्वाचे
प्राबल्य वाढल्याने तेथे आत्मानंद प्रतिबिंबित होतो. चित्ताचे सर्व चांचल्य नाहीसे
होऊन आलंबनाची आवश्यकता न उरता चित्तात आनंदाच्या वृत्तीचा प्रशांत प्रवाह वाहू लागला
म्हणजे ती सानंद संप्रज्ञात समाधी होय.
४. सास्मिता संप्रज्ञात समाधी –
नुसता आनंद असणारी स्थिती म्हणजे ‘सानंद संप्रज्ञात समाधी’ होय. आनंद वाटतो त्या वेळी आपणापाशी द्वैतभाव असतो. तेथे ‘मी’ असतो व ‘आनंद’ असतो. ‘मला आनंद वाटतो’ हा भाव असतो. पण समाधीची याहून पुढली पायरी गाठली की आनंद नाहीसा होतो. आनंद नाहीसा होतो म्हणजे दुःख होते असे नव्हे. दुःख तर विरक्तीतच नाहीसे झालेले असते. आनंद नाहीसा होतो तिथे कुठलीच भावना शिल्लक राहत नाही. भावना शिल्लक नसली तरी भाव शिल्लक असतो. तो भाव म्हणजे मीपणाचा भाव, अहंभाव, ‘मी आहे’ याची जाणीव. या जाणिवेलाच अस्मिता आहे असे म्हणतात. मी कुणीतरी आहे ही जाणीव या समाधीत असते, म्हणून ती सास्मिता (स + अस्मिता) समाधी होय. अस्मिता आहे म्हणजेच द्वैत आहे. द्वैत आहे म्हणूनच मी आहे. ते आहे व त्याचे मला ज्ञान होत आहे अशी घटना तेथे घडत असते. हे ज्ञान होत असते म्हणूनच ती संप्रज्ञात समाधी होय.
‘संप्रज्ञात’ याचा अर्थ संपूर्णपणे, सर्व बाजूंनी, प्रकर्षाने ज्ञान होणे. ज्ञान होण्याची क्रिया आहे
म्हणजेच ‘ज्ञान’, ‘ज्ञेय’ व ‘ज्ञाता’ हे त्रिकुट तिथे
आहे. त्यातील 'मी' हा महत्त्वाचा आहे. ‘मी आहे’ ही
जाणीव मूलभूत आहे. ‘अस्मिता’ म्हणजे ‘अहंकार नसलेला अहंभाव’. ही अस्मिता असली की
आनंद होतो. आनंद मिळवण्यासाठीच आपले विचार सतत कार्य करीत असतात. पण हा विचार
पक्का होण्यापूर्वी आपण अनेक वितर्क करीत असतो. हे वितर्क अनेक तर्कातून आपण
निवडून घेत असतो. म्हणून सामान्य माणूस तर्कामध्ये गुरफटलेला असतो. जसा जसा अभ्यास
होत जाईल जाईल तसा तसा तर्कातून वितर्कात, तेथून विचारात, मग आनंदात तो जातो. शेवटी आनंदही नाहीसा होऊन केवळ
अस्मिता राहते. ही संप्रज्ञात समाधीची शेवटची अवस्था होय.
संप्रज्ञात समाधीत श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होत असते. हे
ज्ञान 'मला' प्राप्त होते; सहाजिकच 'मी'पणा तिथे आहे. म्हणूनच ती अस्मिता असलेली अशी सास्मिता समाधी होय. ‘राजयोग’ ग्रंथात स्वामी विवेकानंद
लिहितात, “ज्ञान ही शक्ती आहे. कोणत्याही वस्तूचे ज्ञान झाले की तिचे आपल्याला
नियंत्रण करता येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपले मन सृष्टीतील निरनिराळ्या तत्त्वांचे
ध्यान करू लागते तेव्हा त्याला त्यांचे नियंत्रण करता येते. संप्रज्ञात समाधीत
प्रकृतीचे दमन करण्याचे सर्व सामर्थ्य अंगी येते.”
‘योग दिनी’ सुरू केलेले विवेचन ‘योगिनी एकादशी’ला पूर्ण होत
आहे, या समाधानाच्या काठावर थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्यात १८ व्या सूत्रातील
असंप्रज्ञात समाधी जाणून घेण्यासाठी.
वृंदा
आशय
